चिंचनाक्यातील वाहतूक कोंडीत वाढ

चिंचनाक्यातील वाहतूक कोंडीत वाढ

rat2p18.jpg
99926
चिपळूणः शहरातील चिंचनाक्यात वाहतूक कोंडीचा प्रश्न जटील झाला आहे.
----------------
चिंचनाक्यात वाहतूक कोंडीने वाहनचालक हैराण
पोलिसांची गरज; अस्ताव्यस्त पार्किंगमुळे वाहतुकीत अडथळे
चिपळूण, ता. २ः शहरातील चिंचनाका भागात वाहतूक कोंडीची समस्या सतत भेडसावत आहे. येथील वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी वाहतूक पोलिसांची गरज आहे; मात्र चिंचनाक्यात वाहतूक पोलिस नसल्याचा गैरफायदा प्रवासी घेत आहेत.
एकीकडे उन्हाचा पारा चढू लागला आहे. त्यातच चिपळूण शहरातील वाहतूक कोंडीतही भर पडली आहे. चिंचनाक्यातील रस्ता अरुंद आहे. त्यातच रस्त्यावर रिक्षा थांबा तयार करण्यात आला आहे. वाहनचालक रस्त्यावरच वाहने पार्क करून खरेदीसाठी निघून जातात. आज सकाळी चिंचनाका येथे पिण्याच्या पाइपलाइनचे काम सुरू होते. त्यामुळे सकाळपासून वाहतूक कोंडी झाली होती. चिंचनाक्यातून वडनाका, मुख्यबाजारपेठ, मध्यवर्ती बसस्थानक आणि बहादूरशेख नाका या चार दिशेने जाता येते. त्यामुळे चौकात येणाऱ्या वाहनाची संख्या मोठी असते. गुहागर, खाडीपट्टा, दसपटी आणि पूर्व विभागाकडे जाणाऱ्या एसटीच्या काही फेऱ्या शहरातून जातात.
एसटी बस आणि मालवाहू वाहने शहरातील रस्त्यावर आल्या की वाहतूककोंडीचा प्रश्न निर्माण होतो. तासनतास वाहनचालकांना कोंडीमध्ये अडकावे लागते. प्रामुख्याने बहादूरशेख नाका येथून चिपळूण शहरात येणारी वाहने चिंचनाक्यात अडकत होती. चौपदरीकरणाच्या कामामुळे विरेश्वर कॉलनीकडे येणारा मार्ग बंद करण्यात आला आहे. त्यामुळे शहरात येणारी वाहने काविळतळी-चिंचनाकामार्गे शहरात येतात. बुरूमतळी, मध्यवरी बसस्थानकाकडे येणारी वाहनेही काविळतळी मार्गेच येत आहेत. त्यामुळे चिंचनाका परिसरात कोंडीची समस्या भेडसावत आहे. या कोंडीवर मार्ग काढण्यासाठी वाहतूक पोलिसांची चिंचनाक्यात नेमणूक करणे गरजेचे आहे. चिपळूण पोलिस ठाण्याचा एक वाहतूक पोलिस कर्मचारी येथे नियुक्त केलेला असतो. तो अपवादानेच येथे सेवा करताना दिसतो. रस्त्याच्या कडेला रिक्षाथांबा तेथेच खासगी वाहने पार्क केलेली आणि भाजीविक्रेत्यांचा ठिय्याही नाक्यात असतो. त्यावर कुणाचेही नियंत्रण नाही.

कोट
चिंचनाक्यात सध्या मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. ती सोडवण्यासाठी येथे वाहतूक पोलिसांची नेमणूक करणे गरजेचे आहे. येथे अनावधानाने पोलिस दिसतात; मात्र पोलिस कर्मचारी नसल्यामुळे वाहन चालकांमध्येही किरकोळ स्वरूपाची भांडणे नेहमी होतात.
- प्रथमेश वाडकर, चिपळूण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com