चिपळूण ःखाण व्यावसायिकांना तहसीलदारांचा मोठा दणका

चिपळूण ःखाण व्यावसायिकांना तहसीलदारांचा मोठा दणका

खाण व्यावसायिकांना तहसीलदारांचा मोठा दणका
लढ्याला यश ;जमिनींच्या सातबाऱ्यावर चढवला शासकीय बोजा
चिपळूण, ता. २ः तालुक्यातील बोरगांव, चिवेली आणि कौंढर परिसरातील अनधिकृत खाण व्यावसायिकांना चिपळूण तहसीलदारांनी मोठा दणका दिला आहे. माहिती अधिकारी कार्यकर्ते विद्याधर साळुंखे यांच्या तक्रारीची आणि त्या दृष्टीने केलेल्या पाठपुराव्याची गंभीर दखल घेत संबंधित खाण व्यावसायिकांच्या जमिनींच्या सातबाऱ्यावर शासकीय बोजा चढवला आहे. यामुळे साळुंखे यांच्या लढ्याला मोठे यश प्राप्त झाले आहे.
गेल्या अनेक वर्षापासून बोरगांव, चिवेली आणि कौंढर भागातील अनधिकृत दगड खाणी आणि शासनाचा बुडित महसूल याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते विद्याधर दत्ताराम साळुंखे लढा देत आहेत. प्रशासन, शासनस्तरावर पत्रव्यवहार करून संबधित खाणमालक आणि दोषी अधिकारी यांच्यावर कारवाई करावी यासाठी सातत्याने पाठपुरावा करत आहेत. त्यांचा पाठपुरावा आणि माहिती अधिकारात मिळालेली कागदपत्रे यांची शेवटी शासनाला दखल घ्यावी लागली. त्यानुसार शासनाने चिपळूण तहसील कार्यालय यांना सर्व खाणींची एटीएस मशिनद्वारे मोजणी करून अहवाल सादर करण्यास सांगितले होते. शासनाकडून आदेश प्राप्त होताच तहसीलदार कार्यालय यांनी मोजणी करून २९ खाण मालकांना नोटीस बजावल्या आहेत. त्यामध्ये सुरवातीलाच फक्त पाच खाणमालकांना ३ लाखाच्यावर दंड ठोठावला होता. त्यामधील एक खाणमालक न्यायालयात गेल्यामुळे त्यांचे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. उर्वरित चार खाणमालक यांनी अजूनही दंड न भरल्यामुळे त्यांच्या जमिनीवर शासकीय बोजा आकारण्यासाठी तलाठी यांना तहसीलदार विभागाने पत्र दिले होते. त्या पत्राच्या अनुषंगाने तलाठी यांनी विक्रम विश्वनाथ साळुंखे, मिळकत जमीन १५, दंड ४० लाख ९१ हजार ७८९ रु., सीताराम बाजी साळुंखे, मिळकत जमीन १५, दंड २४ लाख ५० हजार ४ रु., संजय बाबू हुमणे, मिळकत जमीन ११, दंड ६ लाख ३० हजार ४३५ रु., सतीश रघुनाथ इंदुलकर, मिळकत जमीन १४, दंड ३५ लाख २ हजार ८२६ रु. या खाणमालकांच्या सर्व मिळकत जमिनींच्या सातबारा उताऱ्यावर शासकीय बोजा चढवून त्याची प्रत तहसीलदार विभागाला प्रस्तुत केली आहे. लवकरच बाकी खाणमालकांवरसुद्धा कारवाई प्रस्तावित करण्यात येईल, असे चिपळूण तहसीलदार विभागाने तक्रारदार विद्याधर दत्ताराम साळुंखे यांना आश्वासन दिले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com