
चिपळूण-टेरवमधील शेकडो ग्रामस्थ पंचायत समितीवर धडकले
पान १ साठी)
०५६८३
०५६८४
पाणी योजनेसाठी पंचायत समितीवर धडक
टेरवमध्ये काम रोखले; जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेनंतर निर्णय
चिपळूण, ता. २९ ः स्थगिती दिलेले जलजीवन मिशन योजनेतील पाणीयोजनेचे काम सुरू करण्याच्या मागणीसाठी टेरव येथील शेकडो ग्रामस्थांनी पंचायत समितीवर धडक दिली. गावात पाणीटंचाई असताना योजनेचे काम रोखले आहे. गावातील पाच-सहा लोक सातत्याने लेखी तक्रार करतात. अशा तऱ्हेने शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करणाऱ्यांवर पंचायत समिती प्रशासनाने पोलिसांत फिर्याद द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेनंतर पाणीयोजनेचे काम सुरू करण्याचा निर्णय पंचायत समितीने ग्रामस्थांना दिला.
तालुक्यातील टेरव येथे जलजीवन मिशन योजनेतून सुमारे दोन कोटींची नळपाणी पुरवठा योजना राबवण्यात येत आहे. या योजनेंतर्गत स्मशानभूमीजवळ उभारण्यात येणाऱ्या साठवण टाकीस काही ग्रामस्थांनी आक्षेप घेतला. शासकीय जमिनीत साठवण टाकी उभारताना जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता नसल्याची तक्रार केली होती. त्यानुसार पंचायत समितीने या कामास स्थगिती दिली. पाणी योजनेचे काम थांबल्याने ग्रामपंचायतीमधील सत्ताधारी गटाने सोमवारी मोर्चा काढून धडक दिली. या वेळी टेरव रयत संघटनेचे अध्यक्ष मनोहर यादव म्हणाले, ‘‘मोठ्या प्रयासानंतर गावात पाणीयोजना मंजूर झाली. गावात टंचाई असताना काहींच्या विरोधामुळे कामास स्थगिती दिली. साठवण टाकीतील जमिनीच्या मोजणीत काहीही निष्पन्न झालेले नाही. लगतच्या जमीनदारांचाही विरोध नाही. २० गुंठेची जागा शासकीय असल्याने ती साठवण टाकीसाठी निश्चित केली. गावातील तांबडवाडीत पाणीटंचाई आहे तेथे टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागतो. त्यासाठी स्थगिती दिलेल्या योजनेचे काम पुन्हा सुरू करावे. ज्या ग्रामस्थांचा पाणीयोजनेशी संबंध नाही, तेच लोक सारख्या तक्रारी करतात, त्यामुळे काम थांबले. स्मशानभूमी येथे साठवण टाकीचे काम सुरू असताना कामगारांना शिवीगाळ झाली होती. काहीही करून योजना होऊ द्यायची नाही हा हेतू आहे. मात्र जनतेचा विकास करण्यासाठी शासकीय योजनांची अंमलबजावणी करणे हे प्रशासनाचे काम आहे. योजनेचे काम सुरू होण्यासाठी शेकडो ग्रामस्थ धडकले आहेत.’’
या वेळी माजी सरपंच स्वप्नाली कराडकर, किशोर कदम, संतोष म्हालीम, विश्वनाथ पंडव, चंद्रकांत मोहिते, महादेव कदम आदींसह महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोट
तक्रारीमुळे योजनेच्या कामास स्थगिती दिली. साठवण टाकीच्या जागेसाठी जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता आवश्यक आहे. त्यांच्याकडे पत्रव्यवहारही झाला आहे. जागेबाबतचा पाहणी अहवाल महसूल विभागाकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे जाईल. जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता मिळताच काम सुरू होईल.
- उमा घार्गे पाटील, गटविकास अधिकारी, चिपळूण