
भरधाव डंपर वाहतूक रोखा
भरधाव डंपर वाहतूक रोखा
कोळंबवासीय; मालवण तहसीलसह, पोलिसांना निवेदन
मालवण, ता. ७ : कोळंब-आचरा मार्गावरून वाळूने भरलेले डंपर भरधाव वेगात जात असल्याने अपघाताची भीती आहे. या मार्गावर डंपर व इतर गाड्यांच्या वेग नियंत्रणासाठी गतिरोधक किंवा इतर सुविधा कराव्यात. कोळंब पुलावरून व कोळंब मार्गावरून होणारी डंपरची वाहतूक कमी करण्यासाठी आठ दिवसांत योग्य कार्यवाही न झाल्यास कोळंब ग्रामपंचायत व ग्रामस्थ कुठल्याही वेळी ग्रामपंचायतीसमोर रास्ता रोको आंदोलन छेडतील, असा इशारा कोळंब ग्रामपंचायतीतर्फे निवेदनाद्वारे सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली व मालवण, तहसीलदार, पोलिस निरीक्षक, गटविकास अधिकारी यांना देण्यात आला आहे.
कोळंब ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातून कोळंब-आचरा मार्गावरून वाळूने भरलेले डंपर भरधाव वेगात धावत असून या भागात यापूर्वी वारंवार अपघात झाले आहेत. कोळंब हडकर दुकान व कोळंब खडवण नाका येथे तिघेजण मृत्युमुखी पडले आहेत. २९ मार्चला एक डंपर कोळंब येथे रस्त्याच्या बाजूला असलेला कठडा तोडून अंगणात घुसून अपघात झाला होता. त्यानंतर तेथे गावातील ग्रामस्थांनी डंपर मालक व चालक यांना समज दिली. तरीही त्याच वेगाने डंपर वाहतूक सुरू आहे. कोळंब पुलाची दुरुस्ती दोन वर्षांपूर्वी झाली. पुलावरून वाळूने भरलेले पाच ते सहा डंपर एकापाठोपाठ एक जात असल्याने कोळंब पूल कधीही कोसळण्याचा धोका आहे. सर्जेकोट जेटीचे काम सुरू असून मोठे दगड भरलेले डंपरही कोळंब पुलावरून वाहतूक करत आहेत. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. पुलावरून होणारी डंपर वाहतूक कमी करण्यासाठी आठ दिवसांत योग्य कार्यवाही न केल्यास कोळंब ग्रामपंचायत व ग्रामस्थ कुठल्याही वेळेत कोळंब ग्रामपंचायतीसमोर रास्ता रोको आंदोलन छेडणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.