
सिंधुदुर्गनगरी व्यापारी संकुलासाठी पाच कोटी
सिंधुदुर्गनगरी व्यापारी संकुलासाठी पाच कोटी
पालकमंत्र्यांकडून मंजुरी; शिवरायांच्या पुतळा सुशोभीकरणासाठीही एक कोटी
सिंधुदुर्गनगरी, ता. २९ ः येथील प्रवेशद्वारावर उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसराच्या सुशोभीकरणासाठी एक कोटी तर व्यापारी संकुलासाठी पाच कोटी रुपयाचा निधी सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मंजूर केला आहे, अशी माहिती भाजप पदाधिकाऱ्यानी दिली.
पालकमंत्री चव्हाण यांनी नुकतीच सिंधुदुर्गनगरी प्राधिकारणची एक बैठक घेऊन सर्व प्रश्न जाणून घेत ते सोडविण्याच्या सक्त सुचना जिल्हा प्रशासनाला दिल्या होत्या. त्यानंतर आज त्यांनी निधी मंजूर करण्यास सुरुवात केली आहे. सिंधुदुर्गनगरीच्या प्रवेशद्वारावरच छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वारूढ पुतळा उभारला आहे; परंतु, आजुबाजूच्या परिसराचे सुशोभीकरण झालेले नाही. त्याठिकाणी वीज व्यवस्था तसेच स्वछताही राखली जात नाही. हे सर्व प्रश्न लक्षात घेऊन पालकमंत्री चव्हाण यांनी या परिसराच्या सुशोभीकरणसाठी एक कोटींचा निधी मंजूर केला. त्यामुळे शिवाजी महाराज पुतळा परिसर आणि सिंधुदुर्गनगरी प्रवेशद्वाराला देखणे स्वरूप प्राप्त होणार आहे.
सिंधुदुर्गनगरीमध्ये दिवसेंदिवस लोकवस्ती वाढत आहे; परंतु, याठिकाणी सुसज्ज व्यापारी संकुल नाही. लोकांना आजही मोठ्या खरेदीसाठी इतर शहरात जावे लागते. त्यामुळे इथे सुसज्ज व्यापारी संकुल होणे महत्वाचे आहे. हे लक्षात घेऊन व्यापारी संकुल उभारणीसाठो पाच कोटींचा निधी पालकमंत्री चव्हाण यांनी मंजूर केला आहे. व्यापारी संकुल उभारणीसाठी प्राधिकरणने आराखडाही तयार केला आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
सिंधुदुर्गनगरी प्रवेशद्वारानजिकच मिनी मार्केट आहे. आठवडा बाजारही रविवारचा भरतो; मात्र, त्याठिकाणी स्वछतागृह नाही, ही समस्या लक्षात घेऊन प्रवेशद्वारानजिक सध्या छोटेसे तात्पुरते स्वछतागृह उभारून पावसाळा संपल्यावर मोठे सुलभ शौचालय उभारले जाणार आहे. त्यासाठीही पालकमंत्र्यांनी निधी देण्याचे आश्वासन दिले आहे. सिंधुदुर्ग-ओरोस रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी निधी मंजूर करून निविदाही काढल्या आहेत. निविदा ओपन झाल्यावर रस्त्याचे काम आणि रेल्वे स्थानक परिसराचे सुशोभीकरण केले जाणार आहे.
---
कचऱ्यासह रस्त्याचा प्रश्न सुटणार
सिंधुदुर्गनगरीमधील कचऱ्याचा प्रश्नही मोठा आहे. तो सोडविण्यासाठी पालकमंत्र्यांनी एका कंपनीला बोलविले आहे. त्या कंपनीने कचरा उचलण्याची व घनकचरा व्यवस्थापनाची तयारी दाखवली आहे. त्यामुळे कचऱ्याचाही प्रश्न सुटणार आहे. अंतर्गत रस्ते पूर्ण खराब झाले आहेत. त्याची दुरुस्ती व डाबरीकरण करण्यासाठी अंदाजपत्रक तयार करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत. त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचेही आश्वासन दिले आहे. त्यामुळे रस्त्याचाही प्रश्न सुटणार आहे, अशी माहिती भाजप पदाधिकाऱ्यांनी दिली.