भविष्यात एसटी गॅस, इलेक्ट्रिकवर

भविष्यात एसटी गॅस, इलेक्ट्रिकवर

97823 - शेखर चन्ने

भविष्यात एसटी गॅस, इलेक्ट्रिकवर
---
व्यवस्थापकीय संचालक; सव्वापाच हजार गाड्या एलएनजीवर आणणार
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. २२ : एसटी महामंडळाच्या ताफ्यात पाच हजार ३०० बस डिझेलवरील आहेत. या सर्व गाड्या टप्प्याटप्प्याने एलएनजीवर (लिक्विडीफाईड नॅचरल गॅस) परावर्तीत केल्‍या जात आहेत. इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या पाच हजार १५० बस पुढील वर्षापर्यंत महामंडळाच्या सेवेत दाखल होतील. पुढील काळात गॅस आणि इलेक्‍ट्रिकवर चालणाऱ्या बसना प्राधान्य आहे. त्‍यामुळे साध्या एसटी गाड्याही वातानुकूलित होणार असून, ग्रामीण लोकांनाही किफायतशीर दरात प्रवास करता येईल, अशी माहिती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.
त्‍यांच्याबरोबर महामंडळाचे महाव्यवस्थापक अजित गायकवाड, उपमहाव्यवस्थापक श्रीनिवास जोशी, सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक अभिजित पाटील आदी उपस्थित होते. श्री. चन्ने म्‍हणाले, ‘‘प्रदूषणमुक्‍त आणि पर्यावरणपूरक एसटी चालविण्याला महामंडळाचे प्राधान्य आहे. कोरोना आणि संप यामुळे महामंडळाला प्रचंड तोटा झाला. प्रवासी दुरावले. मात्र, गेल्‍या दोन वर्षांत ८० टक्‍के प्रवासी पुन्हा एसटीकडे आले आहेत. त्यांना दर्जेदार सेवा देण्यासाठी अनेक निर्णय घेतले आहेत.’’
ते म्हणाले, ‘‘महामंडळाच्या ताफ्यात येत्या सहा महिन्यांत एक हजार सीएनजी बस येतील. त्यासाठी तीन एजन्सींची नियुक्ती आहे. पाच हजार १५० इलेक्ट्रिक बस पुढील वर्षापर्यंत दाखल होतील. राज्‍यातील सर्व आगारांना वेळेत आणि डिझेल दरापेक्षा २० टक्‍के कमी दराने एलएनजी पुरवठा व्हावा, यासाठी निविदा काढली आहे. त्याला मंजुरी मिळाल्‍यावर डिझेलवरील पाच हजार बस एलएनजीवर धावण्यास सज्‍ज असतील. घाटमार्ग, डोंगरदऱ्यांतून जाणाऱ्या मार्गावर इलेक्ट्रिक आणि एलएनजीवरील बस चालविणे कठीण होते. त्‍या मार्गावर डिझेलवरील दोन हजार बस खरेदी केल्या जाणार आहेत.’’
ते म्हणाले, ‘‘इलेक्‍ट्रिक आणि एलएनजीवरील बसचे भाडे किती असेल, याचा निर्णय त्‍या वेळी ठरविला जाईल. सर्व आगार ४० ते ५० वर्षांपूर्वी बांधलेले आहेत. त्या सर्व आगारांची सध्या दुरवस्था झाली आहे. त्‍यांचे नूतनीकरण टप्पाटप्प्याने केले जाईल. त्यासाठी यंदा सरकारने ४५० कोटींचा निधी दिला आहे. दरवर्षी याच धर्तीवर निधी मिळेल, अशी ग्‍वाही दिली. निधीच्या उपलब्‍धतेनुसार सर्व आगारांचे काम होईल.’’

खासगी चालकांनाही रीतसर प्रशिक्षण
एसटी महामंडळाच्या ताफ्यात येणाऱ्या पाच हजार १५० इलेक्ट्रिक बस भाडेतत्त्‍वावरील असतील. त्यात खासगी कंपनीचे चालक, तर एसटी महामंडळाचे वाहक असणार आहेत. अपघात टाळण्यासाठी चालकांना महामंडळाच्या चालकांप्रमाणे रीतसर प्रशिक्षण दिले जाईल. उत्तीर्ण होणाऱ्यांनाच या बससाठी निवड केली जाईल. शिवशाही बसवर खासगी चालक असल्‍याने सुरुवातीला अनेक अपघात झाले. मात्र, या चालकांनाही रीतसर प्रशिक्षण देण्यात आले. त्‍यामुळे अपघातांचे प्रमाण कमी झाले असल्‍याचे श्री. चन्ने म्‍हणाले.

कोकणासाठी विस्टाडोम बसगाड्या
सिंधुदुर्गात येणाऱ्या पर्यटकांसाठी रेल्‍वेच्या विस्टाडोम धर्तीवर विस्टाडोम बस तयार केली. त्याला महाबळेश्‍वरात पर्यटकांची मोठी पसंती असून, पुढील काळात रत्‍नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतही अशी बस आणण्याचा आमचा विचार आहे.

शासनाने ७५ वर्षांवरील नागरिकांना मोफत प्रवास, तर महिलांना ५० टक्‍के तिकीट सवलत दिली आहे. त्‍यामुळे स्मार्टकार्ड पद्धत आता बंद केली. एसटी वाहकाकडे असलेल्‍या यंत्रात सर्व प्रकारची एटीएम कार्ड चालतील, अशी व्यवस्था आहे. येत्‍या जूनपासून याची अंमलबजावणी सुरू होईल.
- शेखर चन्ने, व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com