केसरकरांचा हवाई दौरा चर्चेचा विषय

केसरकरांचा हवाई दौरा चर्चेचा विषय

97845
खानयाळे ः येथे हेलिपॅडवर मंत्री दीपक केसरकर. (छायाचित्र ः संदेश देसाई)


केसरकरांचा हवाई दौरा चर्चेचा विषय

दोडामार्गप्रश्नी नाडकर्णींचा निशाणा; आडाळीत आता उद्या येणार

सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग ता. २२ : शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचा कालचा (ता. २१) तालुक्याचा हवाई दौरा चर्चेचा विषय ठरला आहे. आडाळी एमआयडीसीची नियोजित भेट असतानाही ते तेथे गेले नसल्याने स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली होती. यातच आज भाजपच्या एकनाथ नाडकर्णी यांनी ही हवाई सफर नेमकी कशासाठी होती आणि त्याचा प्रायोजक कोण होता, असा आरोप केल्याने दौरा आणखी चर्चेचे कारण ठरला. केसरकर यांच्या समर्थकांच्यावतीने मात्र या दौऱ्याबाबत गैरसमज पसरवले जात असल्याचा दावा करून ते सोमवारी (ता. २४) आडाळीत येणार असल्याचे सांगण्यात आले.
शिक्षणमंत्री केसरकर यांचा शासकीय दौरा शुक्रवारी झाला. हा दौरा आडाळी एमआयडीसीमध्ये उद्योग आणण्याच्या दृष्टीने तेथील जागा पाहणीसाठी होता. ते आडाळी येथे एमआयडीसीच्या जागेत प्रत्यक्ष येऊन पाहणी करणार असल्याचे सांगण्यात आले होते. हेलिकॉप्टरने ते खानयाळे येथेही महालक्ष्मी विद्युतच्या हेलिपॅडवर उतरून पुढे आडाळी येथे रवाना होणार होते. त्यामुळे आडाळी एमआयडीसीच्या जागेत स्थानिक सरपंच, कार्यकर्ते व ग्रामस्थ त्यांच्या स्वागतासाठी सकाळी अकरापासूनच सज्ज होते. दुपारी तीनपर्यंत त्या ठिकाणी त्यांची वाट पाहत होते.
केसरकरांचे हेलिकॉप्टर महालक्ष्मीच्या हेलिपॅडवर दुपारी अकराच्या सुमारास उतरण्याची वेळ होती. शासकीय दौरा असल्याने निश्चित वेळेत तहसीलदार व महसुलचे अन्य कर्मचारी, पोलिस यंत्रणा, पाठबंधारे विभागाचे अधिकारी व कर्मचारी, बांधकाम विभागाचे अधिकारी, शिवसेनेचे कार्यकर्ते, पत्रकार उपस्थित होते. दोन रुग्णवाहिका व सावंतवाडी येथील अग्निशमनचा बंब सज्ज होता. प्रत्यक्षात मंत्र्यांचे हेलिकॉप्टर दुपारी दोनला उतरले. हेलिकॉप्टरमधून मंत्री केसरकर उतरताच त्यांचे स्वागत करण्यात आले. केसरकर यांनी सर्वांशी संवाद साधला. यावेळी तिलारीची हवाई पाहणी केल्याचे ते बोलले; परंतु मुंबई येथे तात्काळ बैठक असल्याचे सांगून आडाळी एमआयडीसीची पाहणी न करता निघून गेले. आडाळी ग्रामस्थांबरोबरच अनेकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली.
---
नाडकर्णींकडून विविध प्रश्न
दरम्यान, दौरा नेमका कशासाठी होता, अशी चर्चा आज दिवसभर रंगली. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा भाजपचे नाडकर्णी यांनी याबाबत आज आरोप केला. हा दौरा आडाळीत उद्योगासाठी होता की तिलारीतील जमिनीसंदर्भात? असा प्रश्न करत त्यांच्या सोबत कोण होते? हेलिकॉप्टरचे प्रायोजक कोण? केसरकर नेमके कशासाठी हवाई सफरीवर आले होते? असा सवाल त्यांनी पत्रकातून उपस्थित केला. केसरकरांचे समर्थक तथा शिवसेनेचे तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस यांनी मात्र हे आरोप फेटाळले.
...............
कोट
शिक्षणमंत्री दीपक केसरकरांचा दौरा आडाळी एमआयडीसीत उद्योग आणण्याच्या हेतूनेच होता. त्यासाठी त्यांनी उद्योजकालाही सोबत आणले होते; परंतु मुख्यमंत्र्यांनी मुंबई येथे मंत्र्यांची तात्काळ बैठक बोलावल्याने त्यांना जावे लागले. येत्या सोमवारी पुनश्च केसरकर यांचा आडाळी येथे दौरा होणार आहे. एमआयडीसी जागेत उद्योग आणण्याच्या दृष्टीने त्यांचा प्रामाणिक प्रयत्न आहे. त्यामुळे जनतेने मनात गैरसमज करू नये.
- गणेशप्रसाद गवस, तालुकाप्रमुख, शिवसेना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com