कृषी केंद्रातील कामगारांना न्याय द्या

कृषी केंद्रातील कामगारांना न्याय द्या

swt१०१९.jpg
९४८९२
मुळदे : येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे डिन डॉ. प्रदीप हळदवणेकर यांना निवेदन देताना मनसे पदाधिकारी.

कृषी केंद्रातील कामगारांना न्याय द्या
मनसेचे निवेदनः विद्यापीठाचे डीन डॉ. प्रदीप हळदवणेकर यांच्याशी चर्चा
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १०ः मुळदे येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या केंद्रात कार्यरत कामगारांच्या मागण्या मान्य करून त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यापीठाचे डीन डॉ. प्रदीप हळदवणेकर यांच्याकडे करण्यात आली. कामगारांवर अन्याय झाल्यास मनसे गप्प बसणार नाही, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला.
याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुळदे येथील केंद्राला गावातील रहिवाशी कामगारांनी जमिनी दिल्या; परंतु त्या कामगारांना कायमस्वरूपी नोकरीत सामावून घेण्यात आले नाही. हे कामगार लाल मस्टरवर कार्यरत होते; परंतु कोणतीही पूर्व सूचना न देता आता लाल मस्टर बंद करून त्यांना रोजंदारी स्वरूपात समाविष्ट करण्यात आले. कामगारांवर झालेला हा अन्याय आहे. मुळदे कृषी केंद्रात काही कामगार २५ ते ३० वर्षे कार्यरत असून त्यांना कोणत्याही प्रकारची कामे करतानाची सुरक्षा यंत्रणा दिली जात नाही. कामगारांना काम करताना कोणतीही इजा झाल्यास विद्यापीठाकडून उपचारासाठी कोणतीही वैद्यकीय सेवा उपलब्ध केली जात नाही. यामुळे कामगार हतबल झालेले आहेत. या सर्व प्रकाराबाबत काही कामगारांकडून मनसे कामगार सेनेचे सरचिटणीस गजानन राणे यांच्याकडे तक्रार करण्यात आली. त्यानुसार मनसेच्या शिष्टमंडळाने मुळदे येथील बाळासाहेब कृषी केंद्र विद्यापीठास धडक दिली.
यावेळी विद्यापीठाचे असोसिएट डिन डॉ. हळदवणेकर यांच्याशी चर्चा करण्यात आली. निवेदन सादर करून कामगारांवर अन्याय झाल्यास गप्प बसणार नाही, असा इशाराही देण्यात आला. डॉ. हळदवणेकर यांनी निवेदनाच्या माध्यमातून वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करू. संयुक्तिक बैठक आयोजित करून यावर तोडगा काढू, अशी ग्वाही दिली.
यावेळी मनसेचे माजी जिल्हा उपाध्यक्ष अनिल केसरकर, मनविसे जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार, मनविसे माजी जिल्हाध्यक्ष सुधीर राऊळ, मनविसे कुडाळ तालुका संपर्क अध्यक्ष सर्वेश सावंत, प्रवीण गवस, नीलेश देसाई, सिद्धेश माळकर उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com