
चिपळूण-तिवरे-धनगरवाडीतील पाणीप्रश्न निकाली
ratchl३१२.jpg
06067
चिपळूणः विहिरीचे उद्घाटन करताना आमदार शेखर निकम सोबत ग्रामस्थ.
----------------
तिवरे-धनगरवाडीतील पाणीप्रश्न निकाली
विहिरीचे काम पूर्ण ; योजनेचे उदघाटन
चिपळूण, ता. ३१ ः तालुक्यातील तिवरे धरणवाडी पाण्यापासून वंचित होती. उन्हाळ्यात त्यांना दरवर्षी वणवण भटकावे लागायचे. धनगर समाजातील आठ कुटुंबे अनेक वर्ष पाण्यासाठी धडपडत होते. आमदार शेखर निकम यांनी या कामी पाठपुरावा करून विहीर मंजूर केली. टंचाई आराखड्याअंतर्गत निधीची तरतूद केली. या विहिरीचे काम मार्गी लागले असून धनगरवाडीचा पाणीप्रश्न निकाली निघाला आहे.
तिवरे भेंडवाडी शिंगाडे कुटुंबाचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी चिपळुण तालुका धनगर समाज संघटनेच्या पदाधिकारी यांचे विशेष प्रयत्न सुरू होते. भेंदवाडी येथील धनगर समाजातील शिंगाडे कुंटुबीय १९३५ पासून या ठिकाणी राहात आहेत; परंतु गेली अनेक कुटुंबे पाण्यापासून वंचित होती. चिपळूण तालुका धनगर समाजाचे अध्यक्ष शांताराम येडगे, सचिव महादेव खरात, शंकर खरात, लक्ष्मण येडगे यांनी हा प्रश्न आमदार शेखर निकम यांच्याकडे मांडला व पाणी सोडवण्याबाबत विनंती केली. आमदार शेखर निकम यांनी चिपळूण पंचायत समिती पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता अविनाश जाधव यांना पाणीप्रश्न सोडवण्याच्या सूचना केल्या.
टंचाई आराखड्यामध्ये हे काम समाविष्ट करण्यास सांगितले आणि ते मंजूर करून घेतले. विहिरीचे काम मंजूर झाल्यानंतर ते त्वरित पूर्ण केले. आमदार निकम यांनी सोमवारी या योजनेचे उद्घाटन करून त्यांना पाणी उपलब्ध करून दिले. या वेळी मनोगत व्यक्त करताना आमदार निकम म्हणाले, आता धनगरवाडीतील पाण्याची समस्या मार्गी लागली आहे. येथील उर्वरित समस्याही लवकरच सोडवल्या जातील. खऱ्या अर्थाने आज तुमचे हसरे चेहरे पाहून मानापासून आनंद झाल्याचे सांगितले.
दुर्गम असलेल्या तिवरे धनगरवाडीत पाणीयोजना झाल्याने तसेच मुलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्याने आमदार निकम, पाणीपुरवठा विभाग तसेच ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचे धनगर समाज संघटनेने या सर्वांचे आभार मानले. १९३५ पासून शिंगाडे कुटुंबांचे या ठिकाणी वास्तव्य आहे; परंतु लोकप्रतिनिधी म्हणून पहिलेच आमदार आमच्या दारी आल्याचे मत काशिराम शिंगाडे यांनी व्यक्त केले. या वेळी तिवरे सरपंच गजानन साळवी, ओवळी सरपंच दिनेश शिंदे, समीर काझी, उत्तमराव शिदे, गंगाराम शिंगाडे, काशिराम शिंगाडे, सखाराम शिंगाडे, राजेद्र शिंगाडे, गणपत शिंगाडे, रामा शिंगाडे, लक्ष्मण शिंगाडे उपस्थित होते.