शास्त्री-सोनवी पूल! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शास्त्री-सोनवी पूल!
शास्त्री-सोनवी पूल!

शास्त्री-सोनवी पूल!

sakal_logo
By

शोध पाऊलखुणांचा.......लोगो

rat३p४.jpg ः
०६७०९
जे. डी. पराडकर
rat३p५.jpg
०६७१०
सोनवी पूल
-------------

शास्त्री-सोनवी पूल!

एखाद्या गावात पूल नसेल तर त्यांची काय हालत होते हे तेथील ग्रामस्थांशिवाय दुसरे कोण सांगू शकेल? स्वातंत्र्यानंतर आजही काही गावांना पुलासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे, हे वास्तव आहे. मात्र पारतंत्र्यात उभारलेले गेलेले पूल आजही ब्रिटिश स्थापत्यकलेतील मजबुतीची साक्ष देत उभे आहेत. मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वर येथील सोनवी नदीवर आणि आंबेड खुर्दजवळ शास्त्री नदीवर सुमारे ८६ वर्षांपूर्वी उभारलेले पूल आजही हजारो अवजड वाहनांची जा-ये झेपवतायत. या पाऊलखुणांचा इतिहास नक्कीच जाणून घ्यायला हवा असा आहे. महामार्गाच्या चौपदरीकरणानंतर हे दोन्ही पूल वापरात येणार नसले तरी संगमेश्वरवासीयांच्या आठवणीत ते सदैव राहतील, यात कोणताही संदेह नाही.
चौपदरीकरणाचे काम आरवली ते लांजाजवळील वाकेडपर्यंत गेली सहा वर्षे रखडलेले आहे. शास्त्री पुलाच्या जवळच नवीन चारपदरी पूल उभा करण्याचे काम कासवगतीने सुरू होते तर सोनवी पुलाच्या पूर्णत्वाचा अद्याप पत्ता नाही. अशा स्थितीत ब्रिटिश राजवटीत ''गॅमन इंडिया'' या कंपनीने केलेले शास्त्री आणि सोनवी पुलाचे काम आत्तासारखी आधुनिक यंत्रणा उपलब्ध नसताना कमी वेळेत पूर्ण केले. चौपदरीकरणातील शास्त्री पूल उभारणारी पहिली कंपनी सोडून गेली आणि दुसरी कंपनी काम पूर्ण करण्यासाठी आली. पाऊलखुणांचा इतिहास आणि सध्याचे वास्तव पाहिले की, कामातील शिस्त, मजबुती आणि प्रामाणिकपणा या त्रिसूत्रीमुळेच असा इतिहास घडू शकला याची खात्री पटते. शास्त्री आणि सोनवी पूल या पाऊलखुणांमागील इतिहास कोणाला फारसा माहित नसला तरी येथील आठवणी मात्र प्रत्येकाच्या मनात नक्कीच घर करून असतील. आज ९० वर्षांनंतरही हे दोन्ही पूल मजबूत आहेत हीच त्या गॅमन इंडिया कंपनीची विश्वासार्हता म्हटली पाहिजे.
सोनवी पूल हा माभळे आणि नावडी संगमेश्वर या गावांना जोडतो. त्यामुळे या पुलाने आठ दशकांपूर्वी दोन्ही गावातील ग्रामस्थांची मने अशी काही जोडून ठेवली आहेत की, माभळे आणि नावडी संगमेश्वर वेगळी गावे असली तरी ती एकच वाटावीत. दोन अवजड वाहने या पुलावरून एकाचवेळी जा-ये करू शकत नसली तरी सध्या ५०-६० टन माल वाहून नेणारे अजस्त्र ट्रक येथून जात असतात. सोनवी पूल आणि नदीमुळे जवळच असणाऱ्या चौकाला सोनवी चौक असे नाव दिले गेले.
सोनवी पुलाची उभारणी पूर्ण झाल्याचे साल १९३४ आणि बांधकाम करणारी कंपनी गॅमन इंडिया असा फलक पुलाच्या माभळेकडील बाजूस लावण्यात आलेला आहे. ८९ वर्षांपूर्वी ज्या वेळी हा पूल उभारण्यात आला त्या वेळी वाहतूक एकदम तुरळक आणि मालवाहू वाहने फार तर दहा-पंधरा टन क्षमतेची असतील; मात्र पूल उभारतांना ब्रिटिश अभियंत्यांनी किती पुढचा विचार केला असेल, हे आज या पुलाची मजबुती अबाधित असल्याचे पाहिल्यानंतर लक्षात येते.
आंबेड खुर्द येथे उभारण्यात आलेला शास्त्री नदीवरील शास्त्री पूल हा १९३७ ला गॅमन इंडिया याच कंपनीने बांधून पूर्ण केला. सोनवी पुलाच्या पूर्ततेप्रमाणे येथेही पूल पूर्ण झाल्याच्या माहितीची पाटी बसवण्यात आली होती. शास्त्री पुलाचा कसबा या गावाकडील भाग जवळ असणाऱ्या हायस्कूलमुळे कमालीचा गजबजलेला असतो. येथील सर्व जुन्या-नव्या आठवणी म्हणजे अनेकांच्या काळजाला भिडणाऱ्या अशाच असल्याने या पाऊलखुणेचा इतिहास तसा मन हेलावणाराच. गॅमन इंडिया कंपनीने ८९ आणि ८६ वर्षांपूर्वी उभारलेले हे पूल आता मुंबई-गोवा महामार्गाच्या रूंदीकरणात जरी तोडले जाणार नसले तरी त्यांचा वापर केवळ स्थानिकांपुरता मर्यादित राहणार असल्याने या दोन्ही पाऊलखुणांच्या इतिहासाचे गोडवे आणखी काही वर्षे गाण्याची संधी संगमेश्वरवासीयांना नक्कीच मिळणार आहे. गॅमन इंडियाने शास्त्री आणि सोनवी पूल अजरामर केले आणि मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण सुरू झाल्यानंतर ते अनेक वर्षे रखडलेय. स्वातंत्र्यानंतर ढीम्म झालेली यंत्रणा गॅमन इंडियाचा आदर्श कधी घेणार, असा प्रश्न यामुळे पडतो खरा.

(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)
----------------