वैद्यकीय सुविधांसाठी पाठपुरावा करणार

वैद्यकीय सुविधांसाठी पाठपुरावा करणार

99358
मसुरे ः मानवता विकास परिषदचे अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी जिल्हा रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन श्रीपाद पाटील यांची भेट घेतली.


वैद्यकीय सुविधांसाठी पाठपुरावा करणार

श्रीकांत सावंत; मसुरेत मानवता विकास परिषद

मालवण, ता. २९ : प्रत्येक जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज निर्माण व्हावीत आणि या कॉलेजमधून मातृभाषेतून शिक्षण मिळावे, प्रत्येक ग्रामीण भागामध्ये डॉक्टर्स उपलब्ध व्हावेत आणि या सर्व रुग्णालयांमध्ये चांगल्या प्रकारे वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी मानवता विकास परिषदेतर्फे योग्य पाठपुरावा करण्यात येणार आहे. या सर्व अभ्यास दौऱ्यादरम्यान विविध ठिकाणी भेटीगाठी घेऊन याबाबतचा अहवाल शासन दरबारी लवकरच मांडणार असून खेड्यांचा विकास करण्याचे ध्येय नजरेसमोर आहे, असे प्रतिपादन मानवता विकास परिषदचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी येथे केले.
‘खेड्यांचा सर्वांगीण विकास हाच राष्ट्र विकास’, हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून मानवता विकास परिषद या महाराष्ट्रातील अग्रगण्य अशा सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सावंत यांनी नुकताच कोकणामध्ये अभ्यास दौरा केला. यामध्ये त्यांनी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध ठिकाणी भेटीगाठी घेऊन याबाबतचा एक अहवाल तयार करून लवकरच शासन दरबारी मांडण्यात येणार असल्याची माहिती दिली.
अभ्यास दौऱ्यादरम्यान सावंत यांनी जिल्हा रुग्णालयात सिव्हिल सर्जन डॉ. श्रीपाद पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेऊन वैद्यकीय सुविधांबाबत सविस्तर चर्चा केली. वैद्यकीय सेवा देताना प्रशासनास कोणत्या त्रुटी येत आहेत, याबाबतची माहिती करून घेतली. यानंतर सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. प्रकाश गुरव आणि डॉ. मनोज जोशी यांच्याशी चर्चा केली. याबाबत लवकरच प्रशासन दरबारी योग्य तो आवाज मानवता विकास परिषदच्यावतीने उठविण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
यानंतर सावंत यांनी सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पाटील यांची भेट घेऊन विकासात्मक कामांबाबत चर्चा विनिमय केला. ग्रामीण भागातील विकास कशा पद्धतीने करता येईल, याबाबत सविस्तरपणे चर्चा केली. या अभ्यास दौऱ्यादरम्यान मानवता विकास परिषदेचे येथील कार्यकर्ते ऐश्वर्य मांजरेकर यांनी श्रीकांत सावंत यांचे बांबर्डे येथे स्वागत केले. ‘कॉनबॅक’, या सामाजिक संस्थेसही भेट दिली. या ठिकाणी संस्थेचे श्रीहरी यांनी सावंत यांचे स्वागत करून सविस्तर चर्चा केली. यानंतर मिलिंद पाटील यांच्या पिंगुळी येथील सह्याद्री बांबू नर्सरी व प. पू. राऊळ महाराज मठ येथे भेट दिली. तेथे सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर भाईप, विठ्ठल सावंत, पत्रकार परेश राऊत, विजय केनवडेकर, उंब्रज येथील मधुसूदन कांदे या सर्वांशी कुक्कुटपालन, अंडी व्यापार, आधुनिक शेती, ग्रामीण विकास याबाबत सविस्तर चर्चा केली. माणगाव येथे प.पू. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांच्या दत्त मंदिरास भेट देऊन पालखी सोहळ्यासही उपस्थिती दर्शविली. भगीरथ ग्रामीण विकास प्रतिष्ठानला भेट देत व्यवस्थापक नवीन मालवणकर यांच्याकडून संस्थेच्या कारभाराबाबत माहिती जाणून घेतली. यावेळी मानवता विकास परिषदेचे ऐश्वर्य मांजरेकर आदी उपस्थित होते.
--
भेटींचा अहवाल देणार शासन दरबारी
युवा उद्योजक संतोष खोत यांच्या अॅग्रो फार्मला भेट देत त्यांच्या मिरी, सुपारी या ग्रामीण भागातील उद्योगांच्या मार्केटिंगबाबत चर्चा केली. जिल्ह्यातील राजकीय-सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संस्था, विविध संघटनांना भेट देऊन ग्रामीण भागाच्या विकासाबाबत चर्चा केली. जिल्ह्यातील धार्मिक स्थळांना भेट देऊन पर्यटनाच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये रोजगार निर्माण करण्यासाठी काय करता येईल, याची माहिती घेतली. या सर्वांचा अहवाल तयार करून शासन दरबारी त्याचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन सावंत यांनी यावेळी दिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com