वेगळेपण जपणारी गावपळण

वेगळेपण जपणारी गावपळण

११ (सदर)

(८ जून टुडे चार)
जनरिती-भाती ................लोगो

rat१४p५.jpg ः
२३M०९२९७
डॉ. विकास शंकर पाटील

वेगळेपण जपणारी गावपळण

चिंदर, वाघणगाव, आचरा आदी गावच्या गावपळण दर तीन वर्षांनी होतात; पण यापेक्षा वेगळी असणारी आणि आपली ऐतिहासिक परंपरा जपणारी म्हणून शिराळे गावची गावपळण ओळखली जाते. प्रत्येक गावपळणीस काहीतरी दंतकथा असते, त्याप्रमाणेच शिराळे गावच्या गावपळणीस अशीच एक कथा चिकटलेली दिसते. कधी काळी या गावात भोरपी समाजाचे एक कुटुंब आपला मनोरंजनाचा कार्यक्रम घेऊन आले होते. या कार्यक्रमाला गावातील लोकांनी उपस्थित राहावे, म्हणून त्यांनी संपूर्ण गावात दवंडी दिली होती. गावात दवंडी दिली तरी संपूर्ण गाव हा शेती करणारा असल्यामुळे शेतकऱ्यांना या कार्यक्रमापेक्षा आपल्या शेताची राखण करणे महत्वाचे वाटले. वन्यप्राण्यांकडून शेताचे खूप मोठे नुकसान केले जात होते. हे दिवस शेतीच्या हंगामाचे दिवस होते आणि या वेळी एखादा दिवस रखवालीला नसले तर शेतीचे प्राण्यांकडून खूप मोठे नुकसान होईल या भीतीमुळे भोरपी समाजाच्या मनोरंजनाच्या कार्यक्रमास कोणीही उपस्थित राहिले नाही. भोरपी कुटुंबास या गोष्टीचे खूप वाईट वाटले. त्यांनी ग्रामस्थांना या कार्यक्रमास उपस्थित राहण्याची विनंती केल्यावर ग्रामस्थांनी तुमच्या कार्यक्रमास उपस्थित राहिल्यावर आपल्या शेतीचे नुकसान होईल, ही भिती बोलून दाखवली. तुम्ही सर्वजण कार्यक्रमास उपस्थित राहा. तुमच्या शेतीचे कोणतेही नुकसान होणार नाही, झाल्यास ते आम्ही भरून देऊ, असा विश्वास भोरपी कुटुंबाने ग्रामस्थांना दिला. त्यामुळे दुसऱ्या रात्री सर्व ग्रामस्थ कार्यक्रमास उपस्थित राहिले. या वेळी भोरपी कुटुंबाने आपल्याकडील मोहिनीविद्येने चारी दिशा बांधून घेतल्या. त्यामुळे वन्यप्राण्यांचा शेतात प्रवेश झाला नाही. रात्री कार्यक्रम पाहून गेल्यावर सकाळी शेतकरी आपल्या शेतावर गेले. त्या वेळी त्यांना शेतीचे कोणतेही नुकसान न झाल्याचे दिसून आले. या पुढील काळात आपल्या शेतीचे कोणतेही नुकसान होऊ नये म्हणून ग्रामस्थांनी या कुटुंबास गावात राहण्याची विनंती केली; पण या कुटुंबाने गावात राहण्यास संमती दर्शवली नाही. त्यानंतर ग्रामस्थांनी आणखी एक कार्यक्रम करण्याची विनंती केली. भोरपी कुटुंबाने रात्री सर्व दिशा बांधल्या आणि या कुटुंबाचा वध झाला. जर त्यांनी बांधलेल्या दिशा कायम राहिल्या तर आपल्या शेतीचे नुकसान होणार नाही हा स्वार्थ त्यामागे होता. दवंडी देण्यासाठी गेलेल्या दोघांना अडवून ठार मारले. त्यामुळे वरचा दौंडोबा व खालचा दौंडोबा अशी दोन देवस्थाने निर्माण झाली. भोरपी समाजाने मृत्यूसमयी शाप दिला. मी तुम्हाला वर्षातून सात दिवस सीमेबाहेर ठेवेन. जो कोणी गावाबाहेर जाणार नाही त्याचा वंश संपून जाईल, नामोनिशाण मिटून जाईल आणि तेव्हापासून ही गावपळण सुरू झाली.
आपली वंशपरंपरा खंडित होऊ नये, या भीतीपोटी प्रारंभी लोक या गावपळणीत सहभागी झाले; पण आता ही गावपळण गावकऱ्यांच्या आनंदाची होऊन बसली आहे. गावाचे दैवत असणाऱ्या गांगेश्वर देवालयात गावपळण करण्याबाबत कौल घेतला जातो. कौल घेऊन गावपळणीचा दिवस ठरवला जातो. गावपळण सुरू होण्यापूर्वी गावातील सर्व ग्रामस्थ आपला बाडबिस्तारा गुंडाळून सडुरे गावात रवाना होतात. या हद्दीत राहण्यासाठी झाडांच्या फांद्यापासून झोपड्या बनवतात. गुरा-ढोरांसाठी जागा निश्चित केली जाते. इतर गावच्या गावपळण या तीन वर्षानंतर तीन दिवसाच्या असतात; पण शिराळे गावची गावपळण ही प्रतिवर्षी असून, ती सात दिवसांची असते. त्यामुळे प्रत्येकजण तब्बल सात दिवस पुरेल इतका धान्यसाठा व इतर साहित्य घेऊन आलेला असतो. या गावपळणीच्या काळात गावात भरणारी शाळा सात दिवस गावाबाहेर भरते. जे दैनंदिन उपक्रम गावात सुरू असतात त्याचप्रमाणे झोपड्या मध्ये आल्यानंतर ते सुरू होतात. सात दिवस चालणाऱ्या या गावपळणीच्या कालावधीत गाव पूर्णतः रिकामा होतो. पशू-पक्ष्यांनाही गावबंदी असल्याचे समजते. एरव्ही पहाटे कलकलाट करणारी चिमणीपाखरे ही गावाबाहेर वळतात. जणू काही गावात कुणीच नसल्याचे त्यांना समजत असते. शिराळे गावातील जनावरे, कुत्री, मांजरे, शेळ्या या गावपळणीच्या दिवशी घरातून सोडल्यानंतर सीमेबाहेर गेल्या वर्षी ज्या ठिकाणी आपण वास्तव्य केले असेल त्याच ठिकाणी जाऊन ती उभी राहतात, हे एक विशेषच म्हणायला हवे. सात दिवस पूर्ण झाल्यानंतर सर्व ग्रामस्थ मिळून गांगेश्वर देवालयात जाऊन गावात पुन्हा प्रवेश करण्यासाठी कौल घेतात. या दरम्यान जर कुणी गावच्या सीमेत प्रवेश केला तर संपूर्ण गावाला शिक्षा सहन करावी लागते. ती म्हणजे गावाच्या सीमेत प्रवेश करण्याचा कार्यक्रम आणखी तीन दिवस वाढवला जातो. गावात जमल्यानंतर भोरपी देवस्थान येथे राखण दिली जाते तसेच बोललेले नवस फेडणे व नवीन नवस बोलणे असे कार्यक्रम परंपरेनुसार होतात, अशी ही शिराळे गावची वैशिष्ट्यपूर्ण गावपळण आपले वेगळेपण टिकून आहे.

(लेखक महाविद्यालयाचे मराठीचे प्राध्यापक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com