तुळसमध्ये विहिरीचे काम थांबवले

तुळसमध्ये विहिरीचे काम थांबवले

M00025
तुळस ः खरीवाडी येथील जलजीवन मिशन अंतर्गतची विहीर.

तुळसमध्ये विहिरीचे काम थांबवले

उपोषणाची दखल; अधिकाऱ्यांच्या निगराणीखालीच नवी विहिर

सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. २ ः जलजीवन मिशन अंतर्गत तुळस-खरीवाडी येथे ठेकेदाराकडून होत असलेले विहीरीचे काम ग्रामीण पाणी पुरवठा विभाग सिंधुदुर्गचे कार्यकारी अभियंता उदयकुमार महाजनी यांनी प्रत्यक्ष पहाणीअंती थांबविले. ही विहीर पाहून अभियंत्यांच्या निगराणीखाली व तांत्रिक मापदंडानुसार नविन काम करण्याच्या सूचना दिल्याने राधाकृष्ण दशरथ गोलतकर यांनी सोमवारी पुकारलेले उपोषण स्थगित केले. जलजीवन मिशनच्या कामास ग्रामीण पाणी पुरवठा अधिकाऱ्यांनी दिलेल्या दणक्याची जोरदार चर्चा तुळस गावांसह तालुक्यात होत आहे.
जलजीवन मिशन अंतर्गत तुळस-खरीवाडी येथे ठेकेदाराकडून ८३,२७,२०० रूपये किंमतीच्या होत असलेल्या विहिरीच्या कामाची त्यांच्याकडे आलेल्या तक्रारीनुसार प्रत्यक्ष तपासणी ग्रामीण पाणी पुरवठा विभाग सिंधुदुर्गचे कार्यकारी अभियंता महाजनी यांनी २० एप्रिल २०२३ ला केली. त्यानुसार २८ एप्रिलला विहिरीचे काम करणाऱ्या ठेकेदारास या विहिरीचे काम तांत्रिकदृष्ट्या योग्य प्रकारे होत नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे ते बांधकाम पूर्णपणे तोडून पुन्हा तांत्रिक मापदंडानुसार नव्याने काम करण्याच्या सुचना दिल्या. हे काम करत असताना विहिरीची पाणी क्षमता भूवैज्ञानिक व उपअभियंता यांच्यासमक्ष पुन्हा घेण्याचे सुचना दिलेल्या होत्या; परंतु त्याबाबत आपणांकडून कोणतीही कार्यवाही झालेली नाही. मंजूर अंदाजपत्रकानुसार व २० एप्रिलला दिलेल्या सुचनेनुसार योजनेचे काम होणे अपेक्षित आहे. या कामाचा तांत्रिक दर्जा योग्य मापदंडात ठेवणे आवश्यक आहे. यापुढे या योजनेचे काम करताना संबधित शाखा अभियंत्यांच्या निगराणीत काम करून घेण्याचे आहे, असे २८ एप्रिलला आदेश दिले आहेत. कामाचा तांत्रिक दर्जा योग्य मापदंडात ठेवणे आवश्यक आहे. निकृष्ट दर्जाचे काम (निकृष्ट वाळू गंज पकडलेले स्टील वापरून करत असलेले विहिरीचे बांधकाम) पाहण्याचे आदेश दिल्यामुळे राधाकृष्ण गोलतकर यांनी उपोषण स्थगित केले; परंतु येणाऱ्या २० दिवसांत संपूर्ण प्रकरणाची चौकशी न झाल्यास उपोषण करू, असे गोलतकर यांनी सांगितले.
--
तक्रारीची घेतली दखल
श्री. गोलतकर यांनी वेंगुर्ला तहसीलदारांकडे तुळस-खरीवाडी येथील जलजीवन मिशन अंतर्गत होणाऱ्या विहिरीच्या कामाकडे लक्ष वेधले होते. निकृष्ट व शासकीय मापदंडानुसार काम होत नसल्याबाबत तसेच या कामांत अधिकारी व काही गावातील पुढारी व्यक्तींच्या संगनमताने गैरव्यवहार होत असल्याचे म्हटले होते. याची सखोल चौकशी होऊन कारवाई करावी. अन्यथा उपोषण करण्याचा इशारा दिला होता; मात्र ग्रामीण पाणी पुरवठा विभाग सिंधुदुर्गच्या कार्यकारी अभियंत्यांनी या विहिरीचे काम पूर्णपणे पाडून नवीन काम शासनाच्या मापदंडानुसार करण्याचे लेखी पत्र संबधित ठेकेदारास दिल्याने श्री. गोलतकर यांनी उपोषण तूर्त स्थगित केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com