सिंधुदुर्ग पर्यटन विकासासाठी कटिबद्ध

सिंधुदुर्ग पर्यटन विकासासाठी कटिबद्ध

07653
कुडाळ ः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह नारायण राणे, रवींद्र चव्हाण, दीपक केसरकर, उदय सामंत यांचे स्वागत करताना शिवसेना संपर्क प्रमुख आमदार रवींद्र फाटक.

07654
कुडाळ ः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवप्रतिमा देताना पालकमंत्री रवींद्र चव्हाण, नारायण राणे, दीपक केसरकर, उदय सामंत, रवींद्र फाटक आदी.

07655
कुडाळ ः कार्यक्रमास उपस्थित जिल्ह्यातील लाभार्थी. (छायाचित्रे : धनंजय पानवलकर)


सिंधुदुर्ग पर्यटन विकासासाठी कटिबद्ध

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे; जिल्ह्याला दहा महिन्यांत ६८० कोटी

अजय सावंत ः सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ६ ः सिंधुदुर्गाला गेल्या दहा महिन्यांत ६८० कोटींचा निधी दिला आहे. निसर्गसंपन्न असलेल्या या जिल्ह्यात पर्यटनाला चालना देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. येथील निसर्गसंपदा, ७२० किलोमीटरचा समुद्र किनारा पाहताजगाला हेवा वाटावा असे कोकण घडविण्याचा संकल्प करूया, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.
सर्वसामान्य लोकांना काय पाहिजे, हे समजून घेणारे आमचे सरकार आहे. हे सरकार कागदी घोडे नाचविणारे नाही, तर प्रत्यक्ष कृती करून दाखविणारे आहे. आज तुमच्या मनातील सरकार स्थापन झाले आहे. ७५ हजार शासकीय नोकऱ्या देण्याचा ऐतिहासिक निर्णय आमच्या सरकारने घेतला आहे. आज येथे झालेल्या ''शासन आपल्या दारी'' कार्यक्रमास असलेली ही उपस्थिती ऐतिहासिक ठरेल, असेही ते यावेळी म्हणाले.
राज्याचा ‘शासन आपल्या दारी’ हा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा उपक्रम मुख्यमंत्री शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील कुडाळ हायस्कूल मैदानावर झाला. यावेळी ते बोलत होते.
‘माका आजची गर्दी बघून खूप आनंद झालो. सगळ्यांका माझो जय महाराष्ट्र’, अशी सुरुवात करत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘‘सामान्य जनतेला छोट्या मोठ्या कामांसाठी, दाखल्यांसाठी, योजनांचा लाभ मिळण्यासाठी यापुढे सरकारी कार्यालयांमध्ये फेऱ्या माराव्या लागणार नाही. आता गतिमान शासन राज्यात आले आहे. तसे काम गावागावांत होईल आणि प्रत्येक योजनेचा लाभ प्रत्येक लाभार्थीच्या दारापर्यंत पोहोचेल. जनतेची कामे जलद गतीने झाली पाहिजेत, त्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम हाती घेतला आहे. अधिकाऱ्यांनी जनसामान्यांपर्यंत शासकीय योजना पोचविण्याचे काम केले पाहिजे. आजच्या या कार्यक्रमात विविध योजनांच्या ६७ कोटी निधीचे एकाच छताखाली वाटप होणार आहे. गेल्या दहा महिन्यांत ६८० कोटी रुपयांचा निधी सिंधुदुर्गच्या विकासासाठी दिला आहे. आजच्या गर्दीने सर्व विक्रम मोडीत निघाले आहेत. शासकीय कार्यक्रमात एवढी गर्दी मी प्रथमच पाहत आहे. आमचे सरकार प्रत्यक्ष काम करणारे आहे. राज्यात ७५ हजार नोकऱ्या दिल्या, याचे मला समाधान आहे. कोकणात ११ कोटीचा निधी काजू प्रक्रियेसाठी दिला आहे. कोकणच्या विकासासाठी कोस्टल हायवे आणत आहोत. विकासासाठी एकही निर्णय प्रसिद्धीसाठी घेत नाही, तर जनतेसाठी घेतो. शेतकरी, कष्टकरी, सामान्य जनतेचे हे सरकार आहे. म्हणूनच तुमच्यापर्यंत आलो आहोत."
यावेळी व्यासपिठावर केंद्रीयमंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, उद्योगमंत्री उदय सामंत, माजी खासदार सुधीर सावंत, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, आमदार रवींद्र फाटक, आमदार नीतेश राणे, माजी खासदार नीलेश राणे, आमदार भरत गोगावले, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रे, जिल्हा महिला प्रमुख वर्षा कुडाळकर, उपजिल्हाप्रमुख बापू धुरी, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, मनीष दळवी, अतुल काळसेकर, प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे, तहसीलदार अमोल पाठक, गटविकास अधिकारी विजय चव्हाण, देवगड गटविकास अधिकारी करिश्मा नायर, प्रभाकर सावंत, दादा साईल, संजय वेंगुर्लेकर, विनायक राणे, बंड्या सावंत, बंटी तुळसकर, संध्या तेरसे आदी उपस्थित होते.
उद्योगमंत्री सामंत यांनी राज्यात मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सुशासन आले आहे, त्याचा फायदा जनतेने घ्यावा, असे आवाहन केले. शिक्षणमंत्री केसरकर यांनी रयतेचे सेवक म्हणून काम करताना जनतेपर्यंत पोचूया, असे आवाहन केले. पालकमंत्री चव्हाण यांनी शिंदे-फडणवीस यांचे डबल इंजिनचे सरकार राज्यात आले आहे. राज्याचे मुख्यमंत्री सामान्य शेतकरी कुटुंबातील असून त्यांना जनतेच्या समस्यांची जाण आहे. अनेक उपक्रम आज राज्यात सुरू आहेत. सरकारच्या माध्यमातून कोकणात १९ रेल्वे स्थानके सुशोभित होत आहेत. रोजगार, पर्यटनावर आधारीत रोजगाराच्या योजनांना प्राधान्य देण्यात येईल, असे सांगितले.
सुरुवातीला गायक सागर कुडाळकर, नेहा आजगावकर, प्रफुल्ल वालावलकर यांनी महाराष्ट्रावर आधारीत विविध गीते सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जीवनप्रवास डॉ. प्रदीप ढवळ यांनी उलगडला. डॉ अमोल शिंदे यांनी शासनाच्या ‘योजनादूत अॅप’बाबत मार्गदर्शन केले. समाजसेविका ज्योती वाघमारे यांनी छत्रपती शिवाजी महाराज व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रातिनिधिक स्वरुपात पाच लाभार्थ्यांना निधीचे वितरण करण्यात आले. प्रास्ताविकात जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी ‘शासन आपल्या दारी’बाबत मार्गदर्शन केले. राजश्री सामंत यांनी सूत्रसंचालन केले. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात, ‘वंदे मातरम’ने सांगता झाली.
...............
चौकट
राणेंची कार्यशैली मार्गदर्शक ठरणारी
कायद्याचा बागुल बुवा न करता लोकाभिमुख काम करताना तत्कालीन मुख्यमंत्री राणे यांना पाहिले. कायदे नियम जनतेसाठी असून ते त्यांच्या हितासाठी कसे वापरावेत, हे राणे मुख्यमंत्री असताना मी पाहिले आहे. एकदा ठाण्यातील एका प्रश्नाबाबत आनंद दिघे यांच्यासोबत त्यांना भेटायला गेलो होतो, तेव्हा राणे यांनी कायद्याचा बागुल बुवा न करता आमची मागणी पूर्ण केली. आम्ही सुद्धा तसे काम करण्याचा संकल्प केला आहे. राणेंनी केंद्रीय एमएसएमईच्या माध्यमातून रोजगार देणारे हात घडविले आहेत. मोदी सरकारचे सहकार्य आम्हाला मिळत आहे. राज्य आणि केंद्राच्या माध्यमातून राज्यात जनतेच्या हितासाठी निर्णय घेऊ, अशी ग्वाही यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com