
पान एक-पोलिस भरतीसाठी बोगस कागदपत्रे
पोलिस भरतीसाठी
बनावट कागदपत्रे
सिंधुदुर्गात प्रकार; दोघांविरुद्ध गुन्हा
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ३१ ः जिल्हा पोलिस दल भरतीत दोन उमेदवारांनी चक्क बनावट प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त असल्याचे प्रमाणपत्र सादर केल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्या आदेशानुसार ज्ञानेश्वर भाऊसाहेब सातपुते (रा. जाम्ब शिरूर कासार, जिल्हा बीड) आणि कृष्णा राजेंद्र राचमले (रा. मावलगाव, अहमदपूर, जिल्हा लातूर) या दोघांवर सिंधुदुर्गनगरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सिंधुदुर्ग पोलिस दलातील रिक्त असलेल्या जागांसाठी भरती प्रक्रिया २०२२ मध्ये झाली. त्यात ९९ पोलिस शिपाई, तर २२ चालक अशा एकूण १२१ पदांसाठी भरती प्रक्रिया झाली. प्रथम मैदानी चाचणी घेण्यात आली. त्यात पात्र उमेदवारांची संवर्गनुसार एका जागेसाठी दहा अशी लेखी परीक्षेसाठी यादी जाहीर करण्यात आली. त्यानंतर लेखी परीक्षा घेण्यात आली. त्यातून पात्र उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करून कागदपत्रे पडताळणीसाठी त्यांना बोलाविण्यात आले होते. यावेळी हा प्रकार उघड झाला.
भरतीसाठी भूकंपग्रस्त आणि प्रकल्पग्रस्त असल्याचा बनावट दाखला या दोघांनी जोडला होता. दोघे उमेदवार पोलिस भरतीसाठी पात्र ठरले होते. पात्र उमेदवारांच्या सर्व शैक्षणिक आणि अन्य आरक्षणनिहाय दाखल्याची पडताळणी करण्यात येते. या दोन्ही उमेदवारांनी बनावट प्रमाणपत्र सादर केल्याचे पडताळणीत सिद्ध झाले आहे. त्यामुळे सातपुते आणि राचमले यांच्यासह त्यांना मदत करणाऱ्यांविरोधात फसवणुकीसह अन्य कलमांद्वारे गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्या शोधासाठी सिंधुदुर्ग पोलिसांची पथके रवाना झाली आहेत, अशी माहिती पोलिस अधीक्षक अग्रवाल यांनी दिली आहे.