क्राईम

क्राईम

३० ( पान ३ )

नोकरीच्या आमिषाने १३ तरुणांना गंडा

खेड ः तुर्की, मलेशिया, कुवेत या देशांमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवत १३ तरुणांची १४ लाख ३५ हजार रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार मोहम्मद सलिम अब्दल्ला सैन (रा. डाकबंगला-खेड) यांनी येथील पोलिस ठाण्यामध्ये दाखल केली आहे. तालुक्यातील साखरोली येथील रहिवासी असलेल्या एका एजंटाने परदेशात नोकरी लावण्याचे आमिष दाखवत १३ तरुणांकडून ऑनलाईन १४ लाख ३५ हजार रुपये स्वीकारले. या तरुणांना प्रत्यक्षात दिला गेलेला व्हिसा, वर्क परमिट, खोटी तिकिटे व बनावट कागदपत्रे देऊन फसवणूक केल्याची तक्रार खेडसह दापोली पोलिस ठाण्यामध्येही करण्यात आल्याचे तक्रारदार मोहम्मद सैन यांनी सांगितले.

--

शिवफाट्यावर गांजा जप्त

खेड ः मुंबई-गोवा महामार्गावर शिवफाटा येथे ४२ हजार ७५० रुपयांच्या गांजासह रोख रक्कम व इतर साहित्य असा ६८ हजार ७२० रुपयांचा मुद्देमाल येथील पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी अनिल शिवराम चव्हाण उर्फ अनिल बुवा (५० रा. दाभिळ कुंभारवाडी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. अनिल शिवराम चव्हाण उर्फ अनिल बुवा हा शिवफाटा येथील टोलनाका येथे गांजाचा साठा घेऊन ग्राहकांना विक्री करण्यासाठी येणार असल्याची गोपनीय माहिती येथील पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिस उपविभागीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सुजित गडदे व पथकाने सापळा रचला. या दरम्यान, शिवफाटा येथील टोलनाका येथे एक व्यक्ती काळ्या रंगाची सॅक घेऊन उभा होता. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिस पथकाने त्याची झडती घेतली. या झडतीत एका प्लास्टिकच्या पिशवीत ४२ हजार ७५० रुपये किंमतीचा गांजा, १३ हजार ३२० रुपये रोकड अन्य साहित्य असा ६८ हजार ७२० रुपयांचा ऐवज जप्त केला. याबाबत पोलिस शिपाई रूपेश जोगी यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पथकात पोलिस शिपाई अजय कडू यांचाही समावेश होता.

--

आराम बसमधून सोन्याचे दागिने लंपास

खेड ः मुंबई-गोवा महामार्गावरील पनवेल ते लोटेदरम्यान खासगी आराम बसमधून प्रवास करणाऱ्या एका महिलेच्या बॅगेतून १ लाख ७० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने लंपास झाल्याची तक्रार येथील पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. त्यानुसार अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे. मिसरीदेवी मदन सिंग चौधरी (रा. घाणेकुंट-गवळवाडी) यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. त्या कुटुंबीयांसमवेत खासगी आराम बसमधून लोटे येथे आल्या. त्यानंतर घरी जाण्यासाठी एका रिक्षातून प्रवास केला. घरी गेल्यावर बॅग तपासली असता सोन्याचे दागिने लंपास झाल्याचे निदर्शनास आले. येथील पोलिस ठाणे गाठत याबाबत तक्रार नोंदवली.

--

कशेडी घाटात अज्ञाताचा मृतदेह

खेड ः मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटामधील सरस्वती देवी मंदिराच्या नजीक असलेल्या ओढ्याजवळ एका अज्ञात पुरुषाचा कुजलेल्या अवस्थेतील कवटी नसलेला मृतदेह मंगळवारी (ता. १३) सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास आढळून आला. गावातील ग्रामस्थ मंदिरानजीकच्या ओढ्यात खेकडे पकडण्यासाठी गेले असता त्यांना उग्र वास येऊ लागल्याने त्यांनी पाहणी केली असता कवटी नसलेला कुजलेल्या स्थितीतील मृतदेह आढळून आल्याने त्यांनी याबाबत पोलिसांना कळवले. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. आढळून आलेल्या मृतदेहाबाबत घातपात की अन्य काही या दिशेने पोलिस तपास करून मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
--

rat१४p३३.jpg ः
२३M०९४०४
खेड ः महामार्गावरील मोरवंडेनजीक उलटलेली एसटी बस.

महामार्गावरील मोरवंडेनजीक एसटी उलटून ७ जखमी

खेड ः मुंबई-गोवा महामार्गावरील मोरवंडेनजीक विरारहून गुहागरकडे जाणाऱ्या एसटी बसला अपघात झाला. या अपघातात सात प्रवासी गंभीर जखमी झाले असल्याची माहिती प्रथमदर्शनी उपलब्ध झाली आहे. हा अपघात सायंकाळी साडेचार ते पाच वाजण्याच्या सुमारास झाला. एसटी बसच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असल्याची माहिती घटनास्थळावरून प्राप्त झाली आहे. या अपघातातील जखमींना घरडा हॉस्पिटल आणि परशुराम हॉस्पिटल येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. या अपघातानंतर मुंबई-गोवा मार्गावर वाहतुकीची कोंडी झाली‌. अपघातस्थळी खेड पोलिस दाखल झाले असून, या अपघातप्रकरणी अद्याप खेड पोलिसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही. त्यामुळे या अपघाताची अधिक माहिती मिळू शकली नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com