हे तर तेलींचे केसरकरविरोधी अभियान

हे तर तेलींचे केसरकरविरोधी अभियान

swt1027.jpg
94937
सावंतवाडी : येथील आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना राजन पोकळे. बाजूला अशोक दळवी, अॅड. नीता सावंत, प्रेमानंद देसाई व अन्य. (छायाचित्रः रुपेश हिराप)

हे तर तेलींचे केसरकरविरोधी अभियान
राजन पोकळेः कणकवलीतून आमदारकीची स्वप्ने रंगवा
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १०ः भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांना जिल्ह्यात कोठेच थारा नसल्याने ते सावंतवाडीमध्ये आमदारकीची स्वप्ने पाहत आहेत. त्यांनी सावंतवाडीत इमारत बांधली म्हणजे ते सावंतवाडीकर होऊ शकत नाहीत. त्यामुळे सावंतवाडीची स्वप्ने न बघता जन्मगाव असलेल्या कणकवलीतून आमदारकीची स्वप्ने रंगवा, अशी टीका माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांनी आज येथे केली. विधानसभा मतदारसंघात भाजपकडून राबविण्यात येणारे ‘महाविजय अभियान’ नाही, तर राजन तेलींचे हे केसरकर विरोधी अभियान असल्याची टिकाही पोकळे यांनी यावेळी केली.
पोकळे यांनी आज येथील शिक्षणमंत्री केसरकर यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. यावेळी शिंदे शिवसेना उपजिल्हाप्रमुख अशोक दळवी, महिला जिल्हाध्यक्ष अॅड. नीता सावंत, जिल्हा संघटक सुनील दुबळे, विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष प्रेमानंद देसाई आदी उपस्थित होते.
पोकळे पुढे म्हणाले, ‘‘विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या भाजपचे महाविजय अभियान सुरू आहे. पक्षाची ध्येय धोरणे, कार्य जनतेपर्यंत पोहोचविणे हे तेलींचे कर्तव्य असून त्याबद्दल आमचे दुमत नाही; मात्र उठसूठ अभियानांच्या माध्यमातून मंत्री केसरकरांवर टीका करण्याचा एक कलमी कार्यक्रम ते राबवित आहे. तेली यांची ही बोगसनीती असून सावंतवाडीतील आमदारकीचे स्वप्न पूर्ण करण्याची त्यांची ही धडपड आहे; मात्र सावंतवाडी शहरात इमारत उभी केली म्हणून सावंतवाडीकर त्यांना कधीही जवळ करणार नाहीत. त्यामुळे त्यांनी आपला स्वप्न जन्म झाला, त्या मतदारसंघातून आमदारकीचे स्वप्न पाहावे. युतीधर्म म्हणून वेळप्रसंगी आम्ही तुमच्या प्रचाराला येऊ. मंत्री केसरकर यांनी जिल्हा विकासासाठी दिलेले योगदान जनतेला ठाऊक आहे. त्यामुळे सलग तीन वेळा जनतेने त्यांना निवडून दिले. तेली यांनी राजकीय कोलांट्या मारून अनेक उद्योग केले; परंतु त्यांचा पराभव करून इथल्या जनतेने त्यांना लाथाडले, ही त्यांची पोटदुखी असून कुठल्याही प्रकारे केसरकरांना बदनाम करण्याची संधी ते सोडत नाहीत."
पोकळे पुढे म्हणाले, "आम्ही युतीचा धर्म पाळून गप्प आहोत; मात्र त्यामध्ये काहीजण त्यामध्ये खडा टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. तरीही आम्ही युतीचा धर्म पाळणार; मात्र तेलींकडून टीका होत राहिल्यास गप्प न बसता वरिष्ठांकडे तक्रार करू. जिल्ह्यातील विकासकामेही पालकमंत्र्यांच्या सहीने मंजूर होतात, असे तेली सांगत आहेत; मात्र जिल्ह्याचा पालकमंत्री शासनाचा वैधानिक प्रतिनिधी म्हणून त्यांच्या मंजुरीने हा निधी वितरित करण्यात येतो. याचा अर्थ तो कोणा एका पक्षाचा नसून विद्यमान युती सरकारच्या अर्थात भाजपसह शिवसेनेच्या माध्यमातून आला आहे. मंत्री केसरकर हे मुंबई व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री असून त्यांच्या शिफारस व सहीने हजारो कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे मग याचे सर्व श्रेय मंत्री केसरकरांनाच द्यावे लागेल. तेलींचा सर्व इतिहास, जिल्हा बँकेतील उद्योग जनतेला ठाऊक आहे; मात्र मंत्री केसरकरांनी त्याकडे दुर्लक्ष करण्याची सूचना दिल्याने आम्ही गप्प आहोत.’’

चौकट
कणकवलीतील कामांचे श्रेयही पालकमंत्र्यांनाच
जिल्ह्यातील विकासकामे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यात सहीने मंजूर होत आहेत, असे राजन तेली वेळोवेळी सांगत आहेत, मग कणकवली मतदारसंघाचे आमदार नीतेश राणेंनी कणकवलीत राबविलेल्या विकासकामांचे श्रेय त्यांचे नसून पालकमंत्र्यांचे असल्याचा त्याचा अर्थ होतो, असा चिमटाही यावेळी विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष प्रेमानंद देसाई यांनी काढला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com