
संक्षिप्त-फोंडाघाटची अमृता भारतीय नौसेनेत
संक्षिप्त
फोंडाघाटची अमृता
भारतीय नौसेनेत
कणकवली ः मूळ फोंडाघाट येथील अमृता अजय परब हिची अग्निपथ योजनेतून भारतीय नौसेनेत निवड झाली आहे. अमृताच्या वडिलांचे छत्र २०१३ मध्ये हरपल्यानंतर आईच्या कष्टाची जाणीव ठेवत तिने घेतलेल्या भरारीचे कौतुक होत आहे. फोंडाघाटमध्ये राहण्यास स्वतःचे घर नसतानाही आईचे व शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभलेल्या अमृताने मिळालेल्या संधीचे सोने करून गरिबीवर मात करून यश मिळविता येते, हे दाखवून दिले. तिचे दहावीपर्यंतचे शिक्षण फोंडाघाट येथे व त्यानंतर कुडाळ येथे दोन वर्षे, तर पदवीपर्यंतचे शिक्षण कणकवलीत झाले. तिने अग्निपथ योजनेतून ऑनलाईन अर्ज केल्यानंतर लेखी परीक्षा व मेडिकल झाल्यानंतर तिला प्रशिक्षणासाठी ओडिसा येथे हजर करून घेण्यात आले आहे. तिच्या या यशाबद्दल कौतुक होत आहे.
सावडावमध्ये आगीत
काजू कलमे खाक
कणकवली ः सावडाव येथील काजू बागांना आग लागून सुमारे ४५० काजू कलमे बेचिराख झाली आहेत. त्यामुळे काजू बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. सावडाव येथील प्रभाकर राणे, नामदेव सावंत, शुभांगी सावंत यांनी आपल्या बागेत काजू कलमे लावली होती. २५ मे रोजी त्यांच्या बागेतील काजू कलमांना अचानक आग लागून ती बेचिराख झाली. अजूनही काही ग्रामस्थांच्या काजू बागायतीचे आगीमुळे नुकसान झाले आहे. याच दिवशी तेथील एका काजू बागायतदाराने आपल्या बागेत पालापाचोळा जाळण्यासाठी लावलेल्या आगीमुळे घटना घडल्याचे इतर बागायतदारांचे म्हणणे आहे. याबाबत तंटामुक्त समितीकडे तक्रार अर्ज करून संबंधित बागायतदाराकडून कुंपणाचा खर्च व नवीन काजू रोपे मिळावीत, अशी मागणी केली. तडजोड न झाल्याने बागायतदारांनी काल (ता. ८) तक्रार देण्यासाठी कणकवली पोलिस ठाणे गाठले.