साडेअकरा तास वीज खंडित

साडेअकरा तास वीज खंडित

साडेअकरा तास
वीज खंडित
साखरपाः साखरपा गाव आणि आसपासच्या परिसरात सोमवारी साडेअकरा तास विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे ग्रामस्थांचे मोठे हाल झाले. कडक उन्हाळा आणि पाण्याचा तुटवडा यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले. सोमवार असल्यामुळे महावितरणकडून पावसाळापूर्व कामांसाठी विद्युत पुरवठा खंडित राहील, असे सांगण्यात आले होते. सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत विद्युत पुरवठा खंडित राहणार होता; पण प्रत्यक्षात हा विद्युत पुरवठा रात्री साडेआठ वाजता सुरळीत करण्यात आला. त्यामुळे अनेक गावांमधील नागरिकांना तब्बल साडेअकरा तास राहावे लागले. सध्या सर्वत्र होत असलेला प्रचंड उन्हाळा आणि त्यात दीर्घकाळ खंडित झालेला विद्युत पुरवठा यामुळे ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले तसेच सध्या अनेक ठिकाणी पाणीटंचाई जाणवत आहे. विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे अनेकांना विहिरीवर पाण्याचे पंप लावता आले नाहीत. परिणामी, ग्रामस्थांना मोठ्या गैरसोयींना तोंड द्यावे लागले.
--------------------
‘वालावलकर’ तर्फे
महाशस्त्रक्रिया शिबिर
चिपळूण : वालावलकर रुग्णालयात पिवळ्या व केसरी रेशनकार्डधारकांसाठी २८ जून ते १२ जुलैपर्यंत मोफत महाशस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरासाठी २० जूनपर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत नोंदणी करावी, असे आवाहन रुग्णालयामार्फत करण्यात आले आहे. या शिबिरात हर्निया, अपेंडिक्स, हायड्रोसेल, फायब्रोडेनोमा, अल्सर, प्रोस्टेटग्रंथी, मूळव्याध, मुतखडे, चरबीच्या गाठी, थायरॉईड, स्तनांचा कॅन्सर, तोंडाचा कॅन्सर, महिलांच्या गर्भाशय शस्त्रक्रिया, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, इम्प्लांट रिमुव्हर आदी आजारांवरील शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. नोंदणी आणि अधिक माहितीसाठी सचिन धुमाळ, संकेत जांभळे, संदीप पाटील यांच्याशी संपर्क साधावा.
-------
लांजा येथे
शिवराज्याभिषेक दिन
लांजाः विश्वहिंदू परिषद, प्रखंड लांजातर्फे शिवराज्याभिषेकदिन राममंदिर येथे उत्साहात साजरा करण्यात आला. वारकरी संप्रदायाचे हभप दादा रणदिवे, कीर्तनकार घाटे, विश्वहिंदू परिषद लांजा प्रखंड मंत्री प्रियवंदा जेधे आणि श्रीमती नवरे यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर विश्वहिंदू परिषद महिला विभागातर्फे ओंकार आणि एकात्मता मंत्र म्हणण्यात आला. नवरे यांनी शिवराज्याभिषेक दिनाचे प्रास्ताविक केले. वारकरी संप्रदायाचे रणदिवे यांनी राज्याभिषेकाविषयी आपले विचार व्यक्त केले. यानंतर बजरंग दलाचे बजरंगी श्रेयस शेट्ये यांनी बजरंग दलाच्या वर्गामधील अनुभव कथन केले. यानंतर जय भवानी जय शिवराय, जय भवानी जय शिवराय हे सामूहिक गीत म्हणण्यात आले तर डॉ. समीर घोरपडे यांनी मार्गदर्शन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com