विकृत रीक्षावाल्याच्या आवळल्या मुसक्या

विकृत रीक्षावाल्याच्या आवळल्या मुसक्या

पान १ साठी

विकृत रिक्षावाल्याच्या
आवळल्या मुसक्या
तरुणीची इन्स्टाग्रामवर पोस्ट; पोलिसांची तासात कारवाई
रत्नागिरी, ता. १४ : शहर परिसरात काल एक धक्कादायक प्रकार घडल्याचे उघड झाले. जयस्तंभ ते कुवारबाव रिक्षा प्रवास दरम्यान रिक्षाचालकाने तरुणीशी असभ्य आणि अश्लील वर्तन केले. त्या तरुणीने धाडस दाखवत इन्स्टाग्रामवर याबाबतची पोस्ट केल्याने एकच खळबळ उडाली. त्या प्रसंगाच्या अनुषंगाने पोलिसांनीच पुढाकार घेत त्या तरुणीशी संपर्क साधला. सीसीटीव्हीच्या माध्यमातून या विकृत रिक्षाचालकाला दीड तासात गजाआड केले. पोलिसांच्या कारवाईचे आणि त्या मुलीच्या धाडसाचे कौतुक होत आहे. अविनाश म्हात्रे असे पोलिसांनी अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शहरातील जयस्तंभ ते कुवारबाव दरम्यान तरुणी रिक्षातून प्रवास करीत होती; परंतु प्रवासा दरम्यान तिला काही विचित्र अनुभव येत होते. तिच्यासोबत एक महिला रिक्षात बसली. त्यानंतर आरोग्य मंदिराजवळील एका बँकेत महिलेचे काही काम असल्यामुळे तिथे थांबली. त्या संपूर्ण वेळेत तो रिक्षाचालक तरुणीला हवामान आणि इतर विषय काढून बोलण्याचा प्रयत्न करत होता. त्याने आरश्यातून तिला पाहण्यास सुरुवात केली. त्यांनतर ती महिला डी मार्टजवळ उतरली. ती उतरल्यानंतर तो अश्लील बोलू लागला. पैसे देताना तर त्याने अतिशय घृणास्पद हावभाव केले. त्यामुळे संतापलेल्या त्या तरुणीने या विकृत रिक्षाचालकाच्या अश्लील वागण्याबाबत इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आणि एकच खळबळ उडाली. शहरभर या विषयाची चर्चा सुरू झाली.
पोलिसांनी याची गंभीर दखल घेऊन शहर पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तपास सुरू केला. तरुणीला बोलावून माहिती घेतली. पोस्टच्या अनुषंगाने त्यांनी मार्गावर तपास सुरू केला. काही ठिकाणी सीसीटीव्हीमध्ये ती रिक्षा आल्यानंतर नंबर मिळवून पोलिस संशयितापर्यंत पोहोचले. अवघ्या काही तासांत पोलिसांनी संशयित म्हात्रे याला ताब्यात घेतला. तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून अटक केली. रिक्षाचालकाच्या या कृत्याचा विविध सामाजिक संघटनांनी निषेध व्यक्त करीत त्याच्यावर कठोर कारवाईची मागणी केली. रत्नागिरीतील महिलांची सुरक्षा अबाधित असल्याचे पोलिसांनी दाखवून दिले.


जिल्हा पोलिसांचे आवाहन
आपण दिवसा, अगर रात्री रिक्षा, बस, ट्रेन अथवा कोणत्याही प्रवासी वाहनाने एकट्या प्रवास करत असाल तर कृपया त्या वाहनाचा नंबर आपल्या मोबाइलद्वारे टिपून घ्यावा व आपल्या पालकांना/ नातेवाइकांकडे शेअर करावा.

प्रवासादरम्यान आपल्याला जर संशयित व विकृत हालचाली दिसून आल्यास किंवा संशय आला तरीदेखील लागलीच डायल ११२ वर अथवा हेल्पलाइन नंबर १०९१, तसेच रत्नागिरी पोलिस नियंत्रण कक्ष ०२३५२-२२२२२२ वर संपर्क साधावा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com