रत्नागिरी-सुधारित बातमी

रत्नागिरी-सुधारित बातमी

३०९ भूमाफियांकडून जमीन खरेदी

खासदार राऊत; पोलिस, महावितरण, महसूलचेही अधिकारी

रत्नागिरी, ता. २९ ः शासन बारसू येथे बळाचा वापर करून प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न करत आहे; परंतु आम्ही ते होऊ देणार नाही. शासनाला रिफायनरी प्रकल्प होण्याची चिंता नाही, तर ज्या ३०९ भूमाफियांनी जमीन खरेदी केली आहे, ते गब्बर कसे होतील, याची चिंता सतावत आहे. या भूमाफियांमध्ये १४४ लोक जम्मू-कश्मीर, दिल्ली, मध्य प्रदेशमधील आहेत. उर्वरित जमीन व्यवहारामध्ये पोलिस दल, महावितरण कंपनी आणि महसूल विभागातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे, असा आरोप खासदार विनायक राऊत यांनी केला.
नाणार येथील हे सर्व व्यवहार २०२१-२२ मध्ये झाले असून, ते चुकीच्या पद्धतीने झाले आहेत. मुख्यमंत्र्यांनी याची चौकशी करून ते रद्द करावेत, अशी मागणी राऊत यांनी केली. येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राऊत म्हणाले, ‘बारसू प्रकल्प स्थानिकांवर जबरदस्तीने लादण्यापेक्षा शासनाने आणि प्रशासनाने त्यांचे म्हणणे ऐकून घेतले पाहिजे. काही लोकप्रतिनिधी जाऊन आंदोलकांची माथी भडकवण्याचे काम करत आहेत, असा आरोप पालकमंत्री सामंत करत आहेत. मग जेव्हा ७० टक्के स्थानिकांच्या उपस्थितीत प्रकल्पाचे प्रेझेंटेशन देण्यात आले होते, तेव्हा तेथे भाजपचे एक टोळके आले होते. त्याची माहिती पालकमंत्र्यांनी घ्यावी. विरोधकांनी तज्ज्ञांसमोर बोलून दिले नाही, हे दिसते. मग या महत्त्वाच्या बैठकीपासून प्रसारमाध्यमांना बाहेर का ठेवले? भूमाफियांच्या दबावामुळे मीडियाला बाहेर काढण्यात आले ही कोणती दादागिरी? काल आंदोलकांवर पोलिसांनी अश्रुधूर सोडले, लाठीमार केला यामध्ये अनेकजण जखमी झाले. पोलिस कर्मचारीही जखमी झाले असतील; पण वेळीच संवाद साधला असता तर ही वेळच आली नसती.
कालच्या आंदोलनामध्ये १६४ महिलांना, तर ३७ पुरुषांना पोलिसांनी पकडले. चार आंदोलक यामध्ये जखमी झाले आहेत. त्यांना उपचारानंतर सोडण्यात आले, तर एक आंदोलक राजापूर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचार घेत आहे. या वेळी जिल्हा संपर्कप्रमुख मोरे, जिल्हाप्रमुख विलास चाळके, राजेंद्र महाडिक, बंड्या साळवी, प्रशांत साळुंखे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
--------------
चौकट-१
महावितरणच्या अधिकाऱ्याची १३७ गुंठे जागा
महावितरण कंपनीच्या एका उपअभियंत्याने नाणारमध्ये सुमारे १३७ गुंठे जमीन खरेदी केली आहे. त्यामुळे त्या अधिकाऱ्याचे उत्पन्न किती असेल, याचा विचार करण्यासारखे आहे. या अधिकाऱ्याबाबत अनेक तक्रारी आहेत. जास्त रीडिंग दाखवून अनेक प्रकरणे सेटलमेंट करून हा अधिकारी गब्बर झाला आहे; परंतु त्याच्यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही, अशी माहिती खासदार राऊत यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com