
धुरींच्या ‘ब्रह्मराक्षसा’ची मुंबईकरांना भुरळ
05836
मुंबई ः आर. के. धुरी यांनी साकारलेला ‘ब्रह्मराक्षस’.
धुरींच्या ‘ब्रह्मराक्षसा’ची मुंबईकरांना भुरळ
माणगावचा माजी विद्यार्थी; अग्निशमन सेवेसह दशावतारातही चुणूक
सकाळ वृत्तसेवा
माणगाव, ता. ३० ः कुठलीही कला जोपासताना काळ, वेळ आणि जागा अडथळा ठरत नाही. अंगभूत कला असेल तर कोकणातील दशावतार मुंबईतही बहरू शकतो, हे माणगाव हायस्कूलचा विद्यार्थी आर. के. धुरी याने सिद्ध केले. नुकताच बोरिवली येथे सादर केलेल्या ‘धुम्रवर्ण गणेश’ या नाट्यप्रयोगात त्याने साकारलेली ब्रह्मराक्षसाची भूमिका मुंबईकरांना भावली. या भूमिकेत त्याने केलेली रंगभूषा, वेशभूषा आणि अभिनयाने रसिकांची मने जिंकली.
धुरी यांनी शालेय जीवनात १९८२ मध्ये माणगाव हायस्कूलच्या रंगमंचावर दशावतार सादर करताना राक्षसाची भूमिका साकारून आपल्या अभिनयाची चुणूक त्याने दाखवली होती. मुंबईत अग्निशमन दलाच्या सेवेत रुजू झाल्यानंतर दशावतार कला जोपासताना कोकणातल्या विविध दशावतार मंडळांमध्ये स्त्रीपात्र वगळून जवळपास सर्वच भूमिका साकारल्या आहेत. दरवर्षी ६० ते ७० दशावतार नाट्यप्रयोग मुंबईत सादर करतो. राक्षस ही त्याची आवडती भूमिका आहे. आपल्या कल्पकतेने चेहऱ्याची रंगभूषा करून रसिकांच्या मनात ब्रह्मराक्षसाची प्रतिमा ठसविली. दशावतारात विविध भूमिका साकारताना विनोदी भूमिकांमध्ये धनगर, कोळी अशा व्यक्तिरेखा मालवणी भाषेत सादर करून रसिकांचे मनोरंजन केले. दशावतार आणि कोकणी संस्कृतीचा महिमा सांगणे, हे त्यांच्या कलेचे खास वैशिष्ट्य आहे. मुंबईत आपली नोकरी, कामधंदा सांभाळून दशावतार कला जपणारे अनेक कोकणी कलावंत असून एकूण १३ दशावतार मंडळे कार्यरत आहेत. या मंडळांचा एक दशावतार हितवर्धक संघ स्थापन केला आहे. या संघाच्या संचालक पदावर धुरी कार्यरत आहेत.