गावठी बॉम्ब बाळगणाऱ्याला जामीन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गावठी बॉम्ब बाळगणाऱ्याला जामीन
गावठी बॉम्ब बाळगणाऱ्याला जामीन

गावठी बॉम्ब बाळगणाऱ्याला जामीन

sakal_logo
By

गावठी बॉम्ब बाळगणाऱ्याला जामीन
खेडः ८३ गावठी बॉम्ब बाळगणाऱ्या संशयिताची जामिनावर मुक्तता झाली आहे. खेड भरणे येथील कल्पेश जाधव याच्या घराची झडती घेतली असता ८३ गावठी बॉम्ब आढळून आले होते. या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता. अटक केल्यानंतर त्याची रवानगी पोलिस कोठडीतून न्यायालयीन कोठडीत केली होती. अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांनी युक्तिवाद मान्य करून आरोपीला जामिनाचा आदेश दिला.
--
भूमी अभिलेखच्या दोघांना जामीन
खेडः जमिनीचे काम करून देण्याचे आमिष दाखवत चिंचघर-वेताळवाडी येथील एकाकडून ६ लाख ५० हजार स्वीकारल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या भूमी अभिलेख कार्यालयातील एका अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यास येथील न्यायालयाने गुरूवारी अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. जुलै २०२१ ते जानेवारी २०२३ या कालावधीत शिवानंद टोपे, सायली धोत्रे या संशयितांनी जमिनीचे काम करून देण्याच्या आमिषापोटी ६ लाख ५० हजारांची मागणी करत व मागणी पूर्ण न केल्यास जमिनीच्या कामावर परिणाम होईल, अशी तंबी देत दोघांनी ही रक्कम स्वीकारल्याचे फिर्यादीने तक्रारीत नमूद केले होते.
-
खेड-तुळशी-बोरीवली बसफेरी आजपासून
खेडः उन्हाळी सुट्टी हंगामासाठी खेड-तुळशी-बोरीवली बसफेरी १५ पासून सुरू करण्यात येणार आहे. येथील स्थानकातून ही बस सकाळी ६.३० वा. सुटून दुपारी २ वा. बोरीवली येथे पोहोचेल. बोरिवली येथून दुपारी ३ वा. सुटून रात्री १०.३० वा. येथील स्थानकात पोहोचेल. तुळशी बुद्रुक, रेवतळी फाटा, महाड, माणगाव, इंदापूर, रामवाडी, पनवेल, मैत्रीपार्क, सायन आदी स्थानकात थांबे आहेत.
------------
नर्सिंग कॉलेजमध्ये शपथग्रहण सोहळा
खेड ः तालुक्यातील घाणेखुंट-लोटे येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी पुणेच्या एम.ई.एस. स्कूल अँड कॉलेज ऑफ नर्सिंगच्या एएनएम, जीएनएम आणि बीएस्सी प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांचा शपथग्रहण सोहळा पार पडला. या वेळी मंत्रालयातील उपसचिव यमुना जाधव यांनी शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना मिळणारे वैयक्तिक मार्गदर्शन हेच या कॉलेजचे मुख्य यश असल्याचे सांगितले. या प्रसंगी सल्लागार समितीचे अध्यक्ष सागर नेवसे, नियामक मंडळ सदस्य डॉ. आनंद लेले, एमईएस मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन आंबर्डेकर, एमईएस इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सचे अधीक्षक डॉ. शाम भाकरे, नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य मिलिंद काळे, उपप्राचार्य शिवप्रसाद हळेमनी, चिपळूण लाईफ केअर हॉस्पिटलचे डॉ. शाहीद परदेशी, पायल कांबळे आदी उपस्थित होते. स्वागत दिव्या देशपांडे, आभार प्रदर्शन लिंगराजू यांनी केले.
-------------
श्वानाच्या हल्ल्यात वासरू ठार
खेडः मोकाट पिसाळलेल्या श्वानांच्या हल्ल्यात तालुक्यातील आवाशी येथील शेतकऱ्याच्या गोठ्यातील एक वासरू ठार झाले तर अन्य एक जखमी झाले. या पिसाळलेल्या श्वानांमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. खेड तालुक्यातील आवाशी माळवाडी येथील शेतकरी मोहन लक्ष्मण शिगवण व त्यांचा मुलगा स्वप्नील यांनी दिलेल्या माहितीनुसार, घरासमोरच त्यांचा गोठा आहे. त्यात दोन दुभत्या गायी, त्यांची दोन वासरे व एक पाडा बांधला होता. मोकाट असणाऱ्या पाच-सहा श्वानांनी मंगळवारी (ता. ११) रात्री गोठ्यात प्रवेश करून एक महिने वयाच्या वासरावर हल्ला करून त्याला ठार केले. त्यानंतर बुधवारी (ता. १२) पुन्हा त्या श्वानांनी चार महिन्यांच्या वासरावर हल्ला केला; मात्र, त्याला वाचवण्यात त्यांना यश आले. ते वासरू गंभीर जखमी झाले आहे. त्याच्यावर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून उपचार करून घेतले आहेत. याबाबत शिगवण यांनी आवाशी ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक व सदस्य यांना माहिती दिली आहे. या श्वानांचा बंदोबस्त करण्याची मागणी त्यांनी केली आहे. मात्र, उपसरपंच व पोलिस पाटील यांच्याशिवाय अद्याप कुणीही घराकडे फिरकले नसून व नाईलाजाने त्यांनी गोठ्यातील जनावरांना घरी अंगणात आणून बांधून ठेवले आहे. रात्रभर त्यांचे कुटुंब या ठिकाणी पहारा ठेवून आहेत.