रत्नागिरी ः गणपतीपुळे किनार्‍यावर सीसीटीव्हीची करडी नजर

रत्नागिरी ः गणपतीपुळे किनार्‍यावर सीसीटीव्हीची करडी नजर

फोटो ओळी
-rat१०p१.jpg- KOP२३L९४७७४
गणपतीपुळे ः किनाऱ्यावर कॅमेरे बसवण्यात येत आहेत.
(छाया ः किसन जाधव, गणपतीपुळे).

गणपतीपुळे किनाऱ्‍यावर सीसीटीव्हीची नजर

देवस्थानकडून आठ कॅमेरे बसविले; बुडणाऱ्यांसह चोरट्यांवरही ठेवता येणार लक्ष

राजेश कळंबटे ः सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १० ः पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या गणपतीपुळे किनार्‍यावर २४ तास सीसीटीव्हीची करडी नजर राहणार आहे. पोलिस प्रशासनाच्या सुचनेनुसार, गणपतीपुळे देवस्थानकडून किनार्‍यावर पाच आणि मंदिर परिसरात तीन असे एकूण आठ कॅमेरे लावले आहेत. किनार्‍यापासून खोल समुद्रात साधारणपणे दोनशे मीटर आतील दृश्य टीपू शकतील, असे दर्जेदार कॅमेरे जोडण्यात आले आहेत.
दरवर्षी लाखो पर्यटकांचा राबता असलेले प्रसिद्ध ठिकाण म्हणून गणपतीपुळेचा समावेश आहे. देशाच्या कानाकोपर्‍यातीलच नव्हे तर परदेशी पर्यटकही येथे येतात. प्रसिद्ध श्री गणपतीचे पुरातन मंदिर, विस्तीर्ण समुद्रकिनारा आणि निसर्गसौंदर्य परिसर यामुळे गणपतीपुळेत येणार्‍या पर्यटकांचा कल वर्षभर असतो. पश्‍चिम महाराष्ट्रातून सर्वाधिक भक्तगण अंगारकी, संकष्टी चतुर्थीला येथे येतात तर मुंबई-पुण्यासह बेळगावमधून शनिवार, रविवारी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक येतात. भौगोलिक रचनेमुळे आणि समुद्रातील अंतर्गत प्रवाहांमुळे येथील किनारा पोहण्यासाठी धोकादायक म्हणून ओळखला जात होता. या ठिकाणी अनेक पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये पोलिस, जिल्हा प्रशासन, ग्रामपंचायत यांच्यासह देवस्थानकडून केलेल्या उपाययोजनांमुळे बुडण्याच्या घटनांवर आळा घालण्यात यश आले आहे. बोटिंग सुरू झाल्यामुळे हा किनारा अधिक सुरक्षित झाला आहे. तरीही वाढती गर्दी पाहता या किनार्‍यावरील सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकुर्णी यांच्या सुचनेनुसार, जयगड पोलिस निरीक्षक जे. एच. कळेकर यांनी गणपतीपुळे देवस्थानच्या पदाधिकार्‍यांशी संर्पक साधला होता. त्यानुसार मागील आठवड्यात किनार्‍यावर पाच दर्जेदार कॅमेरे लावण्यात आले आहेत. त्यामुळे खोल समुद्रात पोहण्यासाठी जाणार्‍या पर्यटकांना वेळीच रोखणे शक्य होईल तसेच बुडणार्‍यांवरही करडी नजर ठेवता येणार आहे. गर्दीमध्ये पाकिटमारी, चोरीच्या घटना घडण्याची शक्यता असते. त्यालाही यामुळे आळा बसू शकतो. अनेकवेळा गर्दीमध्ये लहान मुले हरवण्याच्या घटना घडतात. अशावेळी त्यांना शोधणे कॅमेर्‍यामुळे सोपे होते. मंदिरासमोरील किनार्‍यावर चार कॅमेरे, पोलिस ठाण्याच्या मागील बाजूस किनार्‍यावर एक आणि मंदिर परिसरात ३ कॅमेरे लावण्यात आल्याचे पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात आले तसेच सागरीसुरक्षेच्या दृष्टीनेही हा किनारा सीसीटीव्हीमुळे सुरक्षित झाला आहे. कॅमेऱ्याची माहिती मंदिरातील यंत्रणेबरोबरच पोलिसांना कळावी यासाठी वायफायद्वारे गणपतीपुळे पोलिस चौकीतील संगणकाला जोडून घेण्यात येणार आहे.

कोट
जिल्हा पोलिस अधीक्षकांनी दिलेल्या सुचनेनुसार, देवस्थानच्या पदाधिकार्‍यांशी चर्चा केली होती. त्यांनीही तत्काळ यावर कार्यवाही केली आहे. किनारी भागासह परिसरात दर्जेदार कॅमेरे लावले आहेत.
- जे. एच. कळेकर, पोलिस निरीक्षक, जयगड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com