
तांदूळ महोत्सव उपक्रम स्तुत्य
05499
कुडाळ ः शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमात तानाजी सावंत यांचा सत्कार करताना मान्यवर. (छायाचित्र ः अजय सावंत)
तांदूळ महोत्सव उपक्रम स्तुत्य
रणजित देसाई; कुडाळमध्ये शेतकऱ्यांना बियाणे, प्रमाणपत्र वितरण
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २९ ः तालुका कृषी विभागाने तांदूळ महोत्सव व शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करून सुधारीत तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्याचा स्तुत्य उपक्रम राबविला आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी केले.
कुडाळ तालुका कृषी विभाग कार्यालयाच्यावतीने नुकताच येथील महालक्ष्मी सभागृहात तांदूळ महोत्सव व शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी कृषी विभागामार्फत खरीप पूर्वतयारीचा आढावा घेऊन या हंगामात राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती शेतकऱ्यांना दिली.
यावेळी देसाई म्हणाले, ‘‘पर्यावरणपूरक जीवनपद्धती अंतर्गत पर्यावरणपूरक कृषी पद्धती सप्ताह २२ ते २८ मे या कालावधीत कृषी विभागाच्यावतीने साजरा करण्यात येत आहे. वातावरणातील बदलांचा अनिष्ठ परिणाम सर्व निसर्गावर व पर्यायाने माणसावर दिसू लागला आहे. त्यामुळे या पर्यावरणातील बदलांना अनुसरून शेती पद्धतीची संकल्पना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने कृषी विभागाच्यावतीने विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून हा कार्यक्रम घेण्यात आला. खरीप हंगामात भात हेच प्रमुख पीक असल्याने भाताच्या उत्पादनावर अधिक लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. कृषी विद्यापीठाने विकसित केलेले संशोधन कृषी विभागाने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविल्यास भात उत्पादनामध्ये निश्चितच वाढ होणार आहे. त्याचा फायदा सर्वसामान्य शेतकऱ्याला निश्चितच होणार आहे. त्यामुळे खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच कुडाळ तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने तांदूळ महोत्सव व शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करून सुधारीत तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचा स्तुत्य उपक्रम राबविला आहे.’’
प्रशिक्षण वर्गामध्ये डॉ. विजयकुमार शेट्ये कृषी संशोधन केंद्र फोंडा घाट यांच्या सुधारीत पद्धतीने भात लागवड तसेच भात लागवडीची श्री पद्धत व पौष्टिक तृणधान्ये लागवड याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान झाराप चे अध्यक्ष डॉ. प्रसाद देवधर यांनी वातावरणातील बदल व त्यास कारणीभूत असलेले घटक व या वातावरणातील बदलांना सामोरे जाण्यासाठी अवलंबावयाच्या गोष्टींबद्दल विस्तृत विवेचन केले. सप्ताहाला हवामानावर आधारीत कृषी सल्ला देण्यात येतो. याबाबतीत कृषी संशोधन केंद्राचे तांत्रिक अधिकारी डॉ. युवराज मुठाळ यांनी हवामानाचा अंदाज कशाप्रकारे वर्तविला जातो व त्यानुसार कशाप्रकारे कृषी सल्ला दिला जातो, त्याबद्दल माहिती दिली. तहसीलदार पाठक तहसीलदार यांनी कृषी विभागाच्या खरीप पूर्वतयारीचे कौतुक केले. तालुका कृषी अधिकारी अश्विनी घाटकर यांनी प्रास्ताविकामध्ये येत्या खरीप हंगामामध्ये राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली.
यावेळी २०२०-२१ या वर्षात भात पीक स्पर्धेत तालुका पातळीवर यश मिळविलेल्या अनुक्रमे तानाजी सावंत (अंबडपाल), बाबुराव परब (रानबांबुळी) व प्रताप सरनोबत (गोठोस) यांचा सत्कार करण्यात आला. उपविभागीय कृषी अधिकारी पोपट पाटील, आत्मा प्रकल्प संचालक भाग्यश्री नाईक नवरे, मंडळ कृषी अधिकारी गायत्री तेली, विजय घोंगे, कृषी पर्यवेक्षक अर्जुन परब, सुचिता परब, रश्मी कुडाळकर, श्रुती कविटकर, गीता परब आदी उपस्थित होते. कृषी अधिकारी अमोल करंदीकर यांनी सूत्रसंचालन केले.
--
इतरही कार्यक्रम उत्साहात
सिंधूरत्न योजनेत श्री पद्धतीने भात पीक प्रात्यक्षिकांमध्ये सहभागी शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात रत्नागिरी ८ जातीचे बियाणे वितरित करण्यात आले. शासन आपल्या दारी कार्यक्रमात स्थापित शेतकरी गटांना प्रातिनिधिक स्वरुपात नोंदणी प्रमाणपत्र वितरित करण्यात आली. यावेळी कृषी विभागाच्यावतीने विविध कृषी विषयक उत्पादने, फळे तसेच तांदूळ व अवजारे यांचे प्रदर्शन मांडण्यात आले.