बारसूतील सडा शांत, माती परीक्षण सुरू

बारसूतील सडा शांत, माती परीक्षण सुरू

rat2p44.jpg-
00082
राजापूरः बारसू येथे सुरू असलेले काम.
------------
बारसूतील सडा शांत, माती परीक्षण सुरू
रिफायनरी प्रकल्प ; पोलिस सतर्क, ग्रामस्थांच्या भूमिकेकडे लक्ष
राजापूर, ता. २ः तालुक्यातील धोपेश्‍वर-बारसू- येथील प्रस्तावित रिफायनरीवरून वातारण तापलेले असताना राजकीय वर्तुळातूनही आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. अशा स्थितीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बारसू येथे आंदोलकांची भेट घेणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे बारसूचा मुद्दा राजकीयदृष्ट्या अधिकच तापणार आहे. दरम्यान, रिफायनरीच्या अनुषंगाने सुरू असलेल्या माती परीक्षणावरून गत आठवड्यामध्ये संघर्ष झाल्यानंतर स्थगित केलेले ग्रामस्थांचे प्रकल्पविरोधी आंदोलन आजही शांत राहिले होते. मात्र, माती परीक्षणाचे काम सुरू होते.
तालुक्यातील धोपेश्‍वर-बारसू येथे रिफायनरी प्रस्तावित केलेली असून, त्या अनुषगांने माती परीक्षणाचे काम गत आठवड्यापासून सुरू आहे. मात्र, या परीक्षणाच्या कामावरून बारसू परिसराच्या सड्यावर जोरदार संघर्ष झाला होता. माती परीक्षणाचे काम सुरू असताना प्रकल्प विरोधकांनी मोठ्या संख्येने बारसू परिसराच्या सड्यावर ठिय्या मांडला होता. माती अनुचित प्रकार होण्याच्या शक्यतेने पोलिस प्रशासनही सतर्क होते. त्या अनुषंगाने प्रशासनाने मनाई आदेश जारी केला होता. अशातच गत आठवड्यामध्ये माती परीक्षणाच्या कामावरून जोरदार संघर्ष झाला होता. त्यानंतर, प्रकल्प विरोधकांनी ३ दिवसांसाठी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यांच्या या घोषणेला तीन दिवसांचा कालावधी उलटला असल्याने आंदोलक पुन्हा आक्रमक होणार का? यासोबतच त्यांची नेमकी भूमिका कोणती राहणार? याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले होते.
दरम्यान, सोमवारी (ता. १) सायंकाळी उशिरा प्रकल्पस्थळावर आंदोलक जमा होऊ लागले होते. त्यामुळे नव्याने आंदोलन सुरू होणार की काय अशी शंका व्यक्त केली जात होती. अशामध्ये पोलिस यंत्रणा अधिक सतर्क होताना या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता. मात्र, प्रकल्पग्रस्त आंदोलक माघारी फिरले होते. त्यानंतर, आजही फारसे आंदोलक फिरकलेले नसल्याने बारसू परिसराचा सडा शांत राहिला होता.
नाणार येथील रद्द झालेल्या रिफायनरी प्रकल्पाला बारसूची जागा सुचवणारे पत्र महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्री असलेले उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठवले होते. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या पत्रावरून राजकीय वर्तुळामध्ये बरीच उलटसुलट चर्चाही झाली. त्यानंतर, ठाकरे यांनी या पत्राबाबत मुंबईतील वज्रमूठ सभेत आपली भूमिका स्पष्ट केली असली तरी बारसू दौऱ्यावेळी ते या पत्राविषयी नेमके काय बोलणार? याकडे आता साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

चौकट
उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याची उत्सुकता
दरम्यान, मुंबई येथे पार पडलेल्या महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेमध्ये शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येत्या शनिवारी (ता. ६) बारसूचा दौरा करणार असल्याचे घोषित केले. या वेळी प्रकल्पग्रस्तांची भेट घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांची ही बारसू भेटीची घोषणा आणि दौऱ्यामुळे पुन्हा एकदा बारसूचे रणकंदन आणखी गतिमान होण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com