
कणकवली समर्थनगर येथे बेपत्ता तरूणाचा मृतदेह
कणकवली समर्थनगर येथे
बेपत्ता तरूणाचा मृतदेह
कणकवली, ता.३ : भिरवंडे खलांतर-वरचीवाडी येथील बेपत्ता महेश दत्ताराम सावंत (वय ४०) यांचा मृतदेह आज शहरातील समर्थनगर येथील गडनदीकिनारी भागात आढळला. हा मृतदेह कुजलेल्या स्थितीत होता. या घटनेची नोंद येथील पोलिसांत झाली.
शहरातील समर्थनगर भागात अनोळखीचा मृतदेह असल्याची माहिती येथील गुराख्यांनी आज पोलिसांना दिली होती. त्यानुसार पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उपजिल्हा रूग्णालयात पाठवला होता. त्यानंतर मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम सुरू होते. यात महेश सावंत हा २३ मे पासून बेपत्ता असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांना ओळख पटविण्यासाठी बोलाविले. महेशचे चुलते अशोक विश्राम सावंत (वय ६९) यांनी मृतदेहाची ओळख पटविली.
मृत महेशचे वडील आणि दोन भाऊ मुंबई-भांडूप येथे राहतात. महेशला दारूचे व्यसन होते. कणकवली तालुक्यात कोठेही मोलमजुरी करून तो उदरनिर्वाह करत असे. केव्हातरी तो भिरवंडेतील आपल्या गावी येत होता, अशी माहिती त्याच्या चुलत्यांनी दिली. २३ मे रोजी तो गावी आला. वडिलांना भेटून पुन्हा कणकवलीला गेला. त्यानंतर तो पुन्हा भिरवंडेला आला नसल्याचीही माहिती सावंत यांनी दिली.