
आंबोली पोलिस दूरक्षेत्रातील कर्मचारी वर्गात वाढ करा
आंबोली पोलिस दूरक्षेत्रातील
कर्मचारी वर्गात वाढ करा
ग्रामस्थांची मागणी; प्रशासनाला साकडे
सकाळ वृत्तसेवा
आंबोली, ता. ३ : आंबोली हे जिल्ह्याचे प्रवेशद्वार असून येथील पोलिस दूरक्षेत्राच्या कर्मचारी वर्गात वाढ करण्याची आवश्यकता आहे. पोलिस अधीक्षकांनी याची दखल घेऊन तत्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी ग्रामस्थ व पर्यटकांतून होत आहे.
आंबोली पोलिस दूरक्षेत्राचे कार्यक्षेत्र मोठे आहे. आंबोली घाटासह परिसरात रोज सुमारे ४ ते ५ अपघात होतात. त्याशिवाय वाहन तपासणी, तसेच स्थानिक पोलिस ठाणे तक्रार निवारण आणि बंदोबस्त या क्षेत्रांत येणाऱ्या गावांमध्ये कामकाज असते. पावसाळ्यात हजारो पर्यटक आंबोलीत दाखल होतात. त्यामुळे बंदोबस्त आणि वाहतूक नियंत्रण ठेवणे गरजेचे असते. आंबोलीत कावळेसाद, हिरण्यकेशी परिसरासह गावात फिरता बंदोबस्त ठेवणे आवश्यक आहे. कोणतीही अप्रिय घटना घडू नये, यासाठी आवश्यक खबरदारी घेणे आवश्यक आहे. येथील दूरक्षेत्रातील पोलिसांना कामाचा व्याप अधिक आहे. त्यामुळे अन्य ठिकाणचे अनावश्यक कर्मचारी कमी करून आंबोलीत पोलिसांची संख्या वाढविणे आवश्यक आहे. यंदाची वर्षा पर्यटन आढावा बैठक अद्याप झालेली नाही. पोलिस अधीक्षकांनी तत्काळ दखल घेऊन पोलिस बंदोबस्त वाढवावा, अशी मागणी होत आहे. महादेवगड आणि चौकुळ रस्ता पोलिस दूरक्षेत्राच्या नियंत्रण कक्षेबाहेर असल्याने त्या ठिकाणी रात्रीच्या वेळी अवैध वाहतूक होण्याची शक्यता आहे. याबाबत पोलिसांनी उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्या रस्त्यांना सीसीटीव्ही कॅमेऱे बसविण्यासह रात्रगस्त घालण्यात यावी, अशी मागणी आहे.