विभागीय शिक्षक भरतीसाठी एल्गार

विभागीय शिक्षक भरतीसाठी एल्गार

swt१०१.jpg
९४७९१
मुंबईः डी. एड., बी. एड. धारक संघटनेने शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची भेट घेऊन विविध मागण्यांबाबत निवेदन दिले.

विभागीय शिक्षक भरतीसाठी ''एल्गार''
कोकणात लढाः परजिल्ह्यातील शिक्षक बदलीने स्वगृही
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. १०: राज्याला मागील दहा-पंधरा वर्षांत कोकणातील दोन शालेय शिक्षणमंत्री लाभले; मात्र कोकणात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकवायला शिक्षकच नाहीत, अशी स्थिती आहे. परजिल्ह्यातील शिक्षक मोठ्या संख्येने जिल्हा बदली करून निघून जात असल्याने याविरोधात येथील डी.एड., बी.एड. धारक पंधरा वर्षे लढा देत आहेत; मात्र कोकणातील अभियोग्यता धारकांना न्याय मिळाला नाही. त्यामुळे विभागीय शिक्षक भरतीसाठी सध्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगडमध्ये स्थानिकांचा ''एल्गार'' सुरू आहे.
तत्कालीन शिक्षणमंत्री विनोद तावडे व सध्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर हे दोघेही तळकोकणातील असून या दोघांनीही राज्याच्या शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे; मात्र यांच्याच काळात कोकणातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकवायला शिक्षक नाहीत, अशी दुर्दैवी स्थिती आहे. मागील दहा ते पंधरा वर्षांत परजिल्ह्यातील शेकडो शिक्षक आपापल्या गावी बदली करून जात असल्याने कोकणातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील शेकडो शिक्षक दरवर्षी जिल्हा बदली करतात. त्यामुळे दोन शिक्षणमंत्री मिळूनही कोकणातील जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षणाची वाताहत थांबलेली नाही.
कोकणातील शाळांमधील ही वस्तुस्थिती शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी येथील स्थानिक डी.एड., बी.एड. धारकांनी मागील पंधरा वर्षांपासून लढा उभारला आहे. विभागीय शिक्षक भरती करून स्थानिकांना भरतीत न्याय द्या, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालये, मुंबई आझाद मैदान, नागपूर अधिवेशन या ठिकाणी धरणे आंदोलने, उपोषणे करत अनेकवेळा मोर्चेही काढण्यात आले. दरवर्षी शिक्षकांच्या जिल्हा बदली, सेवानिवृत्ती यामुळे रिक्त होणार्‍या जागा न भरल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. याचा विचार करून या रिक्त जागा स्थानिकांसाठी उपलब्ध करून द्याव्यात, यासाठी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगडमध्ये सध्या ''एल्गार'' सुरू आहे.
विभागीय शिक्षक भरती झालीच पाहिजे, विभागीय भरतीचा शासन निर्णय निर्गमित करा, स्थानिकांची टक्केवारी (७०-३० टक्के) जाहीर करून त्यांना न्याय द्या, शिक्षणमंत्र्यांच्या विभागीय भरतीला आमचा पाठिंबा हे मुद्दे घेऊन मार्चमध्ये रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डी.एड., बी.एड. धारकांनी धरणे आंदोलन केले. रत्नागिरीत एक दिवसाचे धरणे आंदोलन करून शिक्षणमंत्री केसरकर यांच्या विभागीय भरतीच्या घोषणेला पाठिंबा देण्यात आला. शिक्षकांच्या जिल्हा बदलीच्या समस्येवर उपाययोजना करायची असेल, कोकणातील जिल्हा परिषदेच्या शाळा वाचवायच्या असतील, तर विभागीय भरतीशिवाय पर्याय नाही, अशी भूमिका या आंदोलकांकडून सातत्याने मांडण्यात येत आहे. शिक्षणमंत्री केसरकर यांनी शिक्षक भरती विभाग स्तरावर करण्याचे आश्वासन विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात दिले आहेत. या निर्णयाला कोकणातून पाठिंबा मिळत आहे. भरतीसाठी टीएआयटी परीक्षा झाली असून भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. तत्पूर्वी विभागीय शिक्षक भरतीचा शासन निर्णय निर्गमित करून विभागीय आरक्षणाची टक्केवारी जाहीर करावी, अशी मागणी होत आहे.
................
कोट
विभागीय भरतीने कोकणातील शाळांना स्थानिक शिक्षक मिळतील. जिल्हा बदलीच्या समस्येवर तोडगा निघून येथील विद्यार्थ्यांचे नुकसान टळेल. शाळांमध्ये बोली भाषेतून शिकवायला शिक्षकही मिळतील. यासाठी विभागीय शिक्षक भरतीचा निर्णय योग्यच असून विभागाला ७० टक्के व उर्वरित राज्याला ३० टक्के आरक्षण देण्यात यावे.
- भाग्यश्री रेवडेकर, करंडे
................
कोट
शिक्षणमंत्र्यांनी आमची बाजू समजून घेत विभागीय भरतीबाबत सकारात्मकता दर्शविली आहे. आता शासन निर्णय काढून आम्हाला न्याय द्यावा.
- प्रभुदास आजगावकर, मालवण
.................
कोट
विभागीय भरती झाल्यास विद्यार्थ्यांना बोलीभाषेतून शिकविणारे शिक्षक मिळतील. परिणाकी मुलांची आणि शाळेची गुणवत्ता वाढेल.
- संकेत हर्णे, कणकवली
......................

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com