पर्यटनातील नवा ट्रेंड डोकेदुखी

पर्यटनातील नवा ट्रेंड डोकेदुखी

KOP23M00005
मालवण ः उन्हाळी सुटीमुळे येथील पर्यटन बहरले असून रॉकगार्डन परिसर पर्यटकांच्या वाहनांनी असा गजबजून गेला आहे. (छायाचित्र ः प्रशांत हिंदळेकर)


पर्यटनातील नवा ट्रेंड डोकेदुखी

मालवणातील स्थिती; निवास व्यवस्थेसह हॉटेलिंगमध्ये जीवघेणी स्पर्धा

प्रशांत हिंदळेकर ः सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २ ः उन्हाळी सुट्यांमुळे मालवणचे पर्यटन बहरलेले दिसून येत आहे; मात्र यात निवासव्यवस्थेचे दर आकारण्यात पर्यटन व्यावसायिकांमध्ये सुरू झालेली जीवघेणी स्पर्धा, येथील व्यावसायिकांसाठी डोकेदुखी ठरली आहे. यातच पर्यटकांनी मासळी आणून दिल्यास ती बनवून देण्याचा नवा ट्रेंड सुरु झाल्याने हॉटेल व्यवसायालाही मोठा फटका बसत आहे. एकूणच येथे काही काळापूर्वी वाढत असलेला पर्यटन व्यवसाय आता नव्या वळणावर पोहचला आहे. यातच अंमली पदार्थांसह व्यसनाधिनतेचे काही प्रकारही धोक्याची घंटा वाजवणारे ठरत आहेत.
पर्यटनाची राजधानी म्हणून मालवणकडे बघितले जाते. गेल्या काही वर्षात समुद्राखालील अनोखे विश्‍व पाहण्याची संधी स्कूबा, स्नॉर्कलिंगमुळे उपलब्ध झाली आहे. याबरोबरच साहसी जलक्रीडा प्रकार यामुळे येथील पर्यटन हंगाम हा गेल्या काही वर्षात बहरत असल्याचे दिसून येत आहे. पर्यटकांना अत्यावश्यक सोईसुविधा पर्यटन व्यावसायिकांनी उपलब्ध करून दिल्याने दरवर्षी लाखोंच्या संख्येने येथे दाखल होत असून त्यांच्याकडून सागरी पर्यटनाचा आनंद लुटला जात आहे. पर्यटनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होत असल्याने नोकरीच्या मागे न लागता अनेक तरूण बेरोजगारांनी पर्यटन व्यवसायात उतरण्याचे धाडस दाखवित त्यातून गेल्या काही वर्षात चांगले अर्थांजन मिळविण्यास सुरवात केल्याचे किनारपट्टी भागात पहावयास मिळत आहे.
सागरी पर्यटनासाठी सिंधुदुर्गात पर्यटक जास्ती पसंती देतात. वर्षातील साधारणतः ८० ते १०० दिवसांचा हा पर्यटन उद्योग सुरू असतो. गेल्या दोन वर्षाच्या कोरोना महामारीच्या काळानंतर पर्यटन व्यवसाय आता खर्‍या अर्थांने उभारी घेत असल्याचे दिसून येत आहे; परंतु सर्वात मोठी समस्या निर्माण झाली असल्याचे दिसून येत आहे. यात हॉटेल्स, होम-स्टे, रिसॉर्टची जी वर्गवारी आहे. त्यात जी निवासव्यवस्थेची दर आकारणी केली जाते. यात ज्यांच्याकडे चांगल्या सोईसुविधा उपलब्ध आहेत. त्यांच्या निवासव्यवस्थेचे दर १५०० ते २५०० रुपये प्रतिदिवस असे आहेत. असे पर्यटन व्यावसायिक विनाकारण स्पर्धा करताना दिसून येत आहे. संबंधितांकडून ३० ते ४० टक्के दर कमी करून पर्यटकांना निवासाची व्यवस्था करून दिली जात आहे. परिणामी याचा फटका ज्यांच्याकडे चांगल्या सुविधा आहेत मात्र ते दर स्थिर ठेवून व्यवसाय करू पाहतात अशा पर्यटन व्यावसायिकांना बसत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात नवा ट्रेंड निर्माण झाला आहे. पर्यटक बुकींग करून येण्यापेक्षा थेट रिसॉर्ट, निवास न्याहरी, हॉटेल्सच्या ठिकाणी येऊन दरांमध्ये आपल्याला हवी तशी तडजोड करून घेत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भविष्यात जर अशीच परिस्थिती राहिल्यास निवास व्यवस्थेचा जो व्यवसाय आहे तो कोलमडण्याची भीती निर्माण झाली आहे.
किनारपट्टी भागास पर्यटकांची जास्त पसंती असल्याचे दिसून येत आहे. मात्र गेल्या काही वर्षात पर्यटकांनाच तुम्ही मासे आणून द्या ते बनवून देतो असे पर्यटन व्यावसायिकांकडून सांगितले जात असल्याने हा नवा ट्रेंड या क्षेत्रात निर्माण झाला असल्याचे दिसून येत आहे. यामुळे येथे येणारा पर्यटक हा थेट मासळी लिलावाच्या ठिकाणी जावून मासळी खरेदी करतात. मग ती वास्तव्यास असलेल्या हॉटेलच्या ठिकाणी येऊन त्या व्यावसायिकाला ती बनविण्याचे सांगून किलोप्रमाणे दर निश्‍चित करून घेतात. ही प्रथा म्हणजे वेगळ्या प्रकारची कीड या व्यवसायास लागली आहे. जेमतेम १०० दिवसांच्या या पर्यटन व्यवसायाच्या काळात किलोवर असे मासे बनवून दिल्यास तर व्यावसायिक पैसे कमावणार केव्हा? बँकांचे हफ्ते, विविध शासनाचे कर कोठून भरणार? जेव्हा एखादा पर्यटक हॉटेलला वास्तव्यास असतो त्यावेळी त्याचे जेवण, वास्तव्य याचा विचार केला तर त्यातून सरासरी वार्षिक खर्च निघत असतो; परंतु असे जे प्रकार किनारपट्टी भागात सध्या सुरू आहेत हे चुकीचे असून येणाऱ्या काळात पर्यटन व्यावसायिकांनी यातून स्वतःला सावरण्याची गरज आहे. आपण जो व्यवसाय करत आहोत. तो कमर्शिअल पद्धतीने करायला हवा. कारण पर्यटक येथे पैसे खर्च करण्यासाठी येतात. व्यावसायिकांनी जर त्यांचे पैसे वाचविण्याचे पर्याय उपलब्ध करून दिले तर त्याचा परिणाम येणाऱ्या काळामध्ये पर्यटन व्यवसायावरच होणार आहे. या गंभीर बाबींकडे लक्ष न दिल्यास हा व्यवसाय कमर्शिअल पद्धतीने व्यवसाय करणाऱ्यांच्या हाती जाण्याची शक्यता असून याचा फटका स्थानिक पर्यटन व्यावसायिकांना बसण्याची भीती आहे. त्यामुळे पर्यटन व्यावसायिकांनी आताच सावध होण्याची गरज निर्माण झाली आहे.
किनारपट्टीच्या भागात राहत्या घरांमध्ये पर्यटन व्यवसाय हा जोडधंदा म्हणून सुरू झाला आहे. त्यामुळे येथे येणार्‍या पर्यटकांना निवासव्यवस्था, जलक्रीडा प्रकारांच्या ठिकाणी पोचविण्यासाठी मार्केटिंगचे काम करण्यामध्ये युवकांची संख्या मोठी असल्याचे दिसून येते. मार्केटिंगच्या माध्यमातून या युवकांच्या हाती मोठ्या प्रमाणात कमीशन मिळत आहे. मोठ्या प्रमाणात कमीशन मिळत असल्याने अचानक आलेले पैसे हे खर्च कुठे करायचे? हे समजत नाही. त्यामुळे किनारपट्टी भागात या युवकांमध्ये व्यसनाधिनता वाढत असल्याचे चित्र आहे. युवकांमधील वाढती व्यसनाधिनता हा गंभीर विषय बनला असून या युवकांचे समुपदेशन करण्याची गरज निर्माण झाली आहे. मच्छीमार समाजात कष्टाने शिकून वकील, डॉक्टर बनली आहेत. दुसर्‍या बाजूला सहजरित्या पैसा मिळत असल्याने युवकांना मिळत असल्याने भविष्यात ही मुले शिक्षण सोडून, विविध क्षेत्रात नावलौकीक मिळविण्याचे सोडून या अर्थांजनामुळे व्यसनाधिनतेत अडकून वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे.
---------
चौकट
23M00006
वाहतूक कोंडीची समस्या गंभीर
उन्हाळी सुटी काळात येथे लाखोंच्या संख्येने पर्यटक दाखल होत असल्याने शहरातील विविध नाक्यांवर सध्या वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. सध्या केवळ एकच वाहतूक पोलिस कर्मचारी असल्याने त्यांच्यावर ही कोंडी सोडविताना मोठा ताण येत आहे. वस्तुतः दरवर्षी पर्यटन हंगामात मालवणात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असल्याने याठिकाणी जिल्हा पोलिस अधीक्षक जास्त वाहतूक पोलिस कर्मचार्‍यांची नियुक्ती करत होते. मात्र यावर्षी पर्यटन हंगाम तेजीत असताना अशा वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांची नियुक्ती न केल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. भरड नाका, वायरी-तारकर्ली नाका, देऊळवाडा ते भरड या मार्गावर सध्या सातत्याने वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिकांचे हाल होत आहे. याकडे गांभीर्याने लक्ष पुरवून पोलिस अधीक्षकांनी वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे अत्यावश्यक बनले आहे.
------------
कोट
पर्यटनास धोका
मालवण या पर्यटन राजधानीत सध्या पर्यटनात विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. किनारपट्टी भागातील युवकांमध्ये वाढत असलेली व्यसनाधिनता, दरांमधील जीवघेणी स्पर्धा यासह अन्य समस्यांमुळे येथील पर्यटनास धोका निर्माण झाला आहे. या सर्व बाबींचा विचार करता व्यसनाधिनतेत अडकलेल्या या युवक वर्गासाठी शाळांमधून समुपदेशनाचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
त्याचबरोबर पालकांनीही आपल्या पाल्यावर लक्ष देवून आर्थिक नियोजनामध्ये त्यांना कशाप्रकारे मदत करता येईल याचे ज्ञान दिले जाणार आहे.
---
कोट
पर्यटन व्यावसायिक महासंघ या समस्यांकडे गांभीर्याने पाहत असून स्थानिक जे पर्यटन व्यावसायिक, येणाऱ्या पर्यटकांचा समन्वय घडवून आणून जे निवास व्यवस्थेचे दर आहेत हे हॉटेलच्या दर्जानुसार कसे राहतील तसेच त्यांच्या जेवणाच्या पद्धतीत चांगल्या सुविधा कशा देता येतील यासाठी एक कार्यक्रम राबवित आहे.
- विष्णू ऊर्फ बाबा मोंडकर, जिल्हाध्यक्ष, सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com