
मोटारीची धडक बसून नेमळेत तरुणाचा मृत्यू
मोटारीची धडक बसून
नेमळेत तरुणाचा मृत्यू
महामार्गावरील घटना; ग्रामस्थ आक्रमक
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २७ ः मुंबई-गोवा महामार्गाच्या झराप-पत्रादेवी बायपासवर पादचाऱ्याला मागाहून येणाऱ्या मोटारीची धडक बसून त्याचा जागीच मृत्यू झाला. विनायक बाबली पांगम (वय ३६, रा. नेमळे, गावकर कुंभारवाडी), असे त्याचे नाव आहे. हा अपघात शुक्रवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास नेमळे येथे घडला. अपघातानंतर चालकाने पलायन केल्याने ग्रामस्थ संतप्त झाले. महामार्गाच्या चुकीच्या बांधकामामुळेच अपघात होत असून त्यामध्ये निरपराधांचा बळी जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.
नेमळेतील विनायक पांगम हा तरुण गवंडी व्यवसाय आणि आंबा बागायतीत काम करत होता. काल रात्री तो महामार्गावरून गावकर कुंभारवाडी येथे आपल्या घराच्या दिशेने जात असताना पाठीमागून गोव्याच्या दिशेने आलेल्या मोटारीची त्याला जोरदार धडक बसली. या अपघातात गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच सावंतवाडी पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे, उपनिरीक्षक अमित गोते यांच्यासह पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांच्यासह स्थानिक घटनास्थळी मोठ्या संख्येने जमले. वारंवार होणाऱ्या अपघातांबाबत महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांसोबत सोमवारी (ता. २९) बैठक घेणार असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. या बैठकीला प्राधिकरण अधिकाऱ्यांसह पोलिस अधिकारी उपस्थित राहणार आहेत. मृत विनायक यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील, भाऊ, दोन मुलगे, काका, काकी, पुतणे, चुलत भाऊ असा मोठा परिवार आहे. नेमळेचे माजी उपसरपंच विक्रम पांगम यांचे ते ज्येष्ठ बंधू होत.