
अंमली पदार्थ बाळणाऱ्याला कोठडी
अंमली पदार्थ बाळणाऱ्याला कोठडी
रत्नागिरीः शहरानजीकच्या साखरतर पुलाजवळ बेकायदेशीरपणे टर्की पावडर हा अंमली पदार्थ बाळगल्या प्रकरणी एका संशयिताला शहर पोलिसांनी अटक केली होती. आज न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली. उजेफा अब्दुल हमीद साखरकर (वय ३४, रा. साखरतर रहमत मोहल्ला, रत्नागिरी ) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. ३) रात्री दहाच्या सुमारास निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहर पोलिसांचे पथक साखरतर येथे गस्त घालत होते. त्या वेळी साखरतर येथील पुलाच्या पुढे उजव्या बाजूला असलेल्या एसटी स्टॉपच्या पडिक शेडमध्ये संशयित उजेफा अंमली पदार्थ बाळगलेल्या स्थितीत पोलिसांना मिळून आला. पोलिसांनी त्याची चौकशी करून झडती घेतली असता त्याच्याकडे पारदर्शक प्लास्टिक पाऊच होता. त्यात खाकी रंगाचा उग्र वास असलेला टर्की हा २.६८ ग्रॅम अंमली पदार्थ सापडला.
........
साखरपा येथे हातभट्टीवर कारवाई
रत्नागिरीः संगमेश्वर तालुक्यातील साखरपा-मच्छीमार्केट येथे पोलिसांनी अवैध हातभट्टी दारूअड्ड्यावर कारवाई केली. या कारवाईत ६१० रुपयांची १० लिटर दारू जप्त केली. देवरूख पोलिसात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. संतोष सोमा घडशी असे संशयिताचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. ४) दुपारी अडिचच्या सुमारास साखरपा मच्छीमार्केट येथील आंब्याच्या झाडाच्या बाजूला पडक्या झोपडीच्या आडोशाला निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित संतोष याच्याकडे अवैध हातभट्टीची ६१० रुपयांची दहा लिटर गावठी दारू सापडली. या प्रकरणी पोलिसांनी देवरूख पोलिसात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
------
मोटार अपघातात चालकाविरुद्ध गुन्हा
रत्नागिरीः शहरातील शिर्के पेट्रोलपंपासमोरील रस्त्यावर मोटार निष्काळजीपणे चालवल्यामुळे दोन मोटारींचे नुकसान झाले. या प्रकरणी मोटारचालकाविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. प्रथमेश विश्वास नांदगावकर (वय २३, रा. कावळेवाडी, पेठकिल्ला, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. ३) सकाळी पावणेबाराच्या सुमारास शिर्के पेट्रोलपंपासमोरील रस्त्यावर घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित नांदगावकर हे मोटार (क्र. एमएच-०८ एएन ९७७८) घेऊन शिर्के पेट्रोलपंप रस्त्यावरून जात असताना धोकादायक स्थितीत चालवून समोरील मोटार (क्र. एमएच-१२ जेसी १४८४) व दुसरी मोटार (क्र. एमएच-०८ एएक्स २५४७) या गाडीच्या मागील बाजूस आपटून गाड्यांचे नुकसान झाले. या प्रकरणी पोलिसांनी शहर पोलिसात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
---------
रेल्वे ट्रकवर अज्ञात व्यक्तीचा मृतदेह
रत्नागिरीः रत्नागिरी रेल्वेस्टेशन ते मुंबई रेल्वेट्रॅकवर ५० मीटर अंतरावर अज्ञात व्यक्ती मृतावस्थेत आढळून आली आहे. ही घटना शनिवारी (ता. ३) जून घडली आहे. अज्ञात व्यक्तीला रेल्वेच्या धक्का बसून त्याचा मृत्यू झाला असल्याचा अंदाज आहे. अद्यापही त्याची ओळख पटलेली नसून, या व्यक्तीचे नाव, पत्ता कोणास माहिती असल्यास रत्नागिरी ग्रामीण पोलिसात संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे. या प्रकरणी सिद्धाराम सुरेश कोरे यांनी ग्रामीण पोलिसात खबर दिली. खबरीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल भितळे करत आहेत.
------
पाग बौद्धवाडीत मामा भाच्याची मारामारी
चिपळूणः जमिनीच्या वादावरूनच मामाकडून भाच्यालाच मारहाण झाली. या मारहाणीत भाच्याच्या नाकास गंभीर दुखापत झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेची तक्रार चिपळूण पोलिसात केली आहे. चिपळूण शहरातील पाग बौद्धवाडी परिसरात येथील एका जाधव कुटुंबात जमिनीवरून आपापसात पूर्वीपासून वाद आहेत. हा वाद चार दिवसांपूर्वी विकोपाला गेला. त्या प्रकरणी संशयित आरोपी मुकेश काशिराम जाधव या मामाने आपल्या भाच्यालाच मारहाण केली तसेच करण मुकेश जाधव, मुकेश सुरेश कांबळे, सुरेश मुकेश कांबळे या तीनजणांनीही त्याला हाताने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या सगळ्यांनी त्याच्या घरामध्ये विटा फेकून मारून घरामध्येही मोठे नुकसान केले.
---------
बिजघरमध्ये आढळला मानवी सापळा
खेडः तालुक्यातील बिजघर बौद्धवाडी बोरीचा माळ येथे शनिवारी मानवी सापळा आढळून आला. या प्रकरणी येथील पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे. ग्रामस्थ मंगेश दीपक मर्चंडे यांना बोरीचा माळ या परिसरात एका अनोळखी इसमाची मानवी कवटी व हाडे आढळून आली. त्यांनी तत्काळ येथील पोलिसात संपर्क साधला. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.