
पाणीटंचाई, उकाड्याने देवगडवासीय हैराण
पाणीटंचाई, उकाड्याने
देवगडवासीय हैराण
देवगड, ता. २८ ः येथील किनारी भागात वातावरणातील उष्णता कमी झाली नसली तरी आकाशात पावसाळी ढग जमा होऊ लागले आहेत. दोन दिवसांपूर्वी किनारी भागात हलक्या पावसाची झलक पाहायला मिळाली; मात्र त्यामुळे उकाड्यात आणखीनच वाढ झाली. गेल्या दोन दिवसांपासून किनारी भागात वाऱ्याचा वेग वाढला आहे.
येथील शहरातील नागरिक एकीकडे पाणी टंचाईने त्रस्त आहेत, तर दुसरीकडे वाढत्या उकाड्याने हैराण आहेत. नळयोजनेचे पाणी आठवड्यातून एकदाच येत असल्याने गृहिणींची मोठी चिडचिड होताना दिसत आहे. त्यातच उकाड्याचे चटके तीव्र होत आहेत. त्यामुळे पाणी टंचाईतून मुक्तता मिळवण्याबरोबरच उकाड्यापासून दिलासा मिळण्यासाठी नागरिकांना पावसाची तीव्र प्रतीक्षा आहे. किनारी भागात उष्णता वाढली आहे. त्यातच अधूनमधून आकाशात पावसाळी ढग जमा होताना दिसत आहेत. दोन दिवसांपूर्वी येथे हलका पाऊसही झाला; मात्र उकाड्यापासून दिलासा मिळण्याऐवजी उष्णतेत वाढ झाल्याचे चित्र आहे. किनारी भागातील वातावरणात बदल जाणवत आहे. वार्याचा वेग वाढल्याने सायंकाळच्यावेळी नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळत असल्याचे दिसते.