रत्नागिरी-आंदोलकांशी संवादासाठी सरकारची 4 पावले पुढे

रत्नागिरी-आंदोलकांशी संवादासाठी सरकारची 4 पावले पुढे

आंदोलकांशी संवादासाठी सरकारची पावले

उदय सामंत ः माती परीक्षण अहवालानंतरच प्रकल्पाचा निर्णय

उदय सामंत म्हणाले
* आंदोलकांवर लाठीचार्ज झाल्याचा इन्कार
* पोलिस ग्रामस्थांना अडवताना झटापट
* तरीही काही झाले असेल तर चौकशी
* महिला आंदोलकांना घरापर्यंत सोडले
* ३७ आंदोलकांवरील ३५३ कलम रद्द
* वेळ पडल्यास नोटिसासुद्घा रद्द करू

रत्नागिरी, ता. २९ : बारसूबाबत गैरसमज पसरविला जात आहे की, पोलिस बळाचा वापर करून प्रकल्प रेटवून नेण्याचा प्रयत्न सुरू आहे; परंतु असे कुठेही नाही. स्थानिकांशी संवाद साधून पुढील निर्णय घेतला जाईल. शासन आणि प्रशासनानेही या दिशेने चार पावले पुढे टाकली आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर ३६ लोकांवरील ३५३ हे कलम रद्द करण्याचा निर्णय घेतला. ज्या जमीन खरेदी-विक्रीमध्ये शासकीय अधिकारी आहेत, त्यांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात बारसूसंदर्भात झालेल्या बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. सामंत म्हणाले, बारसूमध्ये बोरवेल खोदून पिलर उभारले जाणार असल्याचा गैरसमज लोकांमध्ये पसरविला जात आहे. ९ ते १० दिवसांत माती परीक्षणाचे काम झाल्यानंतर बारसू येथील माती जागतिक पातळीवरील कंपनीकडे तपासणीसाठी पाठवली जाणार आहे. या माती परीक्षणाच्या अहवालानंतरच प्रकल्प होणार की नाही ते ठरणार आहे. बारसू रिफायनरीबाबत स्थानिकांचा विरोध लक्षात घेता, त्यांच्यासोबत बैठक लवकरच मुंबईत मुख्यमंत्री यांच्यासोबत घेतली जाईल, याच पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी कार्यालयात खासदार विनायक राऊत यांच्यासोबतदेखील बैठक झाली. बैठकीला खासदार राऊत, कोकण परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक प्रवीण पवार, जिल्हाधिकारी देवेंदर सिंह, पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, राजापूर उपविभागीय अधिकारी वैशाली माने, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रादेशिक अधिकारी वंदना करमाळे आदी उपस्थित होते.
पोलिस दलाचा वापर हा कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी करण्यात आला आहे. नागरिकांच्या विरोधात जाऊन कोणताही निर्णय घेण्यात येणार नाही. आजपर्यंत दडपशाही केली नाही, गैरसमज दूर करणार आहोत. मातीच्या परीक्षणानंतर प्रकल्प होणार की नाही हे निश्चित होणार. प्रकल्प रेटून नेणार नाही, बेरोजगारी दूर करणारा प्रकल्प आहे. स्थानिकांशी थेट चर्चा सुरू झाली आहे. मला बारसूला जावे लागले तरी मी शेतकऱ्यांशी चर्चा करायला तयार आहे, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.
-----------------------------
चौकट
अधिकाऱ्यांची चौकशी
अनेक शासकीय अधिकाऱ्यांनी या भागात जमीन खरेदी केल्याच्या तक्रारी आहेत. याबाबत खासदार राऊत यांनीही तक्रार केली आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय समिती नेमून याची चौकशी केली जाईल. कशा पद्धतीने त्यांनी जमीन खरेदी केली आहे, हे पाहून बेकायदेशीर जमीन खरेदी केल्याचे आढळल्यास त्यांना तत्काळ निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. महावितरणच्या ज्या अभियंत्याने १३७ गुंठे जमीन खरेदी केली आहे त्याची तत्काळ मुख्यालयात बदली केली आहे.
------------
चौकट-
उद्धव ठाकरेंनाही ब्रिफिंग
उद्धव ठाकरे यांच्याशीही चर्चा करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यांना ब्रिफिंग करण्यासाठी वेळ घेतली जाणार आहे. त्यांच्या शंकांचे निरसन केले जाईल. यापूर्वी मी शरद पवार, अजित पवार यांच्याशी चर्चा केली आहे. आणखी कोणत्या पक्षाशी चर्चा करायची असेल तर माझी तयारी आहे. संयमाने चर्चेतून हा विषय हाताळण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे सामंत म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com