
पर्जन्यमापक यंत्रणा मातीत
06718
आंबोली ः याच ठिकाणी असलेले पर्जन्यमापन यंत्र मातीखाली गडप झाले.
पर्जन्यमापक यंत्रणा मातीत
आंबोलीतील प्रकार; ब्रिटिशकाळापासून कोकणला साथ
सकाळ वृत्तसेवा
आंबोली, ता. ३ : राज्यातील सर्वाधिक पाऊस होणारे ठिकाण म्हणून ओळख असलेल्या येथील ब्रिटिशकाळापासूनचे पर्जन्यमापक यंत्र आणि तो परिसर यावर मातीचा भराव टाकण्यात आला आहे. एमटीडीसीमार्फत हॉटेल व स्विमिंग पूलच्या कामासाठी हा प्रकार घडल्याचे समजते. याबाबत येथे तीव्र संताप व्यक्त होत आहे.
देशातील चेरापुंजीनंतर महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस असणारे गाव म्हणून आंबोलीची ओळख आहे. येथे ब्रिटिशकाळापासून पाऊस मोजला जातो. आंबोली सनसेट पॉईंटजवळ शासकीय विश्रामगृहाच्या बाजूला ब्रिटिशकाळापासून पाऊस मोजण्याचे हे काम सुरू आहे. २०१९ मध्ये आंबोलीच्या पावसाच्या नोंदीने विश्वविक्रम केला होता, याची नोंदही याच ठिकाणी झालेल्या मोजमापामुळे शक्य झाली होती. हे सरिता मापन केंद्र खारेपाटण येथील पाटबंधारे प्रकल्प कार्यालयाला जोडलेले आहे. या ठिकाणी भाऊ ओगले हे पाऊस मोजणी करतात. त्यापूर्वी त्यांचे मामा नाथा जोशी हे मोजणीचे काम करत; मात्र येथे पर्यटन प्रकल्पाच्या नावाखाली अचानक भर टाकण्याचे काम सुरू झाले. यात मोजणीचे यंत्र माती टाकून गडप करण्याचा अजब प्रकार घडला आहे.
---
संबंधित अधिकाऱ्यांकडून पाहणी
दरम्यान, घडल्या प्रकाराबाबत संबंधित अधिकाऱ्यांना कळविल्यानंतर या ठिकाणी पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांनी येऊन पाहणी केली. त्यानंतर एमटीडीसी अधिकाऱ्यांना संपर्क केल्यानंतर त्यांनी पाहणी करून माती काढून टाकण्यात येईल, असे सांगितले. संबंधित हॉटेलच्या ठिकाणी दोन स्विमिंग पूल बांधण्यात येत असून हॉटेलचे काम करण्यात येत आहे; मात्र संबंधितांकडून पर्जन्यमापक यंत्र न पाहताच काम सुरू केल्याने हा प्रकार घडला.