आंबोली घाटात टेम्पो कोसळून एक ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आंबोली घाटात टेम्पो कोसळून एक ठार
आंबोली घाटात टेम्पो कोसळून एक ठार

आंबोली घाटात टेम्पो कोसळून एक ठार

sakal_logo
By

96457
आंबोली ः दरीत कोसळून टेम्पोचा अक्षरशः चेंदामेंदा झाला.

96458
आंबोली ः मृतदेह बाहेर काढताना आंबोली रेस्क्यू टीमचे सदस्य.

आंबोली घाटात टेम्पो कोसळून एक ठार
मृत चंदगडचा; वाहनावरील ताबा सुटल्याने प्रकार
सकाळ वृत्तसेवा
आंबोली, ता. १६ ः येथील घाटात सावरीचे वळण येथे गाडीवरील ताबा सुटल्याने ७० ते ८० फूट खोल दरीत टेम्पो कोसळून अपघात झाला. यात चालकाचा जागीच मृत्यू झाला. पुंडलिक सुरेश आसगावकर (वय २९, रा. मांडवळे तालुका चंदगड) असे मृताचे नाव आहे. हा अपघात काल (ता.१५) मध्यरात्री तीनच्या सुमारास घडला. दरम्यान, आज सकाळी आंबोली रेस्क्यू टीमच्या मदतीने त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की ः चालक पुंडलिक आसगावकर हा ४०७ टेम्पोने चंदगड येथून गोवा येथे काजू बोंडू देण्यासाठी गेला होता. तेथून पुन्हा माघारी येण्यासाठी निघाला. काल रात्री तो आंबोली घाटातील सावरीचे वळण येथे पोहचला. त्याला अवघड वळणाचा अंदाज न आल्याने त्याचा गाडीवरील ताबा सुटला असावा व गाडी खोल दरीत कोसळली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.
दरम्यान, आंबोली पोलिस दूरक्षेत्राचे पोलिस कर्मचारी दत्तात्रय देसाई व त्यांचे सहकारी सातोळी दाणोली येथील काम उरकून आंबोलीला जात होते. ते परतत असताना त्यांना रात्री उशिरा घाटात ७० ते ८० फूट खोल खाली दरीत आग पेटल्यासारखे दिसून आले. त्यांनी पाहणी केली असता गाडी कोसळल्याचे लक्षात आले. त्या गाडीची हेडलाईट सुरू असल्याचे दिसले. त्यानंतर श्री. देसाई हे गाडीपर्यंत पोहोचले व त्या ठिकाणी शोधाशोध केली असता त्यांना चालकाचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर आंबोली पोलिसांनी तत्काळ याबाबत आंबोली रेस्क्यू टीमला खबर दिली. आंबोली रेस्क्यू टीमचे दीपक मेस्त्री, प्रथमेश गावडे, विजय राऊत, वामन पालयेकर, सहदेव सनाम आदींच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला. यावेळी श्री. देसाई, दीपक शिंदे उपस्थित होते. त्यानंतर तो मृतदेह विच्छेदनासाठी आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पाठवण्यात आला. याबाबतची खबर मिळताच सावंतवाडी पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी घटनास्थळी जात पाहणी केली. मृत आसगावकर यांचे पाच वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्याच्या मागे पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. अपघाताची नोंद सावंतवाडी पोलिस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास सुरु आहे.