आरे तील 50 गुंठ्यावर कांदळवन रोपवन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आरे तील 50 गुंठ्यावर कांदळवन रोपवन
आरे तील 50 गुंठ्यावर कांदळवन रोपवन

आरे तील 50 गुंठ्यावर कांदळवन रोपवन

sakal_logo
By

आरेतील ५० गुंठ्यावर कांदळवन रोपवन
वनविभागाकडून जागतिक पर्यावरणदिनी आरंभ; निसर्ग पर्यटनालाही चालना
रत्नागिरी, ता. ३ ः किनारी प्रदेशातील जीवन आणि तेथील स्थानिकांच्या उपजीविकेसाठी महत्वाच्या असलेल्या कांदळवनांच्या संरक्षण आणि संवर्धनाला केंद्रशासनाने सर्वोच्च प्राधान्य देत मिष्टी योजनेंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील आरे येथे कांदळवन रोपवन निर्मिती केली जाणार आहे. सुमारे ५० गुंठे जमिनीत दोन हजाराहून अधिक कांदळवन रोपांची लागवड करण्यात येणार असून जागतिक पर्यावरणदिनी ५ जूनला याचा आरंभ होणार आहे.
मिष्टी योजनेंतर्गत देशातील एकूण ७५ ठिकाणी व त्यातील महाराष्ट्रातील १५ स्थळांवर कांदळवन रोपवन केले जाणार आहे. यामध्ये मुंबई उपनगरात मुलुंड, ठाणे जिल्ह्यातील काल्हेर आणि वडूनवघर, रायगड जिल्ह्यातील वारळ येथील २ ठिकाणी, वाघण, पालव येथे प्रत्येकी एक, पालघर जिल्ह्यात सोनावे, टेंभोडे, वडाडे, वेलांगीतील प्रत्येकी एक आणि आसनगावातील २ ठिकाणी, रत्नागिरी जिल्ह्यात आरे व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मिठबाव या स्थळांचा समावेश आहे. एकूण ५५.२८ हेक्टर कांदळवन क्षेत्रावर हे रोपवन केले जाणार आहे. या योजनेमुळे कांदळवनांचे पुनर्संचयन होऊन स्थानिकांना नवीन उपजीविकेच्या संधी उपलब्ध होतील आणि निसर्ग पर्यटनालाही चालना देण्यात येणार आहे.
पर्यावरणदिनी कांदळवन रोपलागवडीचा आरंभ होणार आहे. आरे किनारी मोठ्या प्रमाणात कांदळवन क्षेत्र आहे. समुद्राला लागूनच किनारी भागात मोकळा भूभाग आहे. त्यातील ५० गुंठे परिसरात कांदळवनांची निर्मिती केली जाणार आहे. आरे येथे रोपवन लागवडीचा आरंभ पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी जिल्ह्यातील खासदार, आमदार यांना निमंत्रित करण्यात आले आहे तसेच मुंबई उपनगर येथे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसायमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते कार्यक्रम होणार आहे.

चौकट
उत्पन्नवाढीसाठी उपजीविका प्रकल्प
या परिसरात विविध प्रकारचे मासे, खेकडे, मुळे, कालवं मच्छीमारांना सापडतात. यावर अनेक कुटुंबांची गुजराणही होते. अशा कुटुंबांचे आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी कांदळवन कक्षाकडून आर्थिक साह्य दिले जाते. आरे गावी हाच प्रकल्प राबवण्याबाबत वनविभागाच्या कांदळवन प्रतिष्ठानकडून पावले उचलण्यात येणार आहेत.