
राणे-वैभव नाईक आरोप - प्रत्यारोप
टीपः ०५७०४ मध्ये फोटो आहे.
ओळ - नीतेश राणे
ठाकरे गटाचे राष्ट्रवादीत
विलीनीकरण होणार
नीतेश राणे; चर्चा झाल्याचा दावा
कणकवली, ता. २९ ः राज्यातील शिवसेना ठाकरे गट लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होणार आहे. तसा प्रस्ताव खासदार संजय राऊत यांनी ‘सिल्व्हर ओक’वर ठेवला आहे. याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चेच्या दोन फेऱ्यादेखील झाल्या असल्याचा दावा आमदार नीतेश राणे यांनी आज येथे केला.
येथील पत्रकार परिषदेत ते म्हणाले, ‘‘लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका ठाकरे गटाचे उमेदवार ‘घड्याळ’ या चिन्हावर लढवतील, असा प्रस्ताव खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीपुढे ठेवला आहे. ठाकरे गटाचे ‘मशाल’ हे चिन्ह असून नवी संघटना तळागाळात नेण्यासाठी कमी वेळ आहे. त्यामुळे ठाकरे गट हा राष्ट्रवादीत विलीन होईल. तसेच लोकसभा, राज्यसभेच्या जास्त जागा काँग्रेसकडे मागायच्या, असा हा प्रस्ताव आहे. महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभा आता बंद झाल्या आहेत. भाजपला रोखण्यासाठी त्याग करायला हवा म्हणून उद्धव ठाकरे आपला पक्ष राष्ट्रवादीमध्ये विलीन करून त्यागाची भाषा बोलू लागले आहेत.’’
टीपः ०५७०५ मध्ये फोटो आहे.
ओळ - वैभव नाईक
राणेंनी आधी त्यांच्या पक्षाचा
विलीनीकरण इतिहास तपासावा
वैभव नाईक; निवडणुकांमध्ये ताकद दाखवू
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. २९ ः आमदार नीतेश राणे यांनी स्वत:चा पक्ष किती दिवसांमध्ये भाजपमध्ये विलीन केला, याचा इतिहास आधी तपासावा. नंतरच ठाकरे गटावर टीका करावी, असा टोला शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी आज लगावला. तातडीने निवडणुका घ्या; आम्ही ठाकरे गटाची ताकद दाखवू, असे प्रत्युत्तरही त्यांनी आमदार राणे यांनी केलेल्या टीकेला दिले.
श्री. नाईक म्हणाले, ‘‘काँग्रेस सोडल्यानंतर राणेंनी स्वत:चा स्वाभिमान पक्ष काढला. मात्र, ईडीच्या भीतीने स्वत:च पक्ष त्यांना भाजपमध्ये विलीन करावा लागला. स्वत:चा पक्ष असताना राणे स्वत:चा एकही आमदार निवडून आणू शकले नाहीत. जे स्वत:चा पक्ष जिवंत ठेवू शकले नाहीत, तेच राणे आता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षावर बोलत आहेत. शिवसेनेचे ४० आमदार पक्ष सोडून गेले असले, तरी पक्षात दुसरी फळी निर्माण झाली आहे. आमचे काही आमदार, खासदार गेले तरीही ठाकरे शिवसेनेची लोकप्रियता संपली नाही. उलट नव्या चिन्हावर आम्ही आमदार निवडून आणून दाखवला आहे. त्यामुळे राणे यांनी आमच्या पक्षाची अजिबात चिंता करू नये. उलट आपले भाजपमधील स्थान काय? त्याची काळजी घ्यावी.’’