
रत्नागिरी ः जोखीमग्रस्त 16 तर 206 नदीकाठची गावे
जोखीमग्रस्त १६ तर २०६ नदीकाठच्या गावांवर नजर
पावसाळ्यासाठी आरोग्य विभाग सज्ज; साथी नियंत्रणासाठी कृती आराखडा
रत्नागिरी, ता. २९ ः पावसाळ्यात उद्भवणार्या साथींवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाकडून कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये वैद्यकीय पथक सज्ज ठेवले आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून जिल्ह्यात जोखीमग्रस्त १६ गावे आणि नदीकाठची २०६ गावे जाहीर करण्यात आली आहेत.
पावसाळ्यात साथ रोगांचा उद्रेक होऊ नये म्हणून आरोग्य विभागाकडून प्रतिबंधक उपाययोजना हाती घेतल्या जातात. १ जूनपासून या गावांवर आरोग्य विभागाने लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी सांगितले आहे. पावसाळ्यात जिल्ह्यात यापूर्वी उद्भवलेल्या साथग्रस्त गावांमध्ये जिल्हा आरोग्य विभाग अधिक लक्ष केंद्रीत करते. संभाव्य पूरग्रस्त जोखीमग्रस्त गावांच्या ठिकाणी विशेष लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात मागील ५ वर्षात डेंग्यू, चिकनगुनिया, गॅस्ट्रो, अतिसार, कॉलरा, विषमज्वर, ताप उद्रेक, हिवताप, काविळ, लेप्टोस्पायरोसिस आदी साथींचा झालेल्या गावांवर जिल्हा परिषद आरोग विभागातर्फे विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या गावांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर वैद्यकीय पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. आरोग्य कर्मचारी व पर्यवेक्षकांनी भेट देऊन साथरोगविषयक पाहणी केली आहे. या गावातील पाणी व टीसीएल नमुने गोळा करून प्रयोगशाळेकडे पाठवण्याच्या सूचना दिल्या आहेत. तालुका व जिल्हास्तरावर २४ तास वैद्यकीय पथकाची नियुक्ती करण्यात आली असून, औषधसाठा आणि इमर्जन्सी कीट सज्ज ठेवले आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकार्यांनी परवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये, असे आदेशही दिले गेले आहेत. आवश्यक त्या ठिकाणी घरोघरी मेडिक्लोर वाटप व आरोग्य शिक्षण देण्यात येणार आहे.
चौकट
साथ आलेली गावे
मागील पाच वर्षात साथ उद्रेक झालेली गावे ः खेड-सवेणी (डेंग्यू), खेड शहर (काविळ, डेंग्यू), वावे (डेंग्यू), आंबवली (अन्न विषबाधा), दापोली-पिसई (अन्न विषबाधा), आसूद (विषमज्वर), चिपळूण- कातळवाडी (गोवर), कोसंबी (गोवर), फुरूस (गोवर), सावर्डा (अतिसार) डेरवण (काविळ), खेर्डी (डेंग्यू), गुहागर- अडूर (अन्न विषबाधा), रत्नागिरी-खानू (क्वालरा), वाटद (डेंग्यू), राजापूर-सोलगाव (गॅस्ट्रोएन्टेरिटिस).
चौकट २
तालुकानिहाय पूरबाधित गावे व लोकसंख्या
तालुका*गावांची संख्या*लोकसंख्या
खेड*२*७१००
गुहागर*२*३७०९
चिपळूण*५*६३९५०
संगमेश्वर*८*१२९५८
रत्नागिरी*६*७३९८
लांजा*२*२९११
राजापूर*७*६१२६