''त्या'' कंपनीविरुध्द मोर्चा काढणार

''त्या'' कंपनीविरुध्द मोर्चा काढणार

swt१०१४.jpg

परशुराम उपरकर

‘त्या’ कंपनीविरुध्द मोर्चा काढणार
परशुराम उपरकरः साखळी मार्केटींगच्या माध्यमातून फसवणूक
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. १०ः जिल्ह्यात विविध भागात स्टोअर उभारून एका कंपनीने साखळी मार्केटींगच्या माध्यमातून फसवणूक केल्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने यापूर्वी आवाज उठवला होता. या कंपनीमध्ये काम करणाऱ्या एजंटांनीही आता जिल्हाधिकाऱ्यांना आपली फसवणूक होत असल्याचे निवेदन दिले आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुंतवणूकदारांचे पैसे न मिळाल्यास मोर्चा काढणार आहे. जिल्ह्यातील गुंतवणूकदारांनी आपली माहिती मनसेच्या कार्यालयात देऊन तक्रार नोंदवावी, असे आवाहन मनसेचे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेतून केले आहे.
श्री. उपरकर म्हणाले, ‘‘जिल्हाभरात तब्बल ४०० कोटींचा व्यवसाय करणाऱ्या या कंपनीने गुंतवणूकदारांची १०० कोटींची फसवणूक केलेली आहे. खरेदी व्यवहारावरील टक्केवारी आणि गुंतवणुकीनंतर दुप्पट मिळणाऱ्या पैशाच्या हव्यासापोटी जिल्ह्यातील गुंतवणूकदार फसलेले आहेत. त्यांनी आपला आयडी नंबर, गुंतवलेली रक्कम, खात्याच्या पासबुकची झेरॉक्स अशी तक्रार घेऊन २० एप्रिलपर्यंत मनसे कार्यालय, कणकवली येथे संपर्क साधावा. तक्रारदारांसोबत आम्ही पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन गुंतवणूकदारांना पैसे परत मिळण्यासाठी प्रयत्न करू. कारवाई न झाल्यास या कंपनीविरोधात मोर्चा काढू.’’
ते म्हणाले, ‘‘संबंधित कंपनीबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यापूर्वी अनेकदा आंदोलन केले. जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांना फसवणूक होत असल्याबाबतची पूर्वकल्पना दिली होती. जिल्ह्यात गेल्या चार-पाच वर्षांपासून या कंपनीचे वेगवेगळे व्यवसाय ठिकठिकाणी सुरू झाले. यातील फोंडा आणि कणकवली येथे असलेले स्टोअर बंद करण्यात आले. या स्टोअर्सच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जाऊन गुंतवणूक करण्यासाठी सांगणाऱ्या जिल्ह्यातील काही एजंटांनी पैसे मिळत नाहीत, अशी तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. या कंपनीतील काहींनी गुंतवणूकदारांना तक्रार करू नये, अशी विनंती करून एप्रिलपर्यंत सगळे पैसे त्यांच्या खात्यात जमा होतील, असे सांगितले होते; मात्र आता विनंती करणाऱ्यांपैकी जिल्ह्यातील प्रमुख असलेल्या एजंटांनी आपल्याला पैसे मिळत नाहीत. गुंतवणूकदारांच्या खात्यात पैसे जमा होत नाहीत, अशी तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.’’
उपरकर पुढे म्हणाले, ‘‘या कंपनीचा मुख्य असलेल्या एका सूत्रधाराने वेगळ्या नावाने कंपनी स्थापन केली आणि ही कंपनी हाँगकाँगमध्ये आहे, असे सांगून काही स्टोअरमध्ये किराणामाल भरणा केला आणि एजंटांनी नागरिकांमध्ये जाऊन त्यांची फसवणूक होणार नाही, अशी दिशाभूल करून ठेवली होती; परंतु ज्या नागरिकांनी दुप्पट रक्कम मिळेल म्हणून गुंतवणूक केली, अशा शेकडो नागरिकांची फसवणूक झाली आहे. या स्टोअरमध्ये खरेदी केल्यानंतर ग्राहकांना काही प्रमाणात सूट मिळत होती. तर गुंतवणूकदारांना १ ते २५ लाखाची गुंतवणूक केल्यावर दुप्पट रक्कम दिली जात होती. काही लोकांच्या खात्यात पैसे जमाही झाले; परंतु गेल्या दोन वर्षांपासून त्यांची फसवणूक होऊ लागली आहे. अनेकांच्या खात्यामध्ये गेल्या दोन वर्षांत एकही पैसा जमा झालेला नाही. या फसवणुकीबाबत मी जिल्हा पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन तक्रार करणार आहे. यासाठी फसगत झालेल्या जिल्ह्यातील नागरिकांनी २० एप्रिलपर्यंत मनसे कार्यालयात आपली माहिती द्यावी.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com