हवे त्यांना श्रेय द्या; पण पाझर तलाव मंजूर करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हवे त्यांना श्रेय द्या; पण पाझर तलाव मंजूर करा
हवे त्यांना श्रेय द्या; पण पाझर तलाव मंजूर करा

हवे त्यांना श्रेय द्या; पण पाझर तलाव मंजूर करा

sakal_logo
By

श्रेय घ्या; पण तलाव मंजूर करा
आमदार शेखर निकम; रत्नागिरी दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे मागणी
चिपळूण, ता. २८ः मला कोणत्याही विकासकामांचे श्रेय नको. ज्याला हवे त्यांनी ते घ्यावे; पण कोकणातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी पाझर तलाव मंजूर करावे, अशी मागणी चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे त्यांच्या रत्नागिरी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर केली आहे.
ते म्हणाले, मी विरोधी पक्षाचा आमदार आहे. कोकणातील पाझर तलावांचे प्रस्ताव मंजूर झाले तर त्याचे श्रेय मला मिळेल या भीतीपोटी पाझर तलावांच्या प्रस्तावाला मंजुरी दिली जात नाही. विकासकामांचे श्रेय घेणे ही माझी सवय नाही. काम करत राहणारा कार्यकर्ता आहे. त्याचे फळ काय मिळेल याचा मी विचार करत नाही. ते सर्व मी जनतेवर सोडून देतो. राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर माझ्या मतदार संघात फोडाफोडीचे राजकारण झाले. मंजूर झालेली कामे रद्द करण्यात आली. कार्यकर्त्यांना आमिष दाखवण्यात आले; परंतु माझा एक कार्यकर्ता जागेवरून आलेला नाही.
सरकार येत-जात असतात शेवटी काम करत राहणे गरजेचे आहे. मी आमदार निधी खर्च केला म्हणजे त्याचे श्रेय मला मिळालेच पाहिजे, असे नाही. शेवटी मी लोकसेवक आहे. त्यासाठीच मला लोकांनी निवडून दिले आहे. पालकमंत्री रत्नागिरी जिल्ह्याचे आहेत. ते आपला पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करतील. चिपळूणमध्ये माझ्या पराभवासाठी ते प्रयत्न करतील. यातून आमचे मैत्रीचे संबंध तुटणार नाही कारण, राजकारणासाठी हे सर्व करावेच लागते. पालकमंत्र्यांनी रमेश कदम यांची भेट घेतली. यामध्ये नवीन काही नाही. कारण, त्यांचे आणि आमच्या सर्वांचे संबंध मैत्रीचे आहेत. ते माझ्याकडेही येतात. रमेश कदम राष्ट्रवादी सोडणार नाहीत, याचा मला ठाम विश्वास आहे.

..........

चौकट
... तर चिपळूणचा कायापालट केला असता
राज्यात आजच्या घडीला महाविकास आघाडीचे सरकार असते तर चिपळूणचा खऱ्या अर्थाने कायापालट केला असता. वाशिष्ठी नदीतील गाळ काढण्यासाठी एका दिवसात १० कोटी रुपये मंजूर केले. इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र, पालिकेची नवीन इमारत, नळपाणी योजना आणि इतर कामासाठी भरीव निधी आणला असता, असे आमदार निकम यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांकडून शिकण्यासारखे
काँग्रेसच्या काळात अनेक मोठ्या शासकीय योजना राबवण्यात आल्या; पण काँग्रेसने त्याचा कधी गाजावाजा केला नाही. मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. मुंबईतून गावी आलेल्या लोकांना परतीच्या मार्गासाठी एसटी मिळत नाही, अशी अनेकांची तक्रार आहे. चिपळूण बसस्थानकाचे काम रखडलेले आहे. ते सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांना वेळ नाही. सामान्य लोकांचे हे प्रश्न सुटले तर खऱ्या अर्थाने ''शासन आपल्या दारी'' म्हणावे लागेल.