
जिल्ह्यात आजपासून ''ई-फायलिंग''
swt98.jpg
08345
सिंधुदुर्गनगरीः येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सिंधुदुर्ग जिल्हा बार असोसिएशनचे उपाध्यक्ष विवेक मांडकुलकर व अन्य.
जिल्ह्यात आजपासून ‘ई-फायलिंग’
न्यायालयांसाठी नवी प्रणाली; बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्रचा उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. ९ः बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा तर्फे सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयासह सर्व तालुका न्यायालयांमध्ये ई-फायलिंग प्रणाली सुरू करण्यात येत असून या उपक्रमाचा प्रारंभ जिल्हा न्यायालय सिंधुदुर्गनगरी येथे उद्या (ता. १०) सकाळी अकरा वाजता सिंधुदुर्ग जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय भारुका यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा बार असोसिएशनचे उपाध्यक्ष विवेक मांडकुलकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
ई-फायलिंग सुलभ होण्यासाठी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा यांच्याकडून सिंधुदुर्ग जिल्हा वकील संघटनेच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा न्यायालय व प्रत्येक तालुका न्यायालयाच्या ठिकाणी कॉम्प्युटर, स्कॅनर व प्रिंटर हे साहित्य सूपूर्द करण्यात आले. बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा तर्फे ई-फायलिंगकरिता स्वतंत्र कक्ष जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालये व सिंधुदुर्गनगरी जिल्हा न्यायालय येथे सुरू करण्यात येणार आहे. बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाच्या या उपक्रमाचा प्रारंभ सिंधुदुर्ग जिल्ह्यातून करण्यात येणार आहे. हा उद्घाटन समारंभ जिल्हा न्यायालय ओरोस येथे उद्या सकाळी अकरा वाजता आयोजित केला आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय भारुका उपस्थित राहणार आहेत. बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवाचे अध्यक्ष मिलिंद पाटील, बार कौन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य जयंत जायभावे, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवाचे उपाध्यक्ष संग्राम देसाई तसेच सिंधुदुर्ग जिल्हा बार अध्यक्ष परिमल नाईक व उपाध्यक्ष श्री विवेक मांडकुलकर आदी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती आहे.
''एआयआर इन्फोटेक''मार्फत सर्व वकील व पक्षकारांसाठी इ-फायलिंगची सेवा माफक दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. एआयआर इन्फोटेकच्या ई-लायब्ररीमधील एआयआर, सीआरएलजे आदी सर्व लॉ जर्नलमधील सायटेशन्स उपलब्ध होणार आहेत.
या कार्यक्रमास एआयआर समुहाचे प्रमुख मंदार चितळे उपस्थित राहून ई- फायलिंग सेंटर तर्फे पुरविण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती देणार आहेत. यावेळी ई-फायलिंगचे प्रात्यक्षिक देखील दाखविण्यात येणार आहे. या कार्यक्रमास जिल्ह्यातील सर्व न्यायाधीश, वकील तसेच विविध मान्यवर उपस्थित रहाणार आहेत, अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा बार असोसिएशनचे उपाध्यक्ष मांडकुलकर यांनी दिली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बार असोसिएशनचे सचिव यतीन खानोलकर, राजेश परळेकर, अक्षय चिंदरकर, अविनाश परब, महेश शिंपुकडे आदी उपस्थित होते.