
किल्ले विजयदुर्गच्या सुरक्षेसाठी प्रयत्न
05989
विजयदुर्ग ः येथे प्रसाद देवधर यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
किल्ले विजयदुर्गच्या सुरक्षेसाठी प्रयत्न
शुभम मुजुमदार; तटबंदी कामासह पुरातन वास्तूंची जपणूक करणार
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. ३० ः तालुक्यातील किल्ले विजयदुर्गच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक हालचाली केल्या जातील. किल्ल्यातील पुरातन वास्तुंची जपणूक करण्यासह किल्याच्या तटबंदीवर वाढणारी झाडी याचीही तातडीने दखल घेऊन आतील तोफा, तोफगोळे यांना अत्यंत सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येईल, असे मुंबई येथील भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे सुपरिटेंडेड शुभम मुजुमदार यांनी विजयदुर्ग येथे आश्वासित केले. किल्ले विजयदुर्गची पहाणी केल्यानंतर किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समितीसह स्थानिकांशी त्यांनी संवाद साधला.
श्री. मुजुमदार यांनी किल्ले विजयदुर्ग येथे भेट देऊन संपूर्ण किल्ल्याची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत ए. व्ही. नागनूर, डी. सी. दास, राजन दिवेकर आदी पुरातत्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते. किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समितीचे अध्यक्ष प्रसाद देवधर, सचिव बाळा कदम, संचालक प्रदीप साखरकर आणि यशपाल जैतापकर तसेच किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष आणि सल्लागार राजीव परुळेकर यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. श्री. मुजुमदार यांनी संपूर्ण किल्ल्याची सुरूवातीला होडीने जाऊन बहिर्गत पाहणी केली. त्यानंतर संपूर्ण किल्ला आतील बाजूने फिरून यशपाल जैतापकर यांच्याकडून इत्थंभूत माहिती जाणून घेतली. किल्याच्या दक्षिणेस असलेले व ढासळत चाललेले बुरुज वाचविण्यासाठी तसेच त्यांची डागडुजी करण्यासाठी लवकरच तातडीने पावले उचलली जातील, अशी खात्री त्यांनी यावेळी दिली. गोमुख दरवाजा, खलबतखाना, टेहळणी बुरुज, धान्य कोठार, सदर, घोड्यांची पागा तसेच अत्यंत बिकट अवस्थेत असलेले गणेश बुरुज, हनुमंत बुरुज, नगारखाना, भवानी मंदिर, मुख्य तलावासह किल्ल्यातील सर्व विहीरी यांची सखोल पाहणी करून किल्ल्याच्या तटबंदीवर वाढणारी झाडांची मुळे यांची तातडीने दखल घेऊन तोफा, तोफगोळे यांना अत्यंत सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे त्यांनी आश्वासित केले. किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समितीच्यावतीने त्यांचे केलेले अनपेक्षित स्वागत अनुभवताना सर्वच अधिकारी भारावले.
---------
चौकट
‘विजयदुर्ग प्रेरणोत्सव’ची मदत घेणार
ऐतिहासिक वारसा असलेल्या किल्ले विजयदुर्गचे जतन करण्यावर भर दिला जाईल. यासाठी एक सामाजिक संस्था म्हणून आवश्यक त्याठिकाणी किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समितीचे सहकार्य घेतले जाईल, असे शुभम मुजुमदार यांनी समितीचे अध्यक्ष प्रसाद देवधर यांना सांगितले.