
चिपळूण ः दुसऱ्या टप्प्यातील गाळ काढण्यासाठी प्रशासकीय मान्यता
बहादूरशेख नाका ते पोफळीत गाळउपसा पावसानंतर
४ कोटी ८६ लाखाचा निधी ; जलसंपदा विभागाचे प्रयत्न
चिपळूण, ता. २९ ः वाशिष्ठी नदीत दुसऱ्या टप्प्यातील गाळ काढण्यासाठी प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. पावसाळी अधिवेशनात निधीची तरतूद झाल्यानंतर बहादूरशेख नाका ते पोफळीदरम्यानचा गाळ काढण्याचे काम पावसाळ्यानंतरच सुरू होईल, अशी माहिती जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता जगदीश पाटील यांनी ''सकाळ''ला दिली.
वाशिष्ठी नदीतील गाळ काढण्यासाठी आमदार शेखर निकम यांच्या प्रयत्नातून १० कोटींचा निधी मंजूर झाला होता. या निधीतून बहादूरशेख नाका ते गोवळकोट या पहिल्या टप्प्यातील गाळ काढण्याचे काम करण्यात आले तसेच दुसऱ्या टप्प्यातील गाळ काढण्याचे काम सुरू होते; मात्र सरकारकडून अपेक्षित निधी मिळत नसल्याचे लक्षात आल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील गाळ करण्याचे काम थांबून उर्वरित निधी पहिल्या टप्प्यासाठी खर्च करण्याचे ठरले. पहिल्या टप्प्यातील गाळ काढण्याचे काम अंतिम टप्प्यात असताना निधी कमी पडू लागला. त्यामुळे जिल्हा नियोजन मंडळातून प्रथम ३५ लाख नंतर १० लाख देण्यात आले.
दसपटीसह खेर्डी, खडपोली, सती शिरगाव, पोफळी, अलोरे या भागातील नद्यांमधील गाळ करण्याची मागणी ग्रामस्थांकडून सुरू होती. या कामासाठी निधी मंजूर व्हावा म्हणून जलसंपदा विभागाकडून प्रयत्न सुरू होते. या कामाचा परिपूर्ण प्रस्ताव जलसंपदा विभागाकडून मंत्रालयात पाठवण्यात आला होता. आमदार निकम यांनी मंत्रालय स्तरावर प्रयत्न केल्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील गाळ काढण्याच्या कामासाठी प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. दुसऱ्या टप्प्यातील गाळ काढण्यासाठी ४ कोटी ८६ लाखाचा निधी शासनाकडून मिळणार आहे.
-------------
चौकट
पहिल्या टप्प्यातील गाळ काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दुसऱ्या टप्प्यात सती अलोरे, शिरगावसह काही ठराविक भागात गाळ काढण्याचे काम झाले; मात्र अजून पोफळी, कोंडफणसवणे, कुंभार्ली नद्यांमधील शिल्लक आहे. अडरे, वेहळे, दसपटी या भागातील गाळ शिल्लक आहे. या भागातील नद्या गाळामुळे उथळ झाल्या आहेत. त्यामुळे नद्या उथळ झालेल्या भागात पुराचा धोका कायम आहे.