पूल हवा, अन्यथा रास्ता रोको | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पूल हवा, अन्यथा रास्ता रोको
पूल हवा, अन्यथा रास्ता रोको

पूल हवा, अन्यथा रास्ता रोको

sakal_logo
By

06210
दोडामार्ग ः राज्यमार्गावरील भेडशी नदीवरील पुलाचे काम पूर्ण करण्यासंदर्भात चर्चा करताना स्थानिक. (छायाचित्र ः संदेश देसाई)


पूल हवा, अन्यथा रास्ता रोको

साटेली-भेडशीवासीयांचा इशारा; पावसाळ्यापूर्वी मागणीची दखल घ्या

सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. ३१ ः तिलारी राज्यमार्गवरील साटेली-भेडशी नदीपत्रावर बांधण्यात येत असलेल्या पुलाचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करून वाहतुकीस खुले करावे. आठ दिवसांत काम पूर्ण न केल्यास पावसाळ्यात वाहतुकीला अडथळा निर्माण होणार आहे. बांधकाम विभागाने लक्ष घालून पुलाचे काम पूर्ण करावे; अन्यथा त्याच तिव्रतेने रस्ता रोको करणार असल्याचा इशारा साटेली भेडशी ग्रामस्थांनी दिला आहे. तसे निवेदनही बांधकाम विभागास दिले आहे.
साटेली-भेडशी खालचा बाजार येथे नदीवर कमी उंचीचे पूल होते. पावसाळ्यात हे पूल पाण्याखाली जायचे. तिलारी राज्यमार्गवर हे पूल असल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण व्हायचा. पावसाळयात नदी तुडुंब भरून वाहत असल्याने पूरसदृश्य परिस्थितीतही निर्माण होते. पुराचे पाणी बाजारपेठेतील घरांमध्येही शिरते. या ठिकाणी सुसज्ज पूल व्हावे, अशी ग्रामस्थांची मागणी होती. अथक प्रयत्नानंतर या ठिकाणी मोठा पूल मंजूर झाला. परंतु, पुलाच्या कामाला मात्र सुरुवात झाले नव्हती. सार्वजनिक बांधकाम विभागाला अनेक निवेदने देऊन जागे केल्यानंतर पुलाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली. पावसाळ्याला काही महिने शिल्लक असताना पुलाच्या कामाला सुरुवात करण्यात आली. बांधकाम विभागाला वेळाचे भान नाही किंवा जाणून बुजून दिरंगाई केल्याचे चित्र दिसून येते. वास्तविक पावसाळ्यापूर्वी पुलाचे काम पूर्ण होणे गरजेचे होते. परंतु, अद्यापही काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे वाहतुकीसही पर्यायी रस्त्याने वाहतुक करणे खूप अडचणीचे ठरणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून एप्रिल २०२३ अखेरपर्यंत पुलाचे काम पूर्णत्वास जाईल, अशी हमी देण्यात आलेली होती. उपअभियंता अनिल बडे आणि ठेकेदार यांच्याशी चर्चाही झाली होती. सद्यस्थितीत पुलाचे काम अतिशय संथ गतीने चालू आहे. ठेकेदारचा हलगर्जीपणा पाहता पूल पाऊस सुरू होण्यापूर्वी पुर्णत्वास जाईल का? हा प्रश्न भेडसावत आहे.
याबाबत आज साटेली-भेडशी ग्रामस्थानी सार्वजनिक बांधकाम विभागाला भेट दिली. शाखा अभियंता घंटे पुलाचे काम अद्याप पूर्ण झाले नसल्याबाबत जाब विचारला. यावेळी येत्या आठ दिवसात काम काम पूर्ण करण्यात येईल असे सांगितले. काम पूर्ण झाले नसल्यास रास्ता रोको आंदोलन छेडू. यावेळी काही अनुचित प्रकार घडल्यास सर्वस्वी सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार राहील, असा इशारा बांधकाम विभागाला दिला आहे. यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख संजय गवस, उपसरपंच गणपत डांगी, विष्णु मुंज, मधुकर जुवेकर, रविकिरण बोंद्रे, सिद्धेश पांगम, संदेश राणे आदी उपस्थित होते.