कोकणासाठी स्वतंत्र पर्यटन विकास महामंडळाची गरज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोकणासाठी स्वतंत्र पर्यटन विकास महामंडळाची गरज
कोकणासाठी स्वतंत्र पर्यटन विकास महामंडळाची गरज

कोकणासाठी स्वतंत्र पर्यटन विकास महामंडळाची गरज

sakal_logo
By

कोकणासाठी स्वतंत्र पर्यटन विकास महामंडळाची गरज

विष्णू मोंडकर ः मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधणार

मालवण, ता. ५ : कोकणच्या शाश्वत पर्यटन विकासासाठी स्वतंत्र कोकण पर्यटन विकास महामंडळाची गरज आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा दौऱ्यावर येणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे याप्रश्नी लक्ष वेधणार असल्याची माहिती कोकण पर्यटन व्यावसायिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष विष्णू मोंडकर यांनी दिली.
प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, कोकण असा प्रांत आहे, ज्यामध्ये काश्मीरमधला बर्फ सोडून जागतिक पर्यटनाचे निकष पूर्ण करणारा भाग आहे. सागरी पर्यटन, स्कुबा डायव्हिंग, कृषी पर्यटन, जलक्रीडा, साहसी पर्यटन, मेडिकल टुरिझम, हिस्ट्री टुरिझम, कातळशिल्पे, पांडवकालीन लेणी, कल्चर टुरिझम, जंगल सफर, ऐतिहासिक मंदिरे, गड किल्ले, वनराई, अभयारण्य या सर्व पर्यटन क्षेत्रात कोकण स्वतंत्ररित्या विकसित होऊन महाराष्ट्राच्या आर्थिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. महाराष्ट्राचा पर्यटन विकास आणि कोकणाचा पर्यटन विकासाचा विचार करता पर्यटन वाढीसाठी आवश्यक संसाधने कोकणात निसर्गतः प्राप्त आहेत. यासाठी कोकणच्या पर्यटन विकासास प्राधान्यक्रम देऊन मूलभूत सुखसुविधा उपलब्ध करून कोकणातील उद्योजकांना जीवनात राज्याने क्रांतिकारक बदल करण्याची गरज आहे आणि हे स्वतंत्र कोकण पर्यटन विकास महामंडळाशिवाय शक्य नाही. आज सिंधुदुर्गाला प्रशासनस्तरावर पर्यटन जिल्हा म्हणून मान्यता मिळून २५ वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला; मात्र पर्यटन व्यवसाय वाढीसाठी आवश्यक ते बदल स्थानिक, प्रशासन स्तरावर झालेले नाहीत. वास्तविक पर्यटन वाढीसाठी पूरक वातावरण असताना स्थानिक व्यावसायिकांना पर्यटन व्यवसायासाठी आवश्यक बदल, नियमावली, शासकीय अध्यादेश होणे गरजेचे होते. परंतु महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांनी या क्षेत्रात स्थानिक व्यावसायिकांना समाविष्ट करून त्यांचे दरडोई आर्थिक उत्पन्न वाढवणारी एकही योजना गेल्या २५ वर्षात राबवू शकले नाहीत. अपवादासाठी न्याहरी निवास ही योजना रजिस्टर होण्यासाठी ५००० रुपये स्थानिक होम स्टे धारकाकडून आकारून त्या बदल्यात पर्यटकांचे निवासाचे बुकींग देण्यात येईल, असे सांगूनही गेल्या २५ वर्षांत एकाही व्यावसायिकास एकही निवासासाठी बुकींग दिले नाही. कृषी पर्यटन पॉलिसी बनली; परंतु त्यामध्ये कोकणच्या शेतकऱ्याचा विचार करून पॉलिसी बनविणे गरजेचे होते. जलक्रीडा पॉलिसीचा विचार करता ही स्थानिक पर्यटन व्यावसायिक कुठल्या क्षमतेची बोट चालवतात आणि कुठल्या क्षेत्रात व्यवसाय करतात. त्याप्रमाणे पॉलिसी बनणे गरजेचे आहे. कोकणात पर्यटन क्षेत्रात क्रांती घडविणारा सी-वर्ल्डसारखा प्रकल्प प्रशासकीय मानसिकतेमुळे थांबला आहे. ‘शासन आपल्या दारी’ या उद्या (ता.६) होणाऱ्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्र कोकण पर्यटन विकास महामंडळ जाहीर केल्यास येणाऱ्या काळात कोकणच्या जनतेसाठी राज्य सरकारचा हा निर्णय कोकणच्या आर्थिक सुबत्तेसाठी महत्त्वाचा ठरेल.