रत्नागिरी ः आंबा नुकसानीच्या सर्व्हेक्षणाचे आश्‍वासन

रत्नागिरी ः आंबा नुकसानीच्या सर्व्हेक्षणाचे आश्‍वासन

आंबा नुकसानीच्या सर्व्हेक्षणाचे आश्‍वासन
जिल्हाधिकाऱ्‍यांचा दिलासा; अवकाळीसह बदलत्या वातावरणाचा परिणाम
रत्नागिरी, ता. १० ः कडाक्याचा उष्मा, अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण अशा विचित्र परिस्थितीचा फटका आंबा बागायतदारांना बसला आहे. यंदा उत्पादनात मोठी घट असून, आंबा बागायतींचे कोकण कृषी विद्यापीठ, कृषी विभागाकडून सर्वेक्षण करा, अशी मागणी जिल्हाधिकारी एम. देवेंदरसिंग यांच्याकडे आंबा बागायतदारांनी केली. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत जिल्हाधिकार्‍यांनीही संबंधित यंत्रणेला नुकसानीचे सर्व्हेक्षण करण्याच्या सूचना देण्यात येतील, असे आश्‍वासन दिले.
दरम्यान, आंबा बागायतदारांनी पालकमंत्री उदय सामंत यांना निवेदन देऊन शासनपातळीवर बागायतदारांना दिलासा मिळावा यासाठी प्रयत्न करण्याचे साकडे घातले आहे. जिल्हाधिकार्‍यांना भेटीप्रसंगी सुनील नावले, प्रकाश साळवी, पेडणेकर आदींसह बागायतदार उपस्थित होते.
यंदा जिल्ह्यात आंबापिकाला हवामानातील होणार्‍या बदलाचा मोठा फटका बसला आहे. आंब्याचा हंगाम नोव्हेंबरपासून सुरवात होत असतो. यावर्षी सुरवातीपासून पिकाला अनुकूल हवामान तयार झालेले नाही. कधी कडक उन्हाळा तर कधी ढगाळ वातावरण अशा प्रकारच्या हवामानामुळे तुडतुडा मोठ्या प्रमाणात आहे. डिसेंबरमध्ये थंडीऐवजी उष्ण हवामान राहिल्यामुळे झाडांना मोहोराऐवजी पालवी आली. जानेवारी २०२३ मध्ये झाडांना मोहोर येण्यास सुरवात झाली; पण खराब हवामानामुळे अपेक्षेप्रमाणे फलधारणा झाली नाही. पीक वाचवण्यासाठी महागड्या औषधाच्या फवारण्या बागायतदरांना कराव्या लागल्या आहेत. त्याचाही उपयोग झालेला नाही. शेवटच्या टप्प्यातील मोहोर करपून वाया गेला. या हंगामात जिल्ह्यात हापूसचे पीक अंदाजे २० ते २५ टक्केच हाती येईल, असा अंदाज आहे. आतापर्यंतची स्थिती विचित्र आहे. अपेक्षित उत्पादन मिळाले नसल्याने बागायतदारांचा खर्च निघेल की नाही, अशी चिंता लागून राहिली आहे. या विदारक परिस्थितीमुळे आंबा उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. या हंगामात येणार्‍या एकूण आंबापिकाचे सर्वेक्षण सक्षम यंत्रणेकडून म्हणजेच कृषी विद्यापीठ, जिल्हा कृषी अधिकारी, महसूल यंत्रणा यांनी करून घ्यावी आणि त्याचा सविस्तर अहवाल शासनाला पाठवावा, अशी विनंती आंबा उत्पादक शेतकर्‍यांनी केली. रत्नागिरी जिल्हा आंबा उत्पादक सहकारी संस्था, पावसच्या कोकण आंबा सेवा संघाने जिल्हाधिकारी एम. देवेंदरसिंग यांची भेट घेतली.

चौकट
फुलकिडीवर अभ्यास करा

या हंगामात आंबापिकाचे फुलकीड (थ्रिप्स) या रोगाने नुकसान केले आहे. या रोगावर औषध उपलब्ध नाही. त्यावर संशोधन होणे गरजेचे आहे. ज्या ठिकाणी संशोधन केंद्र आहेत त्यांच्यामार्फत फुलकिडीवर प्रभावी औषध उपलब्ध करून देण्यासाठी अभ्यास झाला तरच शेतकर्‍याला दिलासा मिळेल, अशी आंबा बागायतदारांनी जिल्हा प्रशासनाकडे मागणी केली आहे.

कोट
आंबा बागायतदारांच्या समस्यांबाबत जिल्हाधिकार्‍यांची भेट घेऊन निवेदन दिले असून नुकसानीचे सर्व्हेक्षण करण्याची मागणी केली आहे. त्यांनीही संबंधित यंत्रणेला सूचना करू, असे सांगितले आहे.
- प्रकाश साळवी, आंबा बागायतदार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com