मंत्री केसरकरांचा ‘विकास’ वेडा

मंत्री केसरकरांचा ‘विकास’ वेडा

मंत्री केसरकरांचा ‘विकास’ वेडा

एकनाथ नाडकर्णी; दोडामार्गच्या हवाई पाहणीवरून टीका

सकाळ वृत्तसेवा
कळणे, ता. २२ : मंत्री दीपक केसरकर यांची ‘एक ना धड भाराभर चिंध्या’, अशी अवस्था झाली आहे. जमिनीवरच्या प्रश्नाचे उत्तर हवाई मार्गे शोधणाऱ्या केसरकरांचा ‘विकास’ वेडा झाला आहे. आमच्या नेत्यांना केसरकरांनी विकास काय असतो हे शिकवू नये, अशी टीका जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी यांनी आज केली.
श्री. केसरकर यांनी काल (ता. २१) दोडामार्गचा हवाई दौरा केला; मात्र ते आडाळी एमआयडीसीत आले नाहीत. या पार्श्वभूमीवर नाडकर्णी यांनी टीका केली. त्यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, केसरकरांचा विकास काय आहे, तो गेली १४ वर्षे दोडामार्गची जनता अनुभवते आहे. जो आमदार १४ वर्षे सत्तेत असतो, त्याला विकासाच्या मुद्यावरून टिकेला सामोरे जावे लागते, हे जनतेचे दुर्दैव आहे. केसरकर आपल्याच विश्वात रमणारे राजकारणी आहेत. स्वतःची अकार्यक्षमता कधी विरोधकांवर, नाहीतर अधिकाऱ्यांवर टाकायची त्यांची प्रवृत्ती आता जनतेच्या ध्यानात आली आहे. पहिल्या आमदारकीच्या काळात काथ्या उद्योगाचे आमिष दाखवून जनतेची दिशाभूल केली. येथील जनता शब्दावर विश्वास ठेवते. म्हणून केसरकर तीनवेळा आमदार झाले; पण जेव्हा विश्वासघाताची जाणीव जनतेला होते, तेव्हा जनता अहंकाराला गाडल्याशिवाय राहात नाही. आज केसरकरांनी जनतेची चेष्टा चालवली आहे. आडाळी एमआयडीबद्दल जो प्रकार गेली काही वर्षे केसरकर करत आहेत, तो स्थानिकांचा अपमान करणारा आहे. जेव्हा नारायण राणेंनी प्रकल्प मंजूर केला, तेव्हा हेच केसरकर प्रकल्पाच्या विरोधात स्थानिकांना हुसकावण्याचा प्रयत्न करत होते; मात्र स्थानिकांनी त्यांना प्रतिसाद दिला नाही. येथील बंधाऱ्याच्या कामाला विरोध करून हेच केसरकर राजकारण करत आहेत. आता उद्योग आणतो असे म्हणत हवाई पाहणीचे नाटक करणाऱ्या केसरकरांना जमिनीवरच्या प्रश्नांची जाणच राहिलेली नाही, हे काल स्पष्ट झाले. जर उद्योगच आणायचे असतील, तर पाहणी कसली करायला हवी? मंत्री आहात, तुमच्या हाताखाली प्रशासन आहे. त्यांच्याकडून काम करून घ्यायला हवीत. ते करायचे सोडून दौऱ्याच्या नावाखाली अधिकारी, कर्मचाऱ्यांना नाहक छळण्याचे उद्योग केसरकरांनी सुरू केले आहेत, असे यात नमूद आहे.
----
दौरा म्हणजे हवाई सफारीची हौस
पत्रकात पुढे म्हटले आहे की, ‘‘आडाळीत पाहणीसाठी तिलारीत हेलिपॅडवर हेलिकॉप्टर उतरले. नियोजित दौऱ्यानुसार शासकीय वाहनाने ते आडाळीत येणार होते. आता आडाळीत आले नाहीत तर म्हणे मोपा विमानतळामुळे सिग्नल मिळत नव्हते, म्हणून आडाळीत येता आले नाही, असे पत्रकारांना सांगितले. यांच्या शासकीय वाहनाला कधीपासून सिग्नल यंत्रणेची गरज भासू लागली? आजकाल हवेत असलेल्या केसरकरांना जमिनीवर आणण्यासाठी जनता उत्सुक आहे. कारण यांचा ‘विकास’च हवेत असतो, याची जाणीव जनतेला झाली आहे. कालचा दौरा म्हणजे आपली हवाई सफारीची हौस भागवणे, आपल्या कार्यकर्त्यांना दर्शन देणे, यासाठीच होता. जनतेच्या हितासाठी काम करणाऱ्या त्यांच्याच कार्यकर्त्यांनाही आता केसरकरांचे वागणे आवडलेले नसेल.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com