देवगडाचा पाणीप्रश्न सोडवा

देवगडाचा पाणीप्रश्न सोडवा

07507
देवगड ः येथील नायब तहसीलदार व्ही. व्ही. शेठ यांना नंदकुमार घाटे यांनी निवेदन दिले. (छायाचित्र ः संतोष कुळकर्णी)

देवगडाचा पाणीप्रश्न सोडवा

नंदकुमार घाटे; तहसीलदारांचे लक्ष वेधले

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. ६ ः येथील देवगड-जामसंडे शहराला भेडसावणाऱ्या पाणी प्रश्‍नाकडे राष्ट्रवादीचे ज्येष्ठनेते नंदकुमार घाटे यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. शहरातील नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने आवश्यक पावले उचलण्याच्या मागणीचे निवेदन श्री. घाटे यांनी येथील तहसीलदारांना आज दिले. नायब तहसीलदार व्ही. व्ही. शेठ यांनी निवेदन स्विकारले.
येथील शहराला टंचाईची झळ सोसावी लागत आहे. नळयोजनेचे पाणी अनियमित मिळत असल्याने नागरिक हैराण असल्याने यातून दिलासा देण्यासाठी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते घाटे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज येथील नायब तहसीलदार शेठ यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रकाश गुरव, नीलेश पेडणेकर, उदय रूमडे, ज्ञानदेव भडसाळे, कृष्णा परब, सुधीर देवगडकर, जयराम कदम आदी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे, ‘‘देवगड-जामसंडे शहराला सध्या टंचाईची झळ बसत आहे. दिवसआड होणारा पाणी पुरवठा आता आठ दिवसांतून एकदा होत आहे. सुमारे ४० वर्षांपूर्वी शिरगाव पाडागर येथून देवगड-जामसंडे शहरासह तालुक्यातील अन्य गावांना पाणी पुरवठा करणारी देवगड प्रादेशीक नळयोजना झाली. योजनेचे पाईप भिडाच्या साहित्याचे असल्याने त्याचे खराब होण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. पुढे सुमारे २३ वर्षांपूर्वी दहिबांव येथील अन्नपूर्णा नदीवरून पुरक नळयोजना तयार करण्यात आली; मात्र, योजनेचे पाईप लोखंडी असल्याने वारंवार गळती होत असते. पंपही तत्कालीन ग्रामपंचायत काळातील असून दुरूस्त करून वापरले जात आहेत. नगरपंचायत झाल्यानंतर कोट्यवधीचा विकास निधी येतो. तरीही पाण्याचा प्रश्‍न अद्याप सुटला नाही. अलीकडील काही वर्षांत लोकवस्ती वाढली आहे. घरांची निवासी संकुलांची संख्याही वाढली आहे. पर्यायाने योजनेचे पाणी अपुरे पडत आहे. त्यामुळे पाणी प्रश्‍नाला प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे. नागरिकांना उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई जाणवते. यासाठी पाऊस पडल्यावर गप्प बसून न राहता पुढील कार्यवाही सुरू ठेवली पाहिजे. पाण्यामध्ये राजकारण आणले जावू नये. त्यामुळे तत्कालीन स्थितीत येथील आमदार भाजपचा असूनही राज्याचे तत्कालीन जलसंपदामंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून दहिबांव अन्नपूर्णा नदी पात्रातील गाळ उपसा करण्यात आला होता. त्यालाही आता सुमारे १५ वर्षे उलटून गेली. त्यानंतर अद्याप एवढ्या मोठ्या प्रमाणात गाळ उपसा करण्याचे काम झालेले नाही. पाऊस पडणे निसर्गाच्या हातात आहे. त्यामुळे भविष्यातील पाण्याची गंभीर बाब विचारात घेता प्रशासकीय पातळीवर हालचाली व्हाव्यात. देवगडच्या पाणी प्रश्‍नामध्ये राजकारण विरहित सर्व लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून तातडीने सुविधा पुरवावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com