ःजिल्ह्यातील भूजल पातळी खालावली

ःजिल्ह्यातील भूजल पातळी खालावली

२४ (पान २ साठीमेन)

जिल्ह्यातील भूजल पातळी खालावली

रेनवॉटर हार्वेस्टिंगची गरज ; जलप्रेमींचा सीईओंना कृती आराखडा सादर
सकाळ वृत्तसेवा
दाभोळ, ता. २९ ः रत्नागिरी जिल्ह्याची भूजल पातळी यावर्षी ०.०९ मीटर अर्थात सुमारे अडीच फुटाने खालावली आहे. गेल्या पाच वर्षात प्रथमच भूजल पातळी खालावली आहे. यामुळे यावर्षी जिल्हा तहानलेला राहतो आहे. अनेक तालुक्यात टँकरच्या फेऱ्या आणि पाणी भरण्याची केविलवाणी पळापळ असे दृश्य दिसू लागले आहे.
पुढील वर्षी पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये आणि भूजल पातळीत वाढ व्हावी याकरिता जल अभ्यासक आणि जलसाक्षरता समिती रत्नागिरीचे जलप्रेमी प्रशांत परांजपे यांनी रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना एक कृती आराखडा सादर केला आहे. या आराखड्यानुसार प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रातील छपरावर पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब रेनवॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून जमिनीत जिरवणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले आहे तसेच विंधन विहीर (बोरवेल)आणि विहीर पुनर्भरण हे देखील अत्यावश्यक असल्याचे मत त्यांनी नोंदवले आहे. या आराखड्यानुसार ग्रामपंचायत प्रशासन आणि सरपंच, संचालक व पाणी आणि स्वच्छता समिती यांनी १ मे पासून गावातील वाडी, नगर, वसाहत, समाजमंदिर येथे कॉर्नर मिटिंग घेऊन छपरावरील पाणी जमिनीत जिरवण्याबाबत जनजागृती करावी. १५ मे पर्यंत गावातील सर्व सार्वजनिक इमारती आणि बहुमजली इमारतींचे रेनवॉटर हार्वेस्टिंगचे काम पूर्ण करावे. १६ ते २५ मे गावातील नदी, नाले, सार्वजनिक विहिरी स्वच्छ करून गाळ उपसा करणे व विहीर व विंधन विहीर पुनर्भरणाचे काम पूर्ण करणे. १६ ते ३१ मे या कालावधीत झालेल्या कामांचा आढावा घेऊन त्रुटी दूर करणे. १ ते ४ जूनदरम्यान गावातील सांडपाणी व्यवस्थापन अद्ययावत करणे. ५ जून पर्यावरण दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करणे.
या विषयाबाबत रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील सरपंच, आशाताई, अंगणवाडी सेविका आणि जलसुरक्षक यांचे जलजीवन मिशनबाबत प्रशिक्षण सुरू आहे. सर्व नागरिकांनी आनंददायी भविष्याचा विचार करून आपल्या छपरावर आणि अंगणात पडणाऱ्या पावसाचा थेंब जिरवण्याचे कळकळीचे आवाहन परांजपे यांनी केले आहे.
--

जलदिंडी, पथनाट्यातून जागृती करा
या अनुषंगाने प्रभाग, वाडी, वसाहत, नगरस्तरावर स्वच्छ व जलयुक्त आवार या विषयांतर्गत स्पर्धांचे आयोजन करावे आणि गावातील सांस्कृतिक मंडळींच्या माध्यमातून पथनाट्याद्वारे जनजागरण करावे. परिसंवाद, गीतगायन स्पर्धेचे आयोजन करावे. जलदिंडी काढून गावजागर करावा तसेच वनीकरण करताना एक रोप दोन खड्डा या संकल्पनेद्वारे एका खड्ड्यात रोप लावा व एक खड्डा पावसाचे पाणी जिरवण्यासाठी मोकळा सोडावा व पावसाळ्यानंतर तो खड्डा बुजवावा. यातून पाणीपातळीत वाढ होण्यास मदत होईल.
--
दृष्टीक्षेपात...
* १ मे पासून जनजागृती
* विहीर पुनर्भरण गरजेचे
* सार्वजनिक इमारतींवरील पाणी जिरवा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com